Saturday, April 21, 2018

माझ्या नव्या पुस्तकाचा उमेश मोहिते यांनी करून दिलेला परिचय


पुस्तक परिचय ले- उमेश मोहिते ,माजलगाव जि.बीड.



*मनोरंजनातून शिकवण देणारी बालकविता : मस्त फिरू रे मस्त फिरु !** 


     .        जेष्ठ बालसाहित्यिक अरुण वि. देशपांडे यांचा ' मस्त फिरू रे मस्त फिरू ' हा आठवा बालकवितासंग्रह असून यात एकूण २५ बालकविता आहेत. या सर्व कविता मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असून मुलांच्या विचार विश्वातील विविध स्पंदनांना संवेदनशीलतेने आविष्कृत करतात  आणि त्यांच्या निरागस मनावर काहिएक संस्कारांची रुजवणदेखील करतात.आई , बाबा , पाऊस , शाळा, परी , झाडे , पक्षी , संगणक , पुस्तके , विविध खेळ इ.बाबी मुलांच्या भावविश्वातील अविभाज्य घटक असतात. मुले या सर्व घटकांवर जिवापाड माया करत असतात. अगदी हेच ध्यानात घेऊन कवी अरुण देशपांडे यांनी साधी -सोपी शब्दकळा योजून ही गुणगुणावीशी वाटेल अशी छंदोबध्द कविता लिहली आहे.
      आज वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे म्हणून मुलांच्या कोवळ्या मनावर पुस्तक वाचनाचे महत्त्व बिंबवण्यासाठी कवी अरुण देशपांडे ' पुस्तके ' या कवितेमधून वाचन महिमा सांगून मुलांच्या जडण=घडणीतील पुस्तकांचे स्थानही विशद करतात आणि वाचन संस्कृतीलाही हातभार लावतात. ते लिहीतात :
         छान गोष्टी छान चित्र
         पुस्तके असतात मित्र
         वाचनाची लागो गोडी
         खूप असो वा थोडी
         वाचन सुरु केले की
         थांबत नसते गाडी !
         खूप सारे ज्ञान देती
         ग्रंथ असती गुरुजन
         वाचन करावे तुम्ही
         होऊन ग्रंथात मग्न
परी ही मुलांच्या भावविश्वातील एक सुंदर आणि मनोहारी कल्पना ! मुले परीच्या काल्पनिक विश्वात रममाण होत असतात, याची सार्थ जाण कवीला आहे.परी स्वप्नात येऊन मोलाचा संदेश देतेय,अशी कल्पना करुन कवीने जलसंवर्धन व वृक्षारोपणाची गरज सांगितली आहे. कवी म्हणतो : 
        रुक्ष झाला परिसर
        गेली सारी हिरवाई
        झाडे लावण्याची रे
        करा सारेजण घाई
तर ' निसर्ग मित्र ' या कवितेमधेही कवी निसर्ग संवर्धनाची निकड व्यक्त करतो . कवी म्हणतो :
          माणूस म्हणून आपलेही
          काही कर्तव्य हो आहे 
          पर्यावरण रक्षण करुनी
          होऊ सारे निसर्ग मित्र !
याशिवाय मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडण -घडणीसाठी चार उपयुक्त गोष्टीही कवीने सांगितल्या आहेत. आजच्या संगणकाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल असतो. त्यांचा सुट्टीचा काळ खेळण्या- वाचण्यात गेला पाहिजे, या प्रांजळ हेतूने ' सुट्टीच्या दिवसात ' या कवितेत कवी म्हणतो :
          आमराईत जाऊन
          पडावे सावलीला
          छान एक पुस्तक
          असावे सोबतीला
मुलांनी एकटे राहू नये. मित्रांसोबत हसले,खेळले आणि बागडले पाहिजे, असा संदेश देताना कवी म्हणतो : 
         एकटे एकटे
         राहू नये कधी
         राहूनी सर्वात
         मित्र जमवावे आधी
         दोस्त असे आपला
         एक मस्त सोबती
         मदत करेल जो
         खरी त्याची दोस्ती !
या कवितेतून कवीने खऱ्या मित्राचीही ओळख मुलांना सहजतेने करुन दिली आहे. मुलांनी निसर्गात रमले पाहिजे. रानोवनी भटकले पाहिजे. चार भिंतीआड न राहता बाहेरच्या मुक्त जगाचा अनुभव घेतला पाहिजे, असे सांगताना ' मस्त फिरु रे मस्त फिरु ' या कवितेत कवी लिहीतो :
         मस्त फिरु रे मस्त फिरु
         खेळ खेळू नि मस्ती करु
         झोका खेळू , गरगर फिरु 
         गमती - जमती खूप करु 
         चार भिंतीच्या घरामध्ये
         केांडू नये कधी मनपाखरू
         विशाल गगनात त्याला
         द्यावे मुक्तपणे रे फिरु
याशिवाय मुलांच्या निरागस व आनंददायी विश्वाची चुणूक दर्शवणाऱ्याही काही कविता या संग्रहात आहेत.बालमनाला मित्राची खास ओढ असते. मित्र म्हणजे त्याच्यासाठी सारे काही असते. हे नोंदवताना कवी म्हणतो :
        खूप आवडती मला
        माझे सगळे दोस्त
        शाळेतले , वर्गातले
        आजुबाजूचे दोस्त !
पाऊस हा मुलांच्या विशेष जिव्हाळयाचा विषय ! त्यांना पावसात मनसोक्त भिजायला आवडते. हेच कवी कवितेत शब्दबद्ध करताना म्हणतो :
          पाऊस पडे जेंव्हा
          आनंद खूप होतो
          चिंब चिंब भिजून
          मनमोर नाचतो !
सध्या संगणकदेखील मुलांचा मित्र झालेला आहे, याचीही कवी बालसुलभ वृत्तीने नोंद घेताना दिसतो.कवी म्हणतो : 
          कॉम्प्यूटरशी दोस्ती झाली
          छानच मिळाला हा दोस्त
          नवे ज्ञान नि नवी माहीती
          देत असतो हा माझा दोस्त
याशिवाय ' पावसाची जादू ', ' दिवाळी , ' माझे आबा ', ' माळी दादा ' या कवितांदेखील मुलांच्या तरल भावनांचा सहजसुंदर आविष्कार आहेत.
           एकूणात ' मस्त फिरु रे मस्त फिरू ' मधील कवी अरूण देशपांडे यांची ही बालविता म्हणजे मुलांच्या भावविश्वाचा समरसून घेतलेला वेध आहे. संस्कारक्षम बोध देऊन मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडण - घडण करणे,हे बालसाहित्य लेखनाचे प्रयोजन असते. टोकदार संवेदनशीलता, बालमानसशास्त्राचा अभ्यास , सुक्ष्म निरीक्षणशक्ती आणि प्रतिभेची साथ असल्यावरच मुलांच्या अंतर्मनातील स्पंदनांचा समर्थ वेध घेतला जाऊ शकतो. कवी अरुण देशपांडे हे करण्यात  यशस्वी झाले आहेत. हेच त्यांचे यश आहे....


