Thursday, December 28, 2017

पुस्तक-परिचय लेख- ले- अरुण वि.देशपांडे . पुणे.- कविता संग्रह - जमाना बदलल्याचं चिन्हं दुसरं काय ?

पुस्तक-परिचय लेख- ले- अरुण वि.देशपांडे . पुणे.
----------------------------------------------------------------
मनाला भिडणाऱ्या कवितांचे एक अनोखे भावविश्व "
कविता संग्रह -
 जमाना बदलल्याचं चिन्हं 
दुसरं काय ?
----------------------------------------------------------------
कविमित्र प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ( सागर ), यांचा कविता संग्रह - जमाना बदलल्याचं चिन्हं दुसरं  काय ?
संग्रहाचे  शीर्षक वाचकांच्या मनात एकाच वेळी अनेक भाव-प्रश्न उभे करून जाणारे आहे आहे असे मला वाटते ,  एखाद्या भावनिक अशा  क्षणी आपण सहज म्हणून जातो ..आता आपल्या हातात काय राहिलंय ? ,जमाना बदललाय दुसरं काय !,
कधी कधी सभोवतालची विलक्षण वेगाने बदलत जाणारी परिस्थिती पाहून आपण मनोमन स्तब्ध होतो, नि:शब्द होतो ..अशावेळी एकच स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आपल्या मनात उमटते  ती म्हणजे ..अहो काय सांगावे..
जमाना बदलल्याचं  अजून दुसरं चिन्हं आणखी काय हवं ?

मित्रांनो .संग्रहाच्या शीर्षकाने कविता अर्थाच्या शक्यतेची  अशी आवर्तने निर्माण केली ..त्यामुळे  वेगळ्या आस्वादात्मक पातळीवरून या कवीच्या कविता वाचतांना एक छान कविता अनुभव आला हे सांगावेसे वाटते.
११९ पृष्ठांच्या संग्रहात एकूण ९२ कविता आहेत ..आणि चार विभगात या कविता आहेत. पहिल्या भागात आहे -
झाड, निसर्ग , शेती - या विषयावरच्या २५ कविता ,
दुसऱ्या भागात -२५ गेय कविता आहेत ,तिसऱ्या विभागात - ३२ - मुक्तछंद आणि मी विषयक कविता आहेत , आणि शेवटच्या  चार कविता या  " स्त्री जाणीवेच्या कविता " असे ठळकपणे सांगितलेले आहे.

संग्रहाच्या आरंभी कवीचे मनोगत हे त्याच्या "व्यथित मनाची घालमेल " आहे हे कळते .आणि आपल्या मनाची ही घालमेल ..मोठ्या व्यथित मनाने कवीने विविध कविता-रचनेतून यथायोग्य शब्दातून व्यक्त केली आहे ..हे या संग्रहातील कवितेचे ठळक असे वैशिट्य आहे. या मनोगतातील कवीच्या मनातले पुन्हा इथे सांगणे ..योग्य होणार नाही,  हे सगळे मनोगत संग्रह आस्वादन करतांना वाचले तर ते कवीच्या कविता प्रवासाबद्दल नेमकेपणाने सांगते आहे हे जाणवेल.

संग्रहाच्या शेवटी " क्षीरसागरांची कविता = एक रसास्वाद  कवी प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितेबद्दल अनेक मान्यवरांचे  अभिप्राय वाचावयास मिळतात ..यातून कवी क्षीरसागर यांच्या कविते बद्दल खूप चांगले आणि महत्वाचे असे जाणून घेता येणे शक्य झालेले आहे .
प्रस्तुत संग्रहातील कवितेबद्दल आणि कवी बद्दल --
प्रा.श्रीकृष्ण अडसूळ , मडगाव - यांनी संग्रहाच्या ब्लर्बवरील  आपले मत नोंदवतांना म्हटले आहे की -
" एकविसाव्या शतकातील जीवनाचं कृषीकेंद्रित अशा ग्रामजीवनाचं विविधांगी आणि अर्थपूर्ण दर्शन घडविणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितेची भाषा नागरसन्मुख आहे ".

