पुस्तक परिचय ले- उमेश मोहिते ,माजलगाव जि.बीड.
*मनोरंजनातून शिकवण देणारी बालकविता : मस्त फिरू रे मस्त फिरु !**
. जेष्ठ बालसाहित्यिक अरुण वि. देशपांडे यांचा ' मस्त फिरू रे मस्त फिरू ' हा आठवा बालकवितासंग्रह असून यात एकूण २५ बालकविता आहेत. या सर्व कविता मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असून मुलांच्या विचार विश्वातील विविध स्पंदनांना संवेदनशीलतेने आविष्कृत करतात आणि त्यांच्या निरागस मनावर काहिएक संस्कारांची रुजवणदेखील करतात.आई , बाबा , पाऊस , शाळा, परी , झाडे , पक्षी , संगणक , पुस्तके , विविध खेळ इ.बाबी मुलांच्या भावविश्वातील अविभाज्य घटक असतात. मुले या सर्व घटकांवर जिवापाड माया करत असतात. अगदी हेच ध्यानात घेऊन कवी अरुण देशपांडे यांनी साधी -सोपी शब्दकळा योजून ही गुणगुणावीशी वाटेल अशी छंदोबध्द कविता लिहली आहे.
आज वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे म्हणून मुलांच्या कोवळ्या मनावर पुस्तक वाचनाचे महत्त्व बिंबवण्यासाठी कवी अरुण देशपांडे ' पुस्तके ' या कवितेमधून वाचन महिमा सांगून मुलांच्या जडण=घडणीतील पुस्तकांचे स्थानही विशद करतात आणि वाचन संस्कृतीलाही हातभार लावतात. ते लिहीतात :
छान गोष्टी छान चित्र
पुस्तके असतात मित्र
वाचनाची लागो गोडी
खूप असो वा थोडी
वाचन सुरु केले की
थांबत नसते गाडी !
खूप सारे ज्ञान देती
ग्रंथ असती गुरुजन
वाचन करावे तुम्ही
होऊन ग्रंथात मग्न
परी ही मुलांच्या भावविश्वातील एक सुंदर आणि मनोहारी कल्पना ! मुले परीच्या काल्पनिक विश्वात रममाण होत असतात, याची सार्थ जाण कवीला आहे.परी स्वप्नात येऊन मोलाचा संदेश देतेय,अशी कल्पना करुन कवीने जलसंवर्धन व वृक्षारोपणाची गरज सांगितली आहे. कवी म्हणतो :
रुक्ष झाला परिसर
गेली सारी हिरवाई
झाडे लावण्याची रे
करा सारेजण घाई
तर ' निसर्ग मित्र ' या कवितेमधेही कवी निसर्ग संवर्धनाची निकड व्यक्त करतो . कवी म्हणतो :
माणूस म्हणून आपलेही
काही कर्तव्य हो आहे
पर्यावरण रक्षण करुनी
होऊ सारे निसर्ग मित्र !
याशिवाय मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडण -घडणीसाठी चार उपयुक्त गोष्टीही कवीने सांगितल्या आहेत. आजच्या संगणकाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल असतो. त्यांचा सुट्टीचा काळ खेळण्या- वाचण्यात गेला पाहिजे, या प्रांजळ हेतूने ' सुट्टीच्या दिवसात ' या कवितेत कवी म्हणतो :
आमराईत जाऊन
पडावे सावलीला
छान एक पुस्तक
असावे सोबतीला
मुलांनी एकटे राहू नये. मित्रांसोबत हसले,खेळले आणि बागडले पाहिजे, असा संदेश देताना कवी म्हणतो :
एकटे एकटे
राहू नये कधी
राहूनी सर्वात
मित्र जमवावे आधी
दोस्त असे आपला
एक मस्त सोबती
मदत करेल जो
खरी त्याची दोस्ती !
या कवितेतून कवीने खऱ्या मित्राचीही ओळख मुलांना सहजतेने करुन दिली आहे. मुलांनी निसर्गात रमले पाहिजे. रानोवनी भटकले पाहिजे. चार भिंतीआड न राहता बाहेरच्या मुक्त जगाचा अनुभव घेतला पाहिजे, असे सांगताना ' मस्त फिरु रे मस्त फिरु ' या कवितेत कवी लिहीतो :
मस्त फिरु रे मस्त फिरु
खेळ खेळू नि मस्ती करु
झोका खेळू , गरगर फिरु
गमती - जमती खूप करु
चार भिंतीच्या घरामध्ये
केांडू नये कधी मनपाखरू
विशाल गगनात त्याला
द्यावे मुक्तपणे रे फिरु
याशिवाय मुलांच्या निरागस व आनंददायी विश्वाची चुणूक दर्शवणाऱ्याही काही कविता या संग्रहात आहेत.बालमनाला मित्राची खास ओढ असते. मित्र म्हणजे त्याच्यासाठी सारे काही असते. हे नोंदवताना कवी म्हणतो :
खूप आवडती मला
माझे सगळे दोस्त
शाळेतले , वर्गातले
आजुबाजूचे दोस्त !
पाऊस हा मुलांच्या विशेष जिव्हाळयाचा विषय ! त्यांना पावसात मनसोक्त भिजायला आवडते. हेच कवी कवितेत शब्दबद्ध करताना म्हणतो :
पाऊस पडे जेंव्हा
आनंद खूप होतो
चिंब चिंब भिजून
मनमोर नाचतो !
सध्या संगणकदेखील मुलांचा मित्र झालेला आहे, याचीही कवी बालसुलभ वृत्तीने नोंद घेताना दिसतो.कवी म्हणतो :
कॉम्प्यूटरशी दोस्ती झाली
छानच मिळाला हा दोस्त
नवे ज्ञान नि नवी माहीती
देत असतो हा माझा दोस्त
याशिवाय ' पावसाची जादू ', ' दिवाळी , ' माझे आबा ', ' माळी दादा ' या कवितांदेखील मुलांच्या तरल भावनांचा सहजसुंदर आविष्कार आहेत.
एकूणात ' मस्त फिरु रे मस्त फिरू ' मधील कवी अरूण देशपांडे यांची ही बालविता म्हणजे मुलांच्या भावविश्वाचा समरसून घेतलेला वेध आहे. संस्कारक्षम बोध देऊन मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडण - घडण करणे,हे बालसाहित्य लेखनाचे प्रयोजन असते. टोकदार संवेदनशीलता, बालमानसशास्त्राचा अभ्यास , सुक्ष्म निरीक्षणशक्ती आणि प्रतिभेची साथ असल्यावरच मुलांच्या अंतर्मनातील स्पंदनांचा समर्थ वेध घेतला जाऊ शकतो. कवी अरुण देशपांडे हे करण्यात यशस्वी झाले आहेत. हेच त्यांचे यश आहे....
*मस्त फिरु रे मस्त फिरू* : *बालकविता*
कवी : अरुण वि.देशपांडे
प्रकाशन : नंदिनी प्रकाशन, पुणे .
पृष्ठे : ३२
मूल्य : ४० रु .
परीक्षण
उमेश मोहिते ,
माजलगाव जि. बीड
भ्र. क्र. ९४०५०७२१५४
No comments:
Post a Comment