 *मस्त फिरु रे मस्त फिरू*  : *बालकविता* 
कवी                       :  अरुण वि.देशपांडे
प्रकाशन                   :  नंदिनी प्रकाशन, पुणे .
पृष्ठे                         :   ३२
मूल्य                       :   ४० रु .




परीक्षण
उमेश मोहिते ,
माजलगाव जि. बीड
भ्र. क्र. ९४०५०७२१५४
🌷🙏🏻🌷

पुस्तक-परिचय लेख- बालगीत संग्रह - रंगीत रंगीत रानफूल ",- कवी- बालाजी मदन इंगळे

पुस्तक-परिचय लेख- 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------
बालगीत संग्रह - 
रंगीत रंगीत रानफूल ",
- कवी- बालाजी मदन इंगळे 
--------------------------------------------------------------
मराठी कवितेतील सर्वपरिचित कवी-व्यक्तिमत्व -बालाजी मदन इंगळे यांचा पहिला बालगीत संग्रह "रंगीत रंगीत रानफूल " नुकताच प्रकाशित झाला आहे. मोठ्यांच्या कवितेतील एक मोठे नाव ",अशी ओळख ..कवी-बालाजी मदन इंगळे या काविमित्राची आहे यात आणखी एका नव्या आणि छान ओळखीची भर पडली आहे .ती म्हणजे या कवीच्या बालगीतांची समृध्द अशी भर बाल्कुमारांच्या साहित्यात पडली आहे.
आदरणीय विजया वाड आपल्या प्रस्तावनेत या बालगीतांच्या बद्दल लिहितात की ..
" बालाजी मुलांच्या जगात मस्त मुशाफिरी करणारे कवी आहेत. मुलांना निसर्ग आवडतो तसाच डोरेमोनही  !
मुलांची आई म्हणजे हळवा कोपरा तर खोड्या म्हणजे आवडती खेळी . कविराज ,आपले "रंगीत रंगीत रानफूल " मुलेच काय मोठेही वाचतील नि मग गाता गाता नाचतील "..

या संग्रहात असाच बालगीतांचा समावेश आहे..मुलांना आवडणार्या विषयावरील कविता असल्यामुळे बालमित्र या पुस्तकात सहजपणे रमून जातील हे नक्की.
४८ पानांच्या या संग्रहात एकूण ३४ कविता आहेत .गंमत गाण्यापासून ते संस्कारक्षम कविता हे संग्रहाचे विशेष आहे.
झाडे ,पाने,फुले आणि फळे ही आपल्याला लाभलेली निसर्ग देणगी .. खूप काही देणारे झाड काय सांगते बघा..

"आधी मुळा जमिनीत रोवा 
 मग वरती झाड पुलवा 
आधी पाया मग कळस वर जाय  ||
प्रत्येक झाड ऐका सांगते काय 
जीवनाचे मर्मच जणू या कवितेतून उलगडून दाखवले आहे. (पृ..४३ ),

आपल्या मनाची मोठी गम्मत असते..स्वप्ने पहाणे , काही बनावे वाटणे हे त्यातच आले .कधी हे तर कधी ते..
अशा या कवितेत ..कवी आपल्या बाल मित्रांना म्हणतोय .काही वाटू द्या .पण शेवटी..महत्वाचे आहे ते.हे की 
" शेवटी वाटले मला
   आधी अभ्यास करुया 
   मग जे व्हायचे आहे 
   ते आपण होऊ या  ", ( कधी वाटते मला ..पृ..३९ ),
आपण विदार्थी म्हणून आपले अभ्यास कर्तव्य पार पाडू या , मग बाकीचे ..हे गोष्ट एक शिक्षक असलेला कवीच इतक्या छान कवितेतून सांगू शकतो.

अभ्यास आणि परीक्षा ..हे वेळापत्रक नाही म्हटले तरी खूप थकवणारे ,मन  कंटाळून जाणारच की..अशावेळी सुट्टीचे येणे म्हणजे आनंदास उधाण येणे.. त्याची ही कविता ..
या कवितेत ..खेळ खेळू , वाचन करू " हा संस्कार संदेश कवी देतो आहे .
" कॅरम खेळू 
   क्रिकेट खेळू 
   नव्या नव्या 
   कविता वाचू 
  आता नाचू बूमबूम  बूम ....( बुमबूम बूम ..पृ..३३ ),

गावाकडे गेल्यावर शेत-शिवार खुणावते ..हे ओढ मनाला धावायला लावते .या शिवारात काय आहे नेमकं ..त्याचे हे सुंदर कविता रूप...