संग्रहातील काही कविता अंश ..
झाड ,निसर्ग, शेती 
-------------------------------------
कविमन  मन निसर्गाशी संवाद साधणारे आहे, त्यांच्यातील नाते जीवाभावाचे असे दृढ आहे .म्हणूनच निसर्गातील दुखांचे हुंकार त्याच्या कवितेतून उमटतात ..अशा काही कविता ..
१.
" कटाच काढला 
 जरी माणासाने 
 झाडे गाती गाणे 
सुखाचेच 
जगतात झाडे 
माणसासाठी 
मरणाच्या गाठी 
घेऊनच .....( पृ....२० )
२,
त्यांचे सर्द दर्द मौन 
दंवातुन पाझरत
तेंव्हा नकळत  झाड 
गदगदून उठते ....( वेदना फुलांच्या ..पृ..१६ ),
३.
झाडं व मुली वयात आल्या की 
माणसांच्या नजरा वखवखू लागतात '
त्या नजरांनीच ती लागतात सुकू ...
त्यांच्या नजरा बाद करतील 
तो दिवस दूर नाही,
मित्र असलेला माणूस वैरी झाला 
आता त्यांची खैर नाही ....( माणसांची खैर नाही  पृ..३९ )

काही गेय कविता -अंश पाहू या ..
१.
वेचून घेतो | काळोख थोडा ||
सांजवेळी मी | नदीकिनारी  ||
गूढ बोलणे | झाडावरती  ||
अस्वस्थ होतो  | नदीकिनारी  || ( नदीकिनारी ..पृ.४४ ),
२.
या फुलांना समजावतो मी
दुखः: हे दावू नका 
काटे जरी सोबतीला '
गंध गुपित ठेवू नका .... (नका .. पृ..४९ ),
३.
ते थेंब नभीचे गंधित झाले 
ते शोषले कुणी ?
झाडांनी ? , कळ्यांनी ? नाही 
वाऱ्याने ? नाही ..फक्त माणसांनी ...( ते थेंब नभीचे ..पृ..५५ ),

मुक्तछंद आणि मी विषयक काही कविता 
१.
हे आख्खं शहर आता 
डस्टबीन बनण्याच्या 
मार्गावर निघालाय 
प्रदूषित चेहेरयाची अन 
मनाची ही माणसे ,
घालतात आताशा 
धूर आणि धुळीचेच मास्क ...( अस्तित्व ..पृ.६७ ),
२.
आता आईबापचं देतात 
मुलाबाळांना , लेकीबाळींना 
मोबाईल , इअरफोन , हेडफोन 
कोंबतात ते रात्रंदिवस कानात 
जमाना बदलल्याच चिन्हं 
दुसरं काय  !      ( शीर्षक कविता ...पृ..७० ),

३.
माझ्या गावाच्या भूमीत 
आता बदलते जग 
गेली शेती ,गेली बैल 
करी भुई तगमग 
माझ्या गावाच्या भूमीत 
नाही माडांचे ते बन 
नाही दर्या जरी तिथे 
लोकांचे निर्मल मन ...( माझ्या गावाच्या भूमीत ..पृ..८१ )
४.
जगणे जमत नसतांनाही 
जगतात इथे माणसे 
मरणाची इच्छा नसताही 
मरतात जिती माणसे ....( धडपड .पृ.९७ ).
५.
भोवताली हाव वसले की 
रस्त्याला हटविले जाते 
ही शिक्षा असते जणू 
रस्त्यालाच 
पिकांना हटविल्याची .....(शिक्षा ..पृ..१०२ ),,
६,
जाहले अंगण रिते 
मनातही काही नाही 
दानतीचे कुठे कोणा 
आपलेच भागत नाही ...( आपलेच भागत नाही ...पृ.१०५ ),


तर असे आहे प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ..(सागर ) या कवीचे ही भावविश्व .आणि त्यातल्या आयुष्याचे हे प्रतिबिंब कवीचे न वाटता आपले चित्र वाटू लागते ..याचे कारण यातील कवीची खंत , त्याच्या मनाला घेरून राहिलेली निराशा , निसर्गाशी असलेले नाते आणि आता या नात्याच्या  झालेली फरपट पाहून मनाला होणारी वेदना ..हे एकट्या फक्त कवीची राहत नाही तर ती तुमची आमची, माझी ..अशी सर्वांची आहे ,हे असे वाटायला लावणारी ही कविता ..आणि हा कवी ..आपला मित्र वाटतो .जो आपल्या मनातील अनेक भावना त्याच्या कवितेतून अगदी सहज..सध्या .शब्दातून मांडतो आहे ..अशा या मनाला भिडणार्या कवितांचा संग्रह .वाचकांना खूप भावणारा ठरेल यात शंकाच नाही.


