पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ -----------
बालगीत संग्रह -
रंगीत रंगीत रानफूल ",
- कवी- बालाजी मदन इंगळे
------------------------------ ------------------------------ --
मराठी कवितेतील सर्वपरिचित कवी-व्यक्तिमत्व -बालाजी मदन इंगळे यांचा पहिला बालगीत संग्रह "रंगीत रंगीत रानफूल " नुकताच प्रकाशित झाला आहे. मोठ्यांच्या कवितेतील एक मोठे नाव ",अशी ओळख ..कवी-बालाजी मदन इंगळे या काविमित्राची आहे यात आणखी एका नव्या आणि छान ओळखीची भर पडली आहे .ती म्हणजे या कवीच्या बालगीतांची समृध्द अशी भर बाल्कुमारांच्या साहित्यात पडली आहे.
आदरणीय विजया वाड आपल्या प्रस्तावनेत या बालगीतांच्या बद्दल लिहितात की ..
" बालाजी मुलांच्या जगात मस्त मुशाफिरी करणारे कवी आहेत. मुलांना निसर्ग आवडतो तसाच डोरेमोनही !
मुलांची आई म्हणजे हळवा कोपरा तर खोड्या म्हणजे आवडती खेळी . कविराज ,आपले "रंगीत रंगीत रानफूल " मुलेच काय मोठेही वाचतील नि मग गाता गाता नाचतील "..
या संग्रहात असाच बालगीतांचा समावेश आहे..मुलांना आवडणार्या विषयावरील कविता असल्यामुळे बालमित्र या पुस्तकात सहजपणे रमून जातील हे नक्की.
४८ पानांच्या या संग्रहात एकूण ३४ कविता आहेत .गंमत गाण्यापासून ते संस्कारक्षम कविता हे संग्रहाचे विशेष आहे.
झाडे ,पाने,फुले आणि फळे ही आपल्याला लाभलेली निसर्ग देणगी .. खूप काही देणारे झाड काय सांगते बघा..
"आधी मुळा जमिनीत रोवा
मग वरती झाड पुलवा
आधी पाया मग कळस वर जाय ||
प्रत्येक झाड ऐका सांगते काय
जीवनाचे मर्मच जणू या कवितेतून उलगडून दाखवले आहे. (पृ..४३ ),
आपल्या मनाची मोठी गम्मत असते..स्वप्ने पहाणे , काही बनावे वाटणे हे त्यातच आले .कधी हे तर कधी ते..
अशा या कवितेत ..कवी आपल्या बाल मित्रांना म्हणतोय .काही वाटू द्या .पण शेवटी..महत्वाचे आहे ते.हे की
" शेवटी वाटले मला
आधी अभ्यास करुया
मग जे व्हायचे आहे
ते आपण होऊ या ", ( कधी वाटते मला ..पृ..३९ ),
आपण विदार्थी म्हणून आपले अभ्यास कर्तव्य पार पाडू या , मग बाकीचे ..हे गोष्ट एक शिक्षक असलेला कवीच इतक्या छान कवितेतून सांगू शकतो.
अभ्यास आणि परीक्षा ..हे वेळापत्रक नाही म्हटले तरी खूप थकवणारे ,मन कंटाळून जाणारच की..अशावेळी सुट्टीचे येणे म्हणजे आनंदास उधाण येणे.. त्याची ही कविता ..
या कवितेत ..खेळ खेळू , वाचन करू " हा संस्कार संदेश कवी देतो आहे .
" कॅरम खेळू
क्रिकेट खेळू
नव्या नव्या
कविता वाचू
आता नाचू बूमबूम बूम ....( बुमबूम बूम ..पृ..३३ ),
गावाकडे गेल्यावर शेत-शिवार खुणावते ..हे ओढ मनाला धावायला लावते .या शिवारात काय आहे नेमकं ..त्याचे हे सुंदर कविता रूप...
गच्च पीक भरात
धुंद वास शिवारात ||
गाय हम्बरे यादीनं
धावे वासरू ओढीनं
उड्या मारू रानात
धुंद वास शिवारात || ...( धुंद वास शिवारात ..पृ,२७ ),
"शेतकऱ्यांचे मित्र "या कवितेत " बैल ,गाय , साप, गांडूळ, पाखरं " या मित्रांबद्दल खूप छान लिहितांना कवी म्हणतो..
"अशा मित्रांसोबत
करी हसत चाकरी
कसून सारे रान
जगा देई भाकरी . ...( पृ..१५ ),
आपल्या चालण्यासाठी कधी रस्ता असतो तर कधी असते पाऊलवाट..या पाऊलवाटेची खूप अर्थपूर्ण कविता ..
" पायाखालची
पाऊलवाट
सर्वांना दाखवते
आपापली वाट ....(पृ..७ ),
या शिवाय मुलांना आवडतील अशा गम्मतशीर कविता या पुस्तकात आहेत..
" पोहे करू ", ( पृ.५ ) , एकावर एक ( पृ.१४ ), एव्हढा मोठा रेडा "..(पृ..२३ ), " शनिवार एके शनिवार (पृ. २४ ),
"चिक्या आणि बब्या (पृ. २८ ), "चक्रम "...(पृ.२९ ),
या शिवाय १० चित्र -कोडी असलेली "ओळखा पाहू कोण ? ही कविता खूप आवडेल.
आपणा सर्वांना वंदनीय असणारे "छत्रपती शिवाजी " , आणि डॉ.भीमराव आंबेडकर " या दोन महापुरुषांच्या चरित्र कविता खूप बोधक आणि प्रेरक आहेत .
कवी-बालाजी मदन इंगळे यांच्या लेखन-प्रवासात प्रस्तुत बालगीत लेखनाचे मोठेच योगदान राहील.त्यांच्या लेखनास शुभेच्छा.
हा बालगीतसंग्रह सर्वांनाच आवडेल असा सुरेख स्वरूपात आहे .याचे श्रेय ..चित्रकार -प्रमोद दिवेकर यांच्या आकर्षक सजावटीला द्यावे लागेल.
प्रकाशक -दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशनाने "रंगीत रंगीत रानफुले " बालगीत संग्रह प्रकाशित केला आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------ -----------
कवी- बालाजी मदन इंगळे
संपर्क -९८८१८२३८३३
------------------------------ ---------------------
बालगीत संग्रह -
रंगीत रंगीत रानफूल ",
कवी- बालाजी मदन इंगळे
पृ. ४८ , मूल्य- रु. ६० /-
प्रकाशक -
दत्ता डांगे -इसाप प्रकाशन नांदेड.
संपर्क - ९८९००९९५४१
------------------------------ ------------------------------ --
No comments:
Post a Comment