गच्च पीक भरात 
धुंद वास शिवारात ||

गाय हम्बरे यादीनं
धावे वासरू ओढीनं 
उड्या मारू रानात 
धुंद वास शिवारात   || ...( धुंद वास शिवारात ..पृ,२७ ),

"शेतकऱ्यांचे मित्र "या कवितेत  " बैल ,गाय , साप, गांडूळ, पाखरं " या मित्रांबद्दल खूप छान लिहितांना कवी म्हणतो..
"अशा मित्रांसोबत 
करी  हसत चाकरी 
कसून सारे रान 
जगा देई भाकरी . ...( पृ..१५ ),

आपल्या चालण्यासाठी कधी रस्ता असतो तर कधी असते पाऊलवाट..या पाऊलवाटेची खूप अर्थपूर्ण कविता ..
" पायाखालची 
  पाऊलवाट
 सर्वांना दाखवते 
 आपापली वाट ....(पृ..७  ),
या शिवाय मुलांना आवडतील अशा गम्मतशीर कविता या पुस्तकात आहेत..
" पोहे करू ", ( पृ.५ ) , एकावर एक ( पृ.१४ ), एव्हढा मोठा रेडा "..(पृ..२३ ),  " शनिवार एके शनिवार (पृ. २४ ),
"चिक्या आणि बब्या (पृ. २८ ), "चक्रम  "...(पृ.२९ ),
या शिवाय १० चित्र -कोडी असलेली  "ओळखा पाहू कोण ? ही कविता खूप आवडेल.
आपणा सर्वांना वंदनीय असणारे "छत्रपती शिवाजी " , आणि डॉ.भीमराव आंबेडकर " या दोन महापुरुषांच्या चरित्र कविता खूप बोधक आणि प्रेरक आहेत .
कवी-बालाजी मदन इंगळे यांच्या लेखन-प्रवासात प्रस्तुत बालगीत लेखनाचे मोठेच योगदान राहील.त्यांच्या लेखनास शुभेच्छा.
हा बालगीतसंग्रह सर्वांनाच आवडेल असा सुरेख स्वरूपात आहे .याचे श्रेय ..चित्रकार -प्रमोद दिवेकर यांच्या आकर्षक सजावटीला द्यावे लागेल.
प्रकाशक -दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशनाने  "रंगीत रंगीत रानफुले " बालगीत संग्रह प्रकाशित केला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख- 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------
कवी- बालाजी मदन इंगळे 
संपर्क -९८८१८२३८३३ 
---------------------------------------------------
बालगीत संग्रह - 
रंगीत रंगीत रानफूल ",
कवी- बालाजी मदन इंगळे 
पृ. ४८ , मूल्य- रु. ६० /-
प्रकाशक -
दत्ता डांगे -इसाप प्रकाशन नांदेड.
संपर्क - ९८९००९९५४१ 
--------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख- कविता संग्रह- माझे तुला नि:शब्द शब्द ,कवयित्री - पुष्पांजली कर्वे.

पुस्तक-परिचय लेख-  
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------
कविता संग्रह- माझे तुला नि:शब्द शब्द ,
कवयित्री - पुष्पांजली कर्वे.
-------------------------------------------------------------------------------------
शब्दातून व्यक्त होण्याचे माध्यम कविता ", आणि जेंव्हा कविता नि:शब्द करणारे शब्द घेऊन आपल्याला भेटते तेंव्हा शब्दांचे सामर्थ्य म्हणजे काय नि ते किती असते याची शब्दातीत प्रचीती येऊन जाते . कवयित्री पुष्पांजली कर्वे यांचा  " माझे तुला नि:शब्द शब्द " या शीर्षकाचा कविता संग्रह नुकताच वाचून झाला ,अनेक कविता मनात रेंगाळत राहिल्या आहेत.एक छान कवितानुभूती दिली या कवितांनी.

कवयित्रीचा हा पहिला कविता संग्रह आहे म्हणून काही तो एका नवोदित कवीचा संग्रह आहे असे मुळीच नाहीये , कारण पुष्पांजली कर्वे यांचे कविता लेखन रसिक वाचकांच्या अगोदर  पासूनच परिचयाचे आहे , लिहून झालेल्या कवितांचा  प्रकाशित झालेला "त्यांचा पहिला संग्रह आहे" असे म्हणू या.

या संग्रहासाठी "चार शब्द " लिहिले आहेत जेष्ठ कवयित्री  आसावरी काकडे , संग्रहाच्या ब्लर्ब वर या कवितेबद्दल लिहिलेले शब्द आहेत कविवर्य अशोक जी बागवे सरांचे .. या शिवाय मनोगतात ...
स्वताच्या कवितेबद्दल ..कवयित्री अगदी सविस्तरपणे  व्यक्त होते ..,ही तीनही मनोगत आवर्जून वाचावीत  अशीच आहेत ..कवी,कविता आणि कविता लेखन ..या बद्दल खूप समजून घेण्यासारखं वाचण्यास मिळतं .

इंटरनेट या माध्यमामुळे ..लेखक आणि कवी यांचे साहित्य मोठ्या वेगाने वाचकांच्या पर्यंत येत असते .आणि या लेखनास प्रतिसाद मोठ्या प्रमाणत मिळत असतो . कवयित्री म्हणते की  " आपल्या स्वताच्या  ब्लॉगवर -कविता शेअर करतांना  त्यांच्या कवितांना  -त्यातही ..प्रेम कवितांना खूप मोठा प्रतिसाद मिळत गेला , नव्या पिढीतील वाचकांनी अभिप्राय दिले ." 
 कवीच्या लेखन [-प्रवासातील हे मोठीच आनंददायक गोष्ट आहे.