प्रसिध्द चित्रकार व मित्र - श्री. दिलीप दारव्हेकर यांनी या कविता संग्रहाचे अर्थपूर्ण आणि साजेसे मुखपृष्ठ केले आहे ,त्यांचे अभिनंदन.
कवी -प्रकाश क्षीरसागर यांचे अभिनंदन आणि पुढील कविता प्रवासासाठी लेखन-शुभेच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
-------------------------------------------
पुस्तक-परिचय
मनाला भिडणाऱ्या कवितांचे एक अनोखे भावविश्व "
कविता संग्रह -
 जमाना बदलल्याचं चिन्हं 
दुसरं काय ?
पृ.१२० , मूल्य- रु.१५०/- 
-----------------------------------------------------------
कवी- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 
संपर्क- ९०११०८२२९९ 
----------------------------------------------------------
प्रकाशक - माधव राघव प्रकाशन
ताळगाव - गोवा 
------------------------------------------------------------------

Wednesday, December 13, 2017

पुस्तक - परिचय लेख - बालकविता संग्रह - आमच्या गावात आमची शाळा

पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे 
-------------------------------------------------------------------
बालकविता संग्रह - 
आमच्या गावात आमची शाळा 
-----------------------------------------------------------
  सातत्याने बालसाहित्याचे लेखन करणारे लेखक कवी " म्हणून माझे कविमित्र श्री.बबन शिंदे यांचे नाव  सर्वपरिचित झालेले आहे.गोष्टी आणि कविता ,हे दोन्ही लेखन प्रकार करणाऱ्या या साहित्यकार मित्राचे वैशिष्ट्य म्हणजे .. ते प्रबोधन करीत करीत ते बालकुमार मित्रांचे मनोरंजन तितक्याच छानपणे करीत असतात.
त्यांचा नवा कविता संग्रह -  " आमच्या गावात आमची शाळा " नुकताच आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे.एकूण ३७ कविता असलेल्या या संग्रहात कवी बबन शिंदे यांनी .बाल-मनाला परिचित विषयावर संस्कारक्षम अशा कविता लिहितांना त्या बोजड आणि रुक्ष होणार नाहीत याची खूप काजी घेतली आहे हे सतत जाणवते 
.उपदेशपर आणि कंटाळवाण्या "  कविता न होता त्या खूप छान समजावून सांगणार्या गंमत -कविता झाल्या आहेत असे म्हणावेसे वाटते..
काही कविता उल्लेख -
" सर्वांच्या उपयोगी पडावे, मदत करण्यास तत्पर असावे " या विषयीच्या 
म्हणूनच आम्ही टिकलो- या कवितेत कवी काय सांगतो ते बघा -
"कुणीही सांगत असे 
अडले नडले काम 
खाऊच्या रुपात मग 
मिळे हातावर दाम ..... (म्हणूनच टिकलो ..पृ..१७ )
आपल्याला कुणी केलेली सूचना आणि दिलेला सल्ला खूप मोलाचा असतो ,त्यात दडलेले आपले हित आपणच ओळखायला पाहिजे 
" सल्ला  या कवितेत ह्त्तीदादाचा कसा फायदा झालाय ते महत्वाचे आहे..
अगडबंब हत्ती 
लालची फार 
खाण्याचा त्याला नाही सुमार ,
वनराज वैद्य 
आले मदतीला 
वाजवी अह्राचा सल्ला दिले 
हत्तीने सर्व 
पथ्ये  पाळली 
तब्येत त्याची 
छान सुधारली ....( सल्ला ..पृ..२२ )
लहान असो वा मोठे ..रहदारीचे नियम पाळणे "अपेक्षित असते .पण प्रत्याक्ष्यात आपण पाहतो आहोत ..बेशिस्त -आणि गोंधळ ,,म्हणजेच रहदारी ..हे पाहून कवी मोठ्या कळकळीने आपल्याला सांगतोय की बाबानो ...
" जीव अनमोल जपा जरा त्याला 
  रस्त्याने चालतांना भान ठेवून चाला  ||
  वर्दळीच्या जागी खेळायचे टाळा
    वाहतुकीचे नियम काटेकोर पाळा || ( काटेकोर पाळा..पृ..२७ ),
निसर्ग आणि प्राणी-पक्षी ,आपली सजीव सृष्टी ..याबद्दल लिहितांना कवीच्या प्रतिभेला उधाण येत असते ..कवी-बबन शिंदे यांची कविता या सर्व विषयावर खूप छान व्यक्त होणारी आहे ..
ते म्हणतात ..
"सर्वच वृक्ष 
  असती बहुगुणी 
  नेहमीच आपण 
  असावे ऋणी ..
  असंख्य वृक्ष 
  सर्वत्र लावा 
   नजर त्यावर 
   सदैव ठेवा ....( वृक्ष ...पृ..३१ ),
आपल्यावर संस्कार करणारे आपले गुरुजन , वडीलधारी मंडळी,आपले आई-बाबा यांच्या बरोबरच आपल्याला जीवनानुभव सांगून संस्कार करण्यासाठी  म्हणून तळमळीने-लेखन करणारे " ,लेखक-कवी देखील आपले मार्गदर्शक आणि गुरूच असतात ..
कवी बबन शिंदे हे एक उत्तम शिक्षक आहेत , बालमनाची जडणघडण " कशी करायची असते " याची त्यांना जाण आहे .म्हणून त्यांच्यातील कवी ..प्रेमळ मनाच्या शिक्षकाची भूमिका मनापासून बजावत असतो ..याची प्रचीती .बबन शिंदे यांच्या सर्वच लेखनात येते .तितकीच ती प्रस्तुतच्या "आमच्या गावात आमची शाळा " संग्रहातील कवितातून येते .
नेमकेपणाने व्यक्त करणे त्यांच्यातील कवीला सहजतेने जमते ..म्हणूनच "यशाचे सूत्र  "अचूक सांगू शकतात ...
" करेल धडपड  त्याचेच यश 
  गाठता येते त्याला कळस
  यशाचे सूत्र तू ध्यानी धर 
  प्रत्येक काम वेळेवर कर ....(यशाचे सूत्र ..पृ ..३३ )
तर मित्र हो ,या शिवाय अनेक छान छान कविता या संग्रहात आहेत..
"वारी  , ", माकडा माकडा ", थांबेल परेशानी ", पाखरा पाखरा ", अनमोल संपत्ती ", "वाचत जावे ", चला गड्यांनो ",
"मेघा रे मेघा ", लाडकी मुलगी ", "शाळा ",
 अनेक कवितातून कवी बबन शिंदे सहज सोप्या शब्दातून सुंदर चित्र उभे करतात ..जे बाल्मानला भावणारे असेच आहे , संग्रहातील अनुरूप  अशी रेखाचित्र कवितांना अधिक अर्थवाही करणारी आहेत 
चित्रकार -मित्र प्रमोद दिवेकर यांनी सुरेख मुखपृष्ठ  केले आहे.
प्रकाशक दत्ता दंगे आणि इसाप प्रकाशन नांदेड  यांनी बालकुमार मित्रांसाठी एक छान पुस्तक प्रकाशित केले आहे ,त्या बद्दल त्यांचे अभिनंदन करू या.
कवी -लेखक बबन शिंदे यांच्या लेखन प्रवासास अनेक शुभेच्छा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------
बालकविता संग्रह -
आमच्या गावात आमची शाळा "
पृ.४८ , मूल्य- रु.६० /-
-बबन शिंदे - कळमनुरी ,
मो-९५२७८६८१८१ 
------------------------------------------------------------------
प्रकाशक - दत्ता डांगे ,
इसाप प्रकाशन - नांदेड 
मो-९८९००९९५४१ 
--------------------------------

