पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ -----------
जीवनभान देणारी किशोर कादंबरी - जोकर बनला किंगमेकर
------------------------------ ------------------------------ --------------
साहित्य हे संस्कार करणारे प्रभावी असे माध्यम आहे , मोठ्यांचे साहित्य , मुलासाठींचे साहित्य ,या दोन्हीतूनही समाज-मनावर संस्कार करण्याचे कार्य फार पूर्वीपासून चालत आलेले आहे .प्रत्येक पिढीत असे संस्कार -कार्य करणारे आपल्या भोवती असतात . त्यांची तळमळ कधी कार्यातून तर कधी लेखनातून दिसत असते , याच भावनेने साहित्यिक संजय वाघ यांनी किशोर - मित्रांसाठी अतिशय सकारात्मक आणि जीवनभान देणाऱ्या अशा
"जोकर बनला किंगमेकर या कादंबरीचे लेखन केले आहे.
या कादंबरीचा नायक विनू , त्याच्या दुर्दम्य आणि सकरात्मक जगण्याची प्रेरक लढाई " हे या किशोर कादंबरीचे कथानक आहे , माणसाला माया, प्रेम, जिव्हाळा ,या भावनांचा स्पर्श झाला की त्याला त्याच्या जगण्याचे उद्दिष्ट सापडते, हे मनस्पर्शी सूत्र या लेखनाचे आहे असे जाणवत रहाते .
विनू या कादंबरीचा नायक - तो दिव्यांग आहे, तरी त्याच्या मनात अफाट जिद्द आहे, परिश्रम करण्याची त्याची तयारी आहे ,या गुणांनी त्याचे बाह्य व्यक्तिमत्व जितके वेगळे आहे त्याहून त्याचे अंतरंग , त्यातील भावना आपल्या मनाला भिडणार्या आहेत , हे या विनूच्या व्यक्ती रेखेचे विशेष आहे.
लेखक संजय वाघ यांची लेखन शैली वाचकांच्या मनाला हात घालणारी आहे, साध्या सोप्या भाषेतून भोव्तालीचा परिसर ते साक्षात उभा करतात ,विनूच्या अनेक व्यक्ती सोबतच्या भेटीचे प्रसंग असो, वा एखाद्या घटनेबद्दल विनूच्या मनात येणारे विचार असो , हे सारे शब्दातून व्यक्त करतांना लेखक संजय वाघ विनूच्या व्यक्तिरेखेशी समरस होऊन वाचकाला सुद्धा विनूच्या परिवारातील एक मेंबर बनवतात.
"बुटका मुलगा "- ही विनूची ओळख वरपांगी आहे, त्याच्या सहवासात आलेल्या व्यक्तीला काही क्ष्णाताच विनूच्या मनाची विशालता कळते , विचारांची उंची जाणवते, त्यानंतर समोरचा "परका ",विनूचा जवळचा मित्र बनून जातो .
बुटका विनू ", भले ही लोकांच्या चेष्टेचा विषय होत आला आहे, पण त्याच्या मनाच्या मोठेपणावर ,त्याच्या रूपाच्या "खुजेपाणाचा " काही परिणाम तो होऊ देत नाही, विनूच्या स्वभावाचे हे खूप मोठे वैशिट्य आहे.
नायक "विनू.. सर्कशीत नोकरी करतो, सर्वांच्या दृष्टीने तो एक "जोकर " बनतो . सर्कशीतील त्याचे जोकर बनून काम करणारे सहकारी देखील विनूच्या सहवासात मनातून बदलतात, हा चमत्कारिक बदल घडवून आणणारा विनू त्याच्या "जोकर-मित्रांना सकारात्मक जगण्याचे धडे शिकवतो , ते फक्त बोलघेवडे ज्ञान नाही , तर प्रत्याक्ष्य कृती करून , आचरणातून विनू ते दाखवून देतो.. हे क्रियाशील वर्तन-संस्कार नायक विनू " सतत करीत असतो .
छोट्या छोट्या प्रकरणातून विनूची जीवन कहाणी लेखकाने अतिशय आपलेपणाने लिहिली आहे .त्यामुळे " मनाला भिडणारे लेखन कसे असावे ", याचे छान उदाहरण म्हणजे संजय वाघ यांची "जोकर बनला किंगमेकर " ही किशोर कादंबरी आहे , असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.
विनू आणि त्याच्या बाबांच्या आठवणी , विनूच्या बाबांचा आकस्मिक मृत्यू , या घटनेचा झालेला खोल परिणाम, आई आणि तिचा लाडका विनू , त्यांचे एकमेकांशी असलेले कमालीचे प्रेमळ नाते हे वाचतांना मन गलबलून आल्याशिवाय रहात नाही.
सर्कशीत नोकरी करीत असतांना भेटलेले रामुकाका , मनेजर दिवाकर साहेब, विनुला भकासवाडीला भेटलेले बाल मित्र ", अशा अनेक व्यक्तिरेखा म्हणजे .."जगात अजूनही सज्जन-सच्छील ,निर्मल मनाची माणसे आहेत ", या भावनेला अधिक दृढता \देणाऱ्या आहेत.
भकासवाडीचे झकासवाडी होणे ", हे किती अवघड होते , आणि हा सगळा बदल घडवून आणतांना विनूने किती वेगवेगळ्या पातळीवर लढे लढले , त्याची विस्मयजनक कहाणी म्हणजे "जोकर विनूचा" किंगमेकर होण्याचा प्रवास आहे.
इष्ट-अनिष्ट, सुष्ट -दुष्ट , भले-बुरे ,चांगले -वाईट , मानवी -स्वभावाच्या काळ्या-पांढऱ्या बाजू या कादंबरीत आहेत त्यातूनही लेखक सजगतेने संस्कार संदेश देतात .
संजय वाघ लिखित ही किशोर कादंबरी वाचणे हाच एक वेगळा अनुभव आहे, त्यासाठी जोकर बनला किंगमेकर " ही किशोर कादंबरी वाचायलाच हवी .
दिव्यांग नायक विनू ",भले ही बुटका असेल, त्याचे आदर्श असणे, त्याला खूप मोठ्या उंचीचा माणूस बनवते, अशा या "हीरोला , "जोकर "कसे म्हणायचे ? हा प्रश्न वाचकांना नक्कीच पडेल . लेखक संजय वाघ यांना हेच अपेक्षित असणार.
पुढील लेखनासाठी त्यांना शुभेच्छा.
चपराक प्रकाशन- पुणे आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांनी या छान किशोर कादंबरीचे प्रकाशन केले आहे .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२
------------------------------ ----------------------
जीवनभान देणारी किशोर कादंबरी -
जोकर बनला किंगमेकर "
पृ. ६४, मूल्य- रु .५० /-
------------------------------ --------------------------
लेखक- संजय वाघ -नाशिक
संपर्क- ९९२२९०४०७२
------------------------------ ------------------------------ ----
प्रकाशक - चपराक प्रकाशन ,
संपर्क- ०२०-२४४६०९०९, ७०५७२९२०९२