कविता निर्मिती , कवितेचे मनातून कागदावरती उतरणे , रसिकांचा प्रतिसाद मिळणे ..हा अनुभव घेतलेल्या या कवयित्रीला आपला कविता संग्रह यायला हवा " असे वाटणे हा खरे तर महत्वाचा टप्पा ,यात देखील कवयित्रीला यश आले आहे असे प्रस्तुतचा कविता - संग्रह वाचून वाटले. 
" माझे तुला नि:शब्द शब्द " , 
१४४ पानांच्या या कविता संग्रहात कविता संख्या १०१ आहेत , प्रेम कविता या जास्त आहेत ..त्यामुळे "प्रेम कवितांचा संग्रह " असे ठळकपणे म्हणता येईल .काही कविता सामजिक जाणीवेच्या , स्त्री"जाणीवेच्या आहेत., शेवटी ८ कवितांचा " कणिका " हा छोटासा विभाग आहे .
प्रेम कविता जास्त आहेत म्हणजे ..या कवितेत एक "तो "आहे आणि एक "ती " आहे ..आणि या कवितेतून "ती" व्यक्त होते ..प्रेम विषयी तिला काय काय वाटतंय ..हे सर्व शब्दरूप ..ज्याच्या साठी कविता आहेत..त्याला नि:शब्द "करून टाकतात .
कारण .
.शब्दांना माहिती आहे 
आपल्या आतलं भांडण
तुझ्या माझ्या नजरेतलं
दाटलेलं  नभांगण 
नभांगण बरसातांना 
शब्द असतातच कुठे 
तेंव्हा फक्त तुझ्यामाझ्या 
प्रेमाला मिठीच कोंदण ....( शब्दांना माहित आहे ..पृ..७४.,), 

एकमेकांना शब्द दिले ,ते हवेत विरून जाणारे नाहीत ..ते कसे आहेत ...
याची जाणीव करून देणारी ही छान कविता..
 " तुला दिलेले शब्द सहज दिलेले नाहीत 
ती वचनं आहेत
मी ती कळ्यासारखी माळली आहेत 
तू मोरपिसासारखे खोवून ठेव
जेंव्हा कधी माझी स्य येईल 
उशाजवळ पसरून ठेव ....  ( तुले दिलेले शब्द ...पृ..६७ ),,,


प्रेम भावनेचा आदर होत नसेल ..मन दुखावले जाते ..त्याची ही कविता ..
अन 
गुंतलेल्या श्वासांना 
धुरांच्या लाटांवर 
सोडून द्यावे 
अगदी तेव्हड्याच अलिप्ततेने 
दूर लोटून देतोस..!
किती सहज सिगारेट 
तुझ्या ओठांवर जळत असते ...!
अन मी ...?
आत अंतस्थी विझत असते ...!  ...( सिगारेट ..पृ.८७  ),

कधी कधी ..प्रेम " म्हणजे नेमके काय ..? समजत नाही की उमजत नाही ..गोंधळच असतो सगळा ,

" खर तर साद प्रतिसादाची भाषा 
उमजल्या शिवायच काही निर्णय 
आपसूक होऊन जातात ...
त्यालाच " प्रेम " म्हणतात ..!     (त्यालाच "प्रेम " म्हणतात ..पृ..५५ )

प्रेम म्हणजे आधार , प्रेम म्हणजे विस्वास ..आणि प्रेमात पडल्यावर "नवे वेड लागते " .
मग मनाची अशी अवस्था होणारच ,
" तू दिसला नाहीस की 
किती शंका भीतीचे काळे ढग
मनात दाटायचे
मग मनातले डोळ्यातून बरसायचे ..,  . ( तू दिसला नाहीस की ..पृ.४७ ),.
.
आलेला पाउस , बरसणाऱ्या धारा .आणि प्रेमी जीवांच्या मनातला विरह यांचे अतूट असे नाते आहेच..
विरहाच्या कला मनाला सोसवत नाहीत ..मग असे होते या मनाचे..
" दाटुनी नभात जेव्न्हां
  घन व्याकुळ रडले 
  साद माझीच ती 
  एक तू..
  आक्रोश धारांत रे....    .( घन निळे ..पृ...४१ ),

अशा वेळी आठवतात त्या झालेल्या भेटी...

" किती भेटी झाल्या 
मोजदाद नाही..
त्या थांबल्या वेळा तिथेच 
थोड्या पापण्यात कैद 
 अन आलिंगनात काही ...!    ( किती भेटी ...! पृ.१९ )
हे सारे विसरण्याच्या पलीकडचे आहे ..मनाच्या नि:शब्द अवस्थेत अनुभवावे असे...
....त्याची ही कविता अशी होते..
परि -
पाहून रंग 
तुझा तृप्त 
मनी अतृप्त 
मी न राहते 
ठाऊक असे मजला 
आतला रंग , रंगातला ...    .( सांग कसे विसरायचे ...पृ..२३ ),

अशा अनेक प्रेम कविता या संग्रहात आहेत..काही शीर्षके -क्षण काही वेचलेले " (२० ), उगवाव म्हणते तुझ्यातून ..(२५), , "आज कित्ती कट्टी दिवसांनी ..(२९ ), ऎक ना ..! (७९ ), " तू उमलतो ..(९२ ) ,
त्याच्या उबदार श्वासावर..." (६८ ), ," प्रेम तुझा रंग कसा ..? (६० ),
या कविता संग्रहात
स्त्री -जाणीव विषय खूप  कविता आहेत..त्यांची शीर्षके -
"सखे " (१०७ ), " जिथे घराच्या भिंतीत ..(११६ ),  "ती ...(पृ.११७ ),  " एकेकीच्या अश्रुमागे (१२१ ),,

 कवयित्री पुष्पांजली कर्वे  यांच्या काव्य लेखनाचा भावसुंदर ,भावपूर्ण असा लेखन अविष्कार म्हणजेच त्यांचा हा कविता संग्रह आहे.  , प्रेम भावना संयमित रुपात अधिक भावणारी असते " ,सावरणे , विस्वास असणे , उमजणे आणि समजणे ,समर्पण ..या आशयाच्या कविता आणि यातली  भावपूर्ण शब्द योजना  कवितेला अधिक अर्थपूर्ण बनवते, निर्मल भावपूर्ण कविता " असे या कवितांचे वर्णन करावेसे वाटते .
कवयित्री पुष्पांजली कर्वे ..यांच्या पाह्लिया कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत..आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पुस्तक-परिचय लेख-  
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------
कविता संग्रह- माझे तुला नि:शब्द शब्द ,
कवयित्री - पुष्पांजली कर्वे.
९८९२६६७४८२ 
पृष्ठ - १४४ , मूल्य-रु.१५०/-
---------------------------------------------------------------
प्रकाशक - शारदा प्रकाशन 
नौपाडा -ठाणे 
संपर्क - ९८२०१७६९३४ 
---------------------------------------------------------