पुस्तक-परिचय लेख - छान छान कवितांची मस्त ट्रीप - " चंद्रावरची सहल "

पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि,देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
---------------------------------------------

छान छान कवितांची मस्त ट्रीप -
" चंद्रावरची सहल "
-----------------------------------------------------------
अंबड -जिल्हा -जालना येथील श्री.नारायण  खरात यांच्या बालकविता लेखनाने 
मराठवाड्यातील बालसाहित्य लेखनात एक नव्या उमेदीचे व्यक्तिमत्व दाखल झाले आहे 
ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. 
बाल -कुमार मित्रांसाठी "चंद्रावरची सहल "हा त्यांचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 

बालसाहित्य लेखन करीत असतांना साहित्यिकाला अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते . 
आपला  वाचक आणि त्याचे आकलन "याबद्दल जाणीव ठेवून कवी- नारायण खरात यांनी 
प्रस्तुत संग्रहातील कविता लेखन केले आहे  हे विशेष कौतुकाचे आहे असे म्हणावे लागेल. 
चंद्रावरची सहल "या संग्रहात एकूण ३० कविता आहेत. .यातील कवितांची शीर्षके  नेहमीपेक्षा 
वेगळी वाटणारी आहेत . उदा .." निसर्गदूत कावळा ", सूर्याला विनंती ", "वीज ताई ",
"सूर्य झाकायचे ठरले ", "समुद्राची हाक " , "शिडीवरून ढग उतरले खाली ", "राजाला अद्दल घडली ",
"आकाशाची गोधडी ",  "कपटी बगळा ", .ई ... .!
या गोष्टी सदृश्य  शीर्षकामुळे  बालमनात  नक्कीच उत्सुकता  वाढेल आणि ते अगोदर या कविता नक्की 
वाचतील . 