Saturday, April 7, 2018

मस्त फिरू रे मस्त फिरू साठी आलेला अभिप्राय

ज्येष्ठ बालसाहित्यकार अरुण वि.देशपांडे, पुणे यांचा 'मस्त फिरू रे मस्त फिरू' हा नवाकोरा  बालकुमार कवितासंग्रह आज घरी पोहचला.
 मुलांची मनं आनंदीत आणि सुसंस्कारीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांची कविता करते. मुलांचा ज्ञानविस्तार वाढवते.
खरे वाटो की खोटे कुणा
खरेच सांगतोय रे बाबा
काॅम्प्युटर मस्त वापरतात
माझे लाडके आबा....
....असं सहज लिहून जाणारे, आजची बालकविता लिहिणारे, मुलांचे लाडके देशपांडे आबा. त्यांच्या या नव्या पुस्तकासाठी त्यांना खूप शुभेच्छा आणि
अभिनंदन.

एकनाथ आव्हाड.

Thursday, March 15, 2018

कथा लेखकास अभिप्राय पत्र -




कथा लेखकास अभिप्राय  पत्र - कथा-शर्मिष्ठा - ले- सुरेश एस. वैद्य 
-अरुण वि.देशपांडे 
--------------------------------------------------------------------------------------------

मित्रवर्य श्री.सुरेशराव वैद्य 
आपण आवर्जून पाठवलेली कथा  "शर्मिष्ठा " ,वाचून झाली , ,   

आपण सफाईदारपणाने लेखन करू शकणारे लेखक आहात , कुबेर समूहाच्या  "आरंभ " कथा लेखन उपक्रमात त्याची प्रचीती मला आणि कुबेरकर वाचकांना सुद्धा आलेली आहे .
लेखकाच्या  लेखन कौशल्याबद्दलची अशी  माहिती असणे वाचकाला एक प्रकारे मदतच असते  लेखकाच्या साहित्य्कडे आस्थापूर्वक पाहण्याची  अनुकूल दृष्टी वाचकांच्या मनात अगोदर पासूनच असते , त्यामुळे लेखकाच्या लेखना बद्दल  दुषित दृष्टीकोन निर्माण होण्याची शक्यता नसते .
सुरेशराव ..या सगळ्या गोष्टींचा फायदा तुमच्या लेखनाला नक्कीच झाला आहे, 

 शर्मिष्ठा "ही प्रस्तुत कथा ..वाचनीय आहेच याला कारण  तुमची .कथा लेखन शैली ..जी एक वेगवान कहाणी सांगते . कथा वाचत असतांना   .ही  एखाद्या सिनेमासाठी ची मसालेदार कथा  आणि पटकथा वाचतो आहे  आहे असे वाटत होते , कारण ..सिनेमाची ..फिल्मी कथा ..ही वाचकांना आवडेलच  " असे गृहीत धरून लेखक लिहित असतात  अस्शीच लेखन-युक्ती तुम्ही शर्मिष्ठा ही कथा लिहितांना केली आहे असे  मला वाटते , 

मैत्री ,मित्रांच्या  मनात एकमेकाबद्दल असणारा स्नेहभाव , प्रसंगी असीम त्याग करण्याची तयारी . दोस्ती की खातीर  काय पण .." हे सगळे गुण , आणि स्वभाव विशेष तुम्ही तुमच्या कथेतील व्याक्तीरेखातअगदी  ठासून भरलेले  आहेत..
विराज -शर्मिष्ठा , निखील -देविका या चार जोड्या, त्यांची जीवन कहाणी तुम्ही नायिका .शर्मिष्ठा हिला केंद्र साठ्नी ठेवून सदर केली आहे , या कथेत जे घडले आहे ते, लेखक ..निवेदन करून सांगतो ,त्यामुळे वाचकाला काय चालले होते हे फक्त समजते  ,
 विराज -निखील , शर्मिष्ठा आणि देविका ..या व्यक्तिरेखा समोर समोर येवून ,एकमेकाशी बोलत आहेत , असा प्रसंग या कथेत येत नाही .विराज -शर्मिष्ठा , देविका आणि निखील ..खरे तर या युगल जोड्या ,त्यांचे प्रेम आहे एकमेकावर , लग्न ठरलेले आहे .त्यांचे .आणि नियती (लेखकाने ठरवल्या प्रमाणे ) मोठच आघात या चौघांवर करते .
आपल्या जिवलग मैत्रिणी साठी -..शर्मिष्ठा साठी हे दोघे अतिशय कठीण असे निर्णय ..इतक्या सहजतेने आणि पटापट घेऊन टाकतात की..त्यांच्या मनोवृत्तीचे कौतुक वाटल्या शिवाय राहत नाही. देविका आणि निखील यांच्या सारख्या त्यागमूर्ती वास्तव जीवनात अतिशय दुर्मिळ आहेत ,म्हणूनच तुमच्या कथेतील व्यक्तिरेखा वाचकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या आहेत असे म्हणता येईल 

 कथानकात आढळणारे योगायोग , आकस्मिक आपतीकारक घटना , कथानकाच्या सोयीनुसार नायक-नायीकंना होणारे स्मृती -भृंश , विस्मरण , दाखवण्यात येणारे काल-मान , वर्ष -गिनती , या सगळ्या गोष्टीत सुसंगतपणा असायला हवा " याला महत्व न देता सोयीचे तेव्हढे सोयीने समोर ठेवायचे .त्यामुळे स्टोरी  मनाला भिडली नाही ,तरीपण प्रेक्षक त्यात गुंतून जातो , तसेच तुमच्या शर्मिष्ठा "या कथेबद्दल म्हणता येईल .वाचक या कथेत गुंतून जातो याचे कारण तुमच्या लेखनाची फिल्मी शैली 