"मनोरंजन आणि प्रबोधन "हे दोन हेतू साध्य करण्याची जबाबदारी बालसाहित्याची लेखन करणाऱ्या 
साहित्यिकांकडून नेहमीच केली जाते ", कवी-नारायण खरात यांनी प्रस्तुतच्या  कविता -लेखनातून 
या अपेक्षांची पूर्ती कण्याचा चांगला प्रयत्न केला आहे असे  जाणवते . 

आपल्या समोर आलेल्या कविते मधून रोजचेच विषय वाचायला  मिळतात 
त्या विषयांचे काव्यरूप बालमानावरती संस्कार करणारे असते . कवी नेमकेपणाने 
 ओळखीच्या गोष्टींची पुन्हा नव्याने ओळख करून देत असतो ते शब्द-आणि ती कविता 
वाचकमनाला भावणारी असते.  असे वास्तव आणि कविकल्पना याचा सुंदरसा मेळ "म्हणजे 
नारायण खरात यांच्या "चंद्रावरची सहल" संग्रहातील बालकविता आहेत. 

या कविता मोठ्या अर्थपूर्ण आणि सामाजिक संदेश देणार्या आहेत" कविता पूर्ण 
वाचून झाल्यावरच शीर्षकाची योजना लक्षात येईल. जसे.. 

"कावळा नाही बावळा 
 कावळा मोठा हुशार 
माणसाला ही केवढा 
 करायला लावतो विचार ..(निसर्गदूत कावळा  पृ.-३ )

जीवनदायिनी अशी नदी ..तिची ही कविता -
"माझी नदी गेली कुठे 
तिच्याविना जीव तुटे 
तिचं जीवन हिरावून घेतलं 
तिच्यावर नव्हे आपल्यावर बेतलं ..  ( नदी  ५),

झाडे लावा -झाडे जगवा .हा संदेश देणारी कविता-
झाडं नका तोडू झाड नका तोडू 
झाडालाही येतं माणसासारखं रडू ..(झाडं नका तोडू.. पृ-२८),

आणि -ही एक गंमतशीर कविता -
आभाळच आलं  खाली "(पृ-३१ )

रस्त्याने फिरू लागली 
चांदोमामासोबत मुले 
बागेमधल्या कळ्यांची 
होऊ लागली फुले .. 

याशिवाय .."सर , "अप्पल  पोटया ", पाखरांची शाळा ", पाऊस ", चंद्रावरची सहल ",
स्वप्न " , उन्हाळ्याची सुट्टी "अशा इतर कविता ज्या बाळ-मित्रांना खूप आवडण्यासारख्या  आहेत
प्रा.डॉ. पृथ्वीराज  तौर-सर - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ -नांदेड " यांनी कवी -
नारायण खरात यांच्या  कविता -लेखनाची यथायोग्य भलावण केली आहे.
चित्रकार -मित्र - प्रमोद दिवेकर यांच्या अनुरुप अशा रेखाचीत्रांनी या कवितेला छान सजवले आहे ,
त्यांची ही कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे.
प्रकाशक  श्री. -दत्ता डांगे आणि त्यांचे इसाप प्रकाशन "बालसाहित्याचे मोठा आधारस्तंभ आहे ,
त्यांनी "चंद्रावरची सहल" हा संग्रह आकर्षक स्वरूपात सिद्ध केला आहे 
बाल-कविता लेखनात कवी-नारायण खरात  यांच्या कवितांची लक्षणीय अशी भर पडली आहे.
यापुढे ही त्यांची कविता नित्यनेमाने बाल-मित्रांच्या भेटीस यावी अशी अपेक्षा करू या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि,देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवी- नारायण खरात 
अंबड जि. जालना . 
संपर्क -९४२१३ २४३४० 
---------------------------------------------
चंद्रावरची सहल "
(बालकविता संग्रह )
पृ- ३२ , मूल्य- ४० रु.
प्रकाशक - श्री.दत्ता डांगे ,
इसाप प्रकाशन , नांदेड.
संपर्क - ९८९००९९५४१ 
-----------------------------------------------------------

पुस्तक- परिचय लेख- लेख-संग्रह - पण का ?

पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे 
------------------------------------------------

लेख-संग्रह -
पण का ?
-सौ.वृषाली कुलकर्णी 
-------------------------------------------------
वर्तमानपत्रातून प्रसिध्द झालेले लेखन वाचकांच्या पसंतीस प्राप्त होते ,त्यातूनच लेखकास हेच लेखन पुस्तकरूपाने यावे अशी इच्छा होणे अगदी सहाजिकच आहे ..आणि याचा दुसरा फायदा असा होतो की ..पुस्तक रूपाने हे साहित्य अधिकाधिक वाचकांच्या पर्यंत जाते 
वर्तमानपत्रातून एखादे सदर
 चालवतांना लेखन करणाऱ्या साहित्यिकावर मर्यादित शब्दात लेखन करण्याचे बंधन असते " आणि हे बंधन पाळून केलेले लेखन आणि ते सादर  वाचकप्रिय होणे ..हे त्या लेखकाचे आणि लेखनाचे मोठेच यश असते . अशा यशाच्या मानकरी होणार्या लेखिका आहेत सौ. वृषाली कुलकर्णी .
पुण्यनगरी "या दैनिकाच्या "प्रवाह "पुरवणीतून  ..लेखिकेचे हे लेखन "माझा दृष्टीक्षेप " या शीर्षकाने प्रसिद्ध झाले ,या लेखांना वाचकांचा प्रतिसाद कधी फोनवरून ,तर कधी वाचकांनी लिहिलेल्या पत्रून मिळत गेला ..हा अनुभव एकूणच लेखनाला अधिक आत्मिक असा बल देणारा ठरला ..हे नक्कीच खूप छान झाले ..आणि वृषाली कुलकर्णी  यांचे हे लेख आता पुस्तकरूपाने  "पण का ? या शीर्षकाने प्रकाशित झाले आहे ,त्या निमित्ताने लेखिकेचे  अभिनंदन करू या.


पण का ? या लेख संग्रहात  एकूण २४ लेख आहेत , या सर्व लेखांचे "माझ्या मते एक समान भाव-सूत्र आहे - ते म्हणजे ..स्त्री-मनातील अनेक भावनिक दुखांना मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधीच दिली आहे .कारण "आपले कुणी तरी मनापसून ऐकतो आहे ,हा स्पर्श मनाचा कोंडमारा दूर करणारा ठरला आहे.,
या हृदयीचे -त्या हृदयी " ज्या सहजतेने आले आहे "  त्याचे श्रेय लेखिकेच्या ..एक सहृदय माणूसपण "असण्यात आहे .
"लेखिकेने अतिशय आपलेपणाने या स्त्रियांना बोलते केले आहे आणि त्यांच्या भावनिक,मानसिक दुखांना ऐउक्न घेतले ", हे असे केल्यावर या अनेक स्तीर्यंना किती हलके -किती मोकळे मोकळे वाटले असेल ? याची कल्पना हे लेखन वाचल्यानंतर येईल "..
माणसाचे मन किती विलक्षण असते ..मनाच्या ठायी असलेल्या अनेक  अवगुणांचे अस्वथ करणारे प्रत्याकारी दर्शन या संग्रहातील एकेक आत्मिक कहाणीतून येते आणि , हे वेदनादायक आणि असह्य जगणे " लेखिका आपल्याला ज्या शब्दातून घडवते ते अतिशय परिणामकारक असेच आहे. एक नक्की  की " पर -दुखः हे कितीही शितल "असू दे ..,या लेखातील नायिकांनी जे भोगलाय त्याबद्दलच्या त्यांच्या मनातील  धगधगत्या भावना वाचकांच्या मनाला दाहकता जाणवून देणाऱ्या आहेत..
व्यक्ती-तितक्या -प्रवृत्ती " या म्हणी सारखेच एक वाक्य या लेखनास वाचल्यावर माझ्या मनात सहज आले की -
"व्यक्ती एक असो वा अनेक ..त्याच्यात अनेक विकृत्ती असू शकतात ".

यातील २४ लेखातील विविध स्त्री-व्यक्ती रेखा ..या आपल्या भवताली असणार्या समाजातीलच आहेत , यातील अनेकांचे जगणे  हे निम्न -आर्थिक स्तरातील आहे ..यातील जगण्यात अनेक कमतरता असतात ,त्यामुळे त्यांच्या वाट्याला अनेक पदरी दुखः ,आणि वेदना आलेलेया आहेत ..ज्यामुळे त्यांचे जीवन जास्तच त्रासदायक आणि नकोसे वाटणारे असेच आहे "हे आपल्याला जाणवत राहते..