शर्मिष्ठा "या मैत्रिणी साठी देविकाने खूप मोठा त्याग केला आहे . हे निर्णय घेतांना .देविका आणि निखील यांच्या मनाची काय स्थिती झाली असेल ? मनातील विचारांचे आंदोलन , घालमेल , प्रेम असतांना ,त्याचा त्याग करून दूर जायचे ..निखील च्या मनात काय काय चालू असेल ? आयुष्य उध्वस्त करणारे हे निर्णय .. व्यक्तीच्या मनाचा असा भावनिक वेध घेणे लेखक म्हणून तुमच्या कडून  राहून गेले आहे "असे जाणवले  

असो ,  कथा लेखनाचा तुमचा हा लेखन प्रयोग जमून आलेला आहे.वाचकांनी सुद्धा या कथेला खूप छान अभिप्राय दिले आहेत , यातून तुमच्या कथा लेखनास प्रेरक प्रोत्साहनच मिळणार आहे .तुमच्या लेखनाचा मी नेहमीच वाचक असणार आहे. तुम्हाला लेखन शुभेच्छा.
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे -पुणे.

Sunday, February 11, 2018

पुस्तक परिचय लेख- जीवंनभान देणारी किशोर कादंबरी - जोकर बनला किंग मेकर

पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------

जीवनभान देणारी किशोर कादंबरी - जोकर बनला किंगमेकर 
--------------------------------------------------------------------------

साहित्य हे संस्कार करणारे प्रभावी असे माध्यम आहे , मोठ्यांचे साहित्य , मुलासाठींचे साहित्य ,या दोन्हीतूनही समाज-मनावर संस्कार करण्याचे कार्य फार पूर्वीपासून चालत आलेले आहे .प्रत्येक पिढीत असे संस्कार -कार्य करणारे आपल्या भोवती असतात . त्यांची तळमळ कधी कार्यातून तर कधी लेखनातून दिसत  असते , याच भावनेने साहित्यिक संजय वाघ यांनी किशोर - मित्रांसाठी अतिशय सकारात्मक आणि जीवनभान देणाऱ्या अशा 
"जोकर बनला किंगमेकर या कादंबरीचे लेखन केले आहे.

या कादंबरीचा नायक विनू ,  त्याच्या दुर्दम्य आणि सकरात्मक जगण्याची प्रेरक  लढाई  " हे या किशोर कादंबरीचे कथानक आहे , माणसाला माया, प्रेम, जिव्हाळा ,या भावनांचा स्पर्श झाला की त्याला त्याच्या जगण्याचे उद्दिष्ट सापडते, हे मनस्पर्शी सूत्र या लेखनाचे आहे असे जाणवत रहाते .

विनू या कादंबरीचा  नायक - तो दिव्यांग आहे, तरी त्याच्या मनात अफाट जिद्द आहे, परिश्रम करण्याची त्याची तयारी आहे ,या गुणांनी त्याचे बाह्य व्यक्तिमत्व जितके वेगळे आहे त्याहून त्याचे अंतरंग  , त्यातील भावना आपल्या मनाला भिडणार्या आहेत , हे या विनूच्या व्यक्ती रेखेचे विशेष आहे.

लेखक संजय वाघ यांची लेखन शैली वाचकांच्या मनाला हात घालणारी आहे, साध्या सोप्या भाषेतून भोव्तालीचा परिसर ते साक्षात उभा करतात ,विनूच्या अनेक व्यक्ती सोबतच्या भेटीचे प्रसंग असो, वा एखाद्या घटनेबद्दल विनूच्या मनात येणारे विचार असो , हे सारे शब्दातून व्यक्त करतांना लेखक संजय वाघ  विनूच्या व्यक्तिरेखेशी समरस होऊन वाचकाला सुद्धा विनूच्या परिवारातील एक मेंबर बनवतात.

"बुटका मुलगा "- ही विनूची ओळख वरपांगी आहे, त्याच्या सहवासात आलेल्या व्यक्तीला काही क्ष्णाताच विनूच्या मनाची विशालता कळते , विचारांची उंची जाणवते, त्यानंतर समोरचा "परका ",विनूचा जवळचा मित्र बनून जातो .
बुटका विनू ", भले ही लोकांच्या चेष्टेचा विषय होत आला आहे, पण त्याच्या मनाच्या मोठेपणावर ,त्याच्या रूपाच्या "खुजेपाणाचा  " काही परिणाम तो होऊ देत नाही, विनूच्या स्वभावाचे हे खूप मोठे वैशिट्य आहे.

नायक "विनू.. सर्कशीत नोकरी करतो, सर्वांच्या दृष्टीने तो एक "जोकर " बनतो . सर्कशीतील त्याचे जोकर बनून काम करणारे सहकारी देखील विनूच्या सहवासात मनातून बदलतात, हा चमत्कारिक बदल घडवून आणणारा विनू त्याच्या "जोकर-मित्रांना सकारात्मक जगण्याचे धडे शिकवतो , ते फक्त बोलघेवडे ज्ञान नाही , तर प्रत्याक्ष्य कृती करून , आचरणातून विनू ते दाखवून देतो.. हे क्रियाशील वर्तन-संस्कार नायक विनू " सतत करीत असतो .

छोट्या छोट्या प्रकरणातून विनूची जीवन कहाणी लेखकाने अतिशय आपलेपणाने लिहिली आहे .त्यामुळे  " मनाला भिडणारे लेखन कसे असावे ", याचे छान उदाहरण म्हणजे संजय वाघ यांची "जोकर बनला किंगमेकर " ही किशोर कादंबरी आहे , असे म्हणणे अयोग्य  ठरणार नाही.
विनू आणि त्याच्या बाबांच्या आठवणी , विनूच्या बाबांचा आकस्मिक मृत्यू , या घटनेचा झालेला खोल परिणाम, आई आणि तिचा लाडका विनू , त्यांचे एकमेकांशी असलेले कमालीचे प्रेमळ नाते हे वाचतांना मन गलबलून आल्याशिवाय रहात नाही.