हसरे दुख: मधील उमा ", संशयाचं भूत - मधील रेखा ",  "एकटी -मधील रोहिणी ,कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे "..या लेखातील - "शांता ", गोष्ट घटस्फोटाची -प्रतिभा , अज्ञानाचा अंधार -मधील रंजना ",
यांच्या वाट्याला आलेले भोग .विलक्षण असेच आहेत ..यातून सुटका नाही " हे जाणवल्यावर त्यांची असहायता ,अगतिकता ,हतबलता  आपल्या मनाला व्यथित करणारी आहे 
ज्याचं जळतं -त्यालाच कळतं " हे जितका भावनिक सत्य आहे -तितकेच हे व्यावहारिक कटू सत्य आहे " , या कहाण्यातील नायिकांच्या वाट्यास जे आले आहे ते इतरांच्या वाट्याला येऊ नये " त्या साठी तरी हे लेखन जनमानसात जायला हवे आहे.

लेखिका वृषाली कुलकर्णी यांचे हे लेखन तसे म्हटले तर एका मोठ्या उदात्त हेतूने केले आहे असे म्हणावेसे वाटते ,हे लेखन ज्या वेळी पुण्यनगरीतून "प्रकाशित होत होते .त्यावेळेस अनेक वाचकांनी आपल्याला सकरात्मक दृष्टीकोन लाभला हे आवर्जून कळवले " हे अगदी यथायोग्य आहे"  

साहित्यकार उमेश मोहिते यांनी या संग्रहास  यथोचित अशी प्रस्तावना दिली आहे .त्यांच्या विवेचनातील हा मुद्दा मला विशेष  महत्वाचा वाटतो..
"थोडक्यात - वृषाली कुलकर्णी यांनी संवेदनशील वृत्तीनं या सर्व शोषित व पिडीत स्तीर्यांना बोलकं केलं आहे आणि त्यांच्या दु:खच्या ,होरपळीच्या मुळांशी  जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, त्यांच्या परवडीचे व अपेष्टांचे मूळ शोधून बघितले आहे, त्यवर मार्मिक भाष्यही केले आहे आणि त्यांनी स्त्री सहजसुलभवृत्तीन लीलया  हे साधलंही आहे.
चित्रकार -योगेश प्रभुदेसाई यांनी केले  " मुखपृष्ठ" लेखसंग्रहाच्या आशयास अधिक ठळक करते .याचा आवर्जून उल्लेख करतो आहे.
रावा प्रकाशन "कोल्हापूर ,यांनी हा  संग्रह प्रकाशित केला आहे.

लेखिका सौ.वृषाली कुलकर्णी यांच्या "पण का ? ", या लेख-संग्रहाचे साहित्य-क्षेत्रात खूप छान स्वागत होईल "हे नक्की . त्यांच्या लेखन-प्रवासास अनेक शुभेच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क -   ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------
पण का ?
लेख-संग्रह -
पृ. १००  , मूल्य- रु.१५०/-
सौ.वृषाली कुलकर्णी 
संपर्क -   ७७९८११४५२५ 
-----------------------------------------------------------------
प्रकाशक - राहुल प्रताप कुलकर्णी 
रावा प्रकाशन -कोल्हापूर 
संपर्क -    ९४२२०४४४६१ 
----------------------------------------------------------------------

पुस्तक परिचय लेख- कविता - संग्रह - " अर्णव "