सर्कशीत नोकरी करीत असतांना भेटलेले  रामुकाका , मनेजर दिवाकर साहेब, विनुला भकासवाडीला  भेटलेले बाल मित्र ", अशा अनेक व्यक्तिरेखा म्हणजे .."जगात अजूनही सज्जन-सच्छील ,निर्मल मनाची माणसे आहेत ", या भावनेला अधिक दृढता \देणाऱ्या आहेत.
भकासवाडीचे झकासवाडी  होणे ", हे किती अवघड होते ,  आणि हा सगळा बदल घडवून आणतांना विनूने किती वेगवेगळ्या पातळीवर लढे लढले , त्याची विस्मयजनक कहाणी म्हणजे "जोकर विनूचा" किंगमेकर होण्याचा प्रवास आहे.

इष्ट-अनिष्ट, सुष्ट -दुष्ट , भले-बुरे ,चांगले -वाईट , मानवी -स्वभावाच्या काळ्या-पांढऱ्या बाजू या कादंबरीत  आहेत त्यातूनही लेखक सजगतेने संस्कार संदेश देतात .
संजय वाघ लिखित ही किशोर कादंबरी वाचणे हाच एक वेगळा अनुभव आहे, त्यासाठी जोकर बनला किंगमेकर " ही किशोर कादंबरी वाचायलाच हवी .
दिव्यांग नायक विनू ",भले ही बुटका असेल, त्याचे आदर्श असणे, त्याला खूप मोठ्या उंचीचा माणूस बनवते, अशा या "हीरोला , "जोकर "कसे म्हणायचे ? हा प्रश्न वाचकांना नक्कीच पडेल  . लेखक संजय वाघ यांना हेच अपेक्षित असणार.
पुढील लेखनासाठी त्यांना शुभेच्छा.

चपराक प्रकाशन- पुणे  आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांनी या छान किशोर कादंबरीचे प्रकाशन केले आहे .
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------
जीवनभान देणारी किशोर कादंबरी -
जोकर बनला किंगमेकर "
पृ. ६४, मूल्य- रु .५० /- 
--------------------------------------------------------
लेखक- संजय वाघ -नाशिक 
संपर्क- ९९२२९०४०७२ 
----------------------------------------------------------------
प्रकाशक - चपराक प्रकाशन ,
संपर्क- ०२०-२४४६०९०९, ७०५७२९२०९२ 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, December 28, 2017

पुस्तक-परिचय लेख- ले- अरुण वि.देशपांडे . पुणे.- कविता संग्रह - जमाना बदलल्याचं चिन्हं दुसरं काय ?

पुस्तक-परिचय लेख- ले- अरुण वि.देशपांडे . पुणे.
----------------------------------------------------------------
मनाला भिडणाऱ्या कवितांचे एक अनोखे भावविश्व "
कविता संग्रह -
 जमाना बदलल्याचं चिन्हं 
दुसरं काय ?
----------------------------------------------------------------
कविमित्र प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ( सागर ), यांचा कविता संग्रह - जमाना बदलल्याचं चिन्हं दुसरं  काय ?
संग्रहाचे  शीर्षक वाचकांच्या मनात एकाच वेळी अनेक भाव-प्रश्न उभे करून जाणारे आहे आहे असे मला वाटते ,  एखाद्या भावनिक अशा  क्षणी आपण सहज म्हणून जातो ..आता आपल्या हातात काय राहिलंय ? ,जमाना बदललाय दुसरं काय !,
कधी कधी सभोवतालची विलक्षण वेगाने बदलत जाणारी परिस्थिती पाहून आपण मनोमन स्तब्ध होतो, नि:शब्द होतो ..अशावेळी एकच स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आपल्या मनात उमटते  ती म्हणजे ..अहो काय सांगावे..
जमाना बदलल्याचं  अजून दुसरं चिन्हं आणखी काय हवं ?

मित्रांनो .संग्रहाच्या शीर्षकाने कविता अर्थाच्या शक्यतेची  अशी आवर्तने निर्माण केली ..त्यामुळे  वेगळ्या आस्वादात्मक पातळीवरून या कवीच्या कविता वाचतांना एक छान कविता अनुभव आला हे सांगावेसे वाटते.
११९ पृष्ठांच्या संग्रहात एकूण ९२ कविता आहेत ..आणि चार विभगात या कविता आहेत. पहिल्या भागात आहे -
झाड, निसर्ग , शेती - या विषयावरच्या २५ कविता ,
दुसऱ्या भागात -२५ गेय कविता आहेत ,तिसऱ्या विभागात - ३२ - मुक्तछंद आणि मी विषयक कविता आहेत , आणि शेवटच्या  चार कविता या  " स्त्री जाणीवेच्या कविता " असे ठळकपणे सांगितलेले आहे.

संग्रहाच्या आरंभी कवीचे मनोगत हे त्याच्या "व्यथित मनाची घालमेल " आहे हे कळते .आणि आपल्या मनाची ही घालमेल ..मोठ्या व्यथित मनाने कवीने विविध कविता-रचनेतून यथायोग्य शब्दातून व्यक्त केली आहे ..हे या संग्रहातील कवितेचे ठळक असे वैशिट्य आहे. या मनोगतातील कवीच्या मनातले पुन्हा इथे सांगणे ..योग्य होणार नाही,  हे सगळे मनोगत संग्रह आस्वादन करतांना वाचले तर ते कवीच्या कविता प्रवासाबद्दल नेमकेपणाने सांगते आहे हे जाणवेल.

संग्रहाच्या शेवटी " क्षीरसागरांची कविता = एक रसास्वाद  कवी प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितेबद्दल अनेक मान्यवरांचे  अभिप्राय वाचावयास मिळतात ..यातून कवी क्षीरसागर यांच्या कविते बद्दल खूप चांगले आणि महत्वाचे असे जाणून घेता येणे शक्य झालेले आहे .
प्रस्तुत संग्रहातील कवितेबद्दल आणि कवी बद्दल --
प्रा.श्रीकृष्ण अडसूळ , मडगाव - यांनी संग्रहाच्या ब्लर्बवरील  आपले मत नोंदवतांना म्हटले आहे की -
" एकविसाव्या शतकातील जीवनाचं कृषीकेंद्रित अशा ग्रामजीवनाचं विविधांगी आणि अर्थपूर्ण दर्शन घडविणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितेची भाषा नागरसन्मुख आहे ".

संग्रहातील काही कविता अंश ..
झाड ,निसर्ग, शेती 
-------------------------------------
कविमन  मन निसर्गाशी संवाद साधणारे आहे, त्यांच्यातील नाते जीवाभावाचे असे दृढ आहे .म्हणूनच निसर्गातील दुखांचे हुंकार त्याच्या कवितेतून उमटतात ..अशा काही कविता ..
१.
" कटाच काढला 
 जरी माणासाने 
 झाडे गाती गाणे 
सुखाचेच 
जगतात झाडे 
माणसासाठी 
मरणाच्या गाठी 
घेऊनच .....( पृ....२० )
२,
त्यांचे सर्द दर्द मौन 
दंवातुन पाझरत
तेंव्हा नकळत  झाड 
गदगदून उठते ....( वेदना फुलांच्या ..पृ..१६ ),
३.
झाडं व मुली वयात आल्या की 
माणसांच्या नजरा वखवखू लागतात '
त्या नजरांनीच ती लागतात सुकू ...
त्यांच्या नजरा बाद करतील 
तो दिवस दूर नाही,
मित्र असलेला माणूस वैरी झाला 
आता त्यांची खैर नाही ....( माणसांची खैर नाही  पृ..३९ )

काही गेय कविता -अंश पाहू या ..
१.
वेचून घेतो | काळोख थोडा ||
सांजवेळी मी | नदीकिनारी  ||
गूढ बोलणे | झाडावरती  ||
अस्वस्थ होतो  | नदीकिनारी  || ( नदीकिनारी ..पृ.४४ ),
२.
या फुलांना समजावतो मी
दुखः: हे दावू नका 
काटे जरी सोबतीला '
गंध गुपित ठेवू नका .... (नका .. पृ..४९ ),
३.
ते थेंब नभीचे गंधित झाले 
ते शोषले कुणी ?
झाडांनी ? , कळ्यांनी ? नाही 
वाऱ्याने ? नाही ..फक्त माणसांनी ...( ते थेंब नभीचे ..पृ..५५ ),

मुक्तछंद आणि मी विषयक काही कविता 
१.
हे आख्खं शहर आता 
डस्टबीन बनण्याच्या 
मार्गावर निघालाय 
प्रदूषित चेहेरयाची अन 
मनाची ही माणसे ,
घालतात आताशा 
धूर आणि धुळीचेच मास्क ...( अस्तित्व ..पृ.६७ ),
२.
आता आईबापचं देतात 
मुलाबाळांना , लेकीबाळींना 
मोबाईल , इअरफोन , हेडफोन 
कोंबतात ते रात्रंदिवस कानात 
जमाना बदलल्याच चिन्हं 
दुसरं काय  !      ( शीर्षक कविता ...पृ..७० ),

३.
माझ्या गावाच्या भूमीत 
आता बदलते जग 
गेली शेती ,गेली बैल 
करी भुई तगमग 
माझ्या गावाच्या भूमीत 
नाही माडांचे ते बन 
नाही दर्या जरी तिथे 
लोकांचे निर्मल मन ...( माझ्या गावाच्या भूमीत ..पृ..८१ )
४.
जगणे जमत नसतांनाही 
जगतात इथे माणसे 
मरणाची इच्छा नसताही 
मरतात जिती माणसे ....( धडपड .पृ.९७ ).
५.
भोवताली हाव वसले की 
रस्त्याला हटविले जाते 
ही शिक्षा असते जणू 
रस्त्यालाच 
पिकांना हटविल्याची .....(शिक्षा ..पृ..१०२ ),,
६,
जाहले अंगण रिते 
मनातही काही नाही 
दानतीचे कुठे कोणा 
आपलेच भागत नाही ...( आपलेच भागत नाही ...पृ.१०५ ),


तर असे आहे प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ..(सागर ) या कवीचे ही भावविश्व .आणि त्यातल्या आयुष्याचे हे प्रतिबिंब कवीचे न वाटता आपले चित्र वाटू लागते ..याचे कारण यातील कवीची खंत , त्याच्या मनाला घेरून राहिलेली निराशा , निसर्गाशी असलेले नाते आणि आता या नात्याच्या  झालेली फरपट पाहून मनाला होणारी वेदना ..हे एकट्या फक्त कवीची राहत नाही तर ती तुमची आमची, माझी ..अशी सर्वांची आहे ,हे असे वाटायला लावणारी ही कविता ..आणि हा कवी ..आपला मित्र वाटतो .जो आपल्या मनातील अनेक भावना त्याच्या कवितेतून अगदी सहज..सध्या .शब्दातून मांडतो आहे ..अशा या मनाला भिडणार्या कवितांचा संग्रह .वाचकांना खूप भावणारा ठरेल यात शंकाच नाही.


प्रसिध्द चित्रकार व मित्र - श्री. दिलीप दारव्हेकर यांनी या कविता संग्रहाचे अर्थपूर्ण आणि साजेसे मुखपृष्ठ केले आहे ,त्यांचे अभिनंदन.
कवी -प्रकाश क्षीरसागर यांचे अभिनंदन आणि पुढील कविता प्रवासासाठी लेखन-शुभेच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
-------------------------------------------
पुस्तक-परिचय
मनाला भिडणाऱ्या कवितांचे एक अनोखे भावविश्व "
कविता संग्रह -
 जमाना बदलल्याचं चिन्हं 
दुसरं काय ?
पृ.१२० , मूल्य- रु.१५०/- 
-----------------------------------------------------------
कवी- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 
संपर्क- ९०११०८२२९९ 
----------------------------------------------------------
प्रकाशक - माधव राघव प्रकाशन
ताळगाव - गोवा 
------------------------------------------------------------------