पुस्तक परिचय लेख-
कविता - संग्रह - " अर्णव "
कवी मन लाभलेले मनीष कानडे यांनी
त्यांच्या मन सागराचे शब्द मंथन केले ,ती अनुभूती त्यांनी चारोळी आणि कवितेतून व्यक्त केली आहे, त्यांच्या या रचनांचा संग्रह "  अर्णव" या शिर्षकाने प्रसिद्ध झाला आहे.
तरुण वयाच्या या कवीचे अनुभव विश्व त्याच्या परिघात असलेल्या कॉलेज, कॉलेज कॅम्पस, वास्तव्य असलेले पुणे शहर,आणि कवीला त्याच्या प्रवासाचे अनुभव , अशा एका मर्यादित वर्तुळाचे आहे हे जाणवते,
असे आले तरी या कविमानाला विशाल अशा समुद्राचे, सागराचे आकर्षण आहे, एक विलक्षण अशी ओढ या सागरा विषयी आहे,
असे ही म्हणता येईल की भावनांची भरती कवींच्या मन सागराला  अव्याहतपणे आलेली असते.
अशाच काव्यरचना प्रस्तुतच्या संग्रहात आहेत,
कवींच्या अंतरात असलेला असीम आशावाद या रचनाचा अंतरस्वर आहे असे सतत जाणवत राहाते .
कवीच्या हळव्या नि भावुक मनाच्या चित्रांकीत रचना संग्रहाच्या सुरेख स्वरूपात भर घालणाऱ्या आहेत.
पाना गणिक डाव्या बाजूला चारोळी रचना व उजव्या बाजूला  कविता रचना अशी मांडणी केली आहे.
या रचना कवीने वाचकांशी साधलेला मुक्त संवाद आहे, एक मित्र आपल्या खास अशा जिवलगा बरोबर या सगळ्या भावना शेअर करतो आहे अशा स्वरूपाच्या या सर्व रचना आहेत.
आपले आयुष्य एक प्रवास असतो, अशा प्रवासात आपले कुणी सोबत असावे हे सांगतांना कवी म्हणतो-
"आपले ध्येय गाठणे
हा एकच विचार मनात असावा
खडतर आयुष्याचा हा प्रवास
एकट्याचा मात्र नक्कीच नसावा...
(प्रवास पृ- ४७),
अनुभव शिदोरी सोबत असली की मनाला सांगणे सहज सोपे असते, ते कसे ते पहा..
"वाया गेलेली वर्षे
बरेच काही शिकवून गेली
परत तीच चूक न करण्याची
आश्वासनही घेऊन गेली ...( पृ- ५४),
खुले आकाश, भोवतालीचा निसर्ग हे सारे कवीचे आवडते सोबती यांच्या सहवासात कवी मन सहजतेने फुलून येते..
" निळक्षार आकाश
मला नेहमी खुणावतं
विचारांचा वेग
आणखी दुणावतं ..(पृ- ५६),
कवी प्रतिभा भरात येण्यासाठी निमित्त पाहिजे असतं ..त्यासाठी असे घडले तर ते हवेच असते
" एखादी अत्तराची कुपी
बऱ्याच दिवसांनी उघडल्यावर
जसा गन्ध दरवळतो
तसं पहिल्या पावसानंतर होतं..
(पहिला पाऊस..पृ- २५),
आठवणीत रमलेला हा कवी " सहज" या कवितेत सहजपणे लिहितो..
कॉलेजचे मंतरलेले दिवस खरंच किती छान होते
पैसा हाती नव्हता पण तरी ते दिवस लाखमोलाचे होते ..."
(पृ..१९),
मन सागरात भरती येते नि मग काय होतं..
"मनातल्या सागराची
आकाशी भेट होते
मनातील वादळात
मग शब्दफेक होते...( पृ- १२),
आठवणी आणि मन या एकत्र असतात, यात रमलेले आपले मन भावव्याकुल होऊन जाते
मग -आठवणी " या छान कवितेत कवी म्हणतो..
' अजूनही आहेत आठवणी
  खूप सांगण्या सारख्या
  अगदी रव्याच्या लाडूतील
   गोड रव्यासारख्या ...
(पृ- ९)
रसिक हो , 64 पृष्ठांच्या " अर्णव कविता संग्रहात अतिशय सहज शैलीत मनीष कानडे आपल्या कविमनास अभिव्यक्त करतात, या सर्वच रचना भावनिक विश्व साकार करून आपल्या मनाला आपलेसे करून घेतात ,
हे कवी मनीष कानडे याना खूप छान जमले आहे, यापुढेही त्यांच्या कवितेचा सहज प्रवास घडो अशा शुभेच्छा देतो.
प्रकाशक नंदिनी तांबोळी यांच्या नंदिनी पब्लिशिंग हाऊस - पुणे यांनी हा सुरेख संग्रह प्रकाशित केला आहे.
-------------------------------------------------------
पुस्तक परिचय लेखक -
अरुण वि. देशपांडे - पुणे.
संपर्क - 9850177342
------------------------------------
कवी - मनीष कानडे
9096748802
------------------ ------------------
अर्णव कविता संग्रह-
मुल्य- रु.100/ , पृ- 64
नंदिनी पब्लिशिंग हाऊस पुणे,
9422037714
---------------------------------------