Wednesday, May 29, 2019

पुस्तक परिचय लेख- सरत्या वसंताच्या गोष्टी,


पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------

अनुवादित कथा संग्रह -सरत्या वसंताच्या गोष्टी 
भावव्याकूळ करणाऱ्या लघुकथा 
-----------------------------------------------------------------------------
ओडीसी भाषेतील प्रथितयश व आघाडीच्या लेखिका -कमला सत्पथी लिखित  १७ लघुकथांचा समवेश असलेला 
मराठी भाषेतील अनुवादित कथा संग्रह - सरत्या वसंताच्या गोष्टी ", नुकताच वाचून झाला .

अहमदनगर येथील साहित्यिका - रचना  यांनी ओडिसी भाषेतील कथांचा  मराठीअनुवाद करण्याचे फार महत्वाचे 
आणि मौलिक असे साहित्यिक कार्य केले आहे ,त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करु या .

 या कथाबद्ल असे म्हणता येईल की  - सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आणि दैनदिन जीवन-क्रमात नेहमीच काही ना काही 
प्रसंग ,घटना ,घडून जातात ,अशा परिचित प्रसंगातून  मनाचे विविध भावनिक -व्यवहार वेगवेगळ्या रुपात दिसून येतात ,
अशा प्रसंगातून व्यक्ती व्यक्त होते ,हे व्यक्त होणे सर्वांसाठी पूर्णतः अनपेक्षित असते,, अशा वागण्याचे परिणाम फार 
दूरगामी परिणाम करणारे असतात  , हा अकल्पित असा फार मोठा धक्का पुढे मग आयुष्यभरासाठी सहन करावा लागतो.कारण 
बहुतेक वेळा तो मनातील स्वप्नाची, इच्छांची ,राखरांगोळी करणारा असतो. 

ऐन बहाराच्या . आयुष्यातील वसंताच्या दिवसातच  हे आघात  हे दु:खः सहन करावे लागलेल्या , उन्मळून गेलेल्या  मनांच्या 
आणि  माणसांच्या या कथा आहेत , त्या दृष्टीने या कथा संग्रहाचे शीर्षक 
सरत्या वसंताच्या गोष्टी ", अगदी अनुरूप असे आहे ,हे या सर्व कथा वाचून झाल्यावर प्रभावीपणे जाणवते. .
 या कथातेतील स्त्रिया म्हणजे  नायिका असोत ,व एक दोन कथेतील पुरुष असोत त्यांच्या मनातील दु:ख , वेदना 
 भावनांचा कोंडमारा हे सर्व ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत ..म्हणजेच आयुष्यातील सरत्या वसंतातही "ते  भोगत आहेत , 

या कथा तशा पाहिल्या तर ओडीसा या प्रांतातील जन-जीवनावर आधारित आहेत , तिथले सांस्कृतिक संदर्भ, यातून कथा घडत जाते .
असे असले तरी या कथा ज्यांच्या बद्दलच्या आहेत त्या यातील नायिका ,आणि इतर प्रमुख सह-व्यक्तिरेखा ..ही तर आयुष्य जगणारी 
हाडामासाची ,आणि मन असलेली माणसेच आहेत ", "माणसांच्या वर्तनावर "अचूक आणि मर्मभेदक भाष्य करणार्या 
संवेदनशील अशा या कथा वाचकांच्या मनाची भावावस्था मोठी व्याकूळ करून टाकतात . 
जीवनाची वाटचाल सुखद नाही , पण ती किती चमत्कारिक  आहे ,याचे  प्रतिबिंब म्हणजे या कथा आहेत.

मराठी अनुवाद वाचताना या कथा -लेखनाशी  वाचक भावनिकदृष्ट्या इतका समरस होऊन जातो की .."ओडिसी पाश्वर्भूमी असलेल्या या मराठी कथा आहेत ",
असा अभिप्राय दिल्यावाचून मला तरी राहवत नाहीये.याचे श्रेय अनुवादिका -रचना  यांनी केलेल्या मराठी अनुवादाला द्यावे लागेल  .
प्रत्येक  कथेचा आरंभ ललित निंबंध वाटावा अशा हळुवारपणाने होतो ,आणि कथा पुढे सरकत जाते ,हे ओघवतेपण या अनुवादाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य ठरेल.
.त्यातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या मनोव्यापारातील वाचक म्हणून एक सदस्य होऊन जातो , "

या संग्रहाची अर्पण पत्रिका "मोठी अर्थपूर्ण आहे .. "आत्मभानाच्या वाटेवर चालणार्या ...सर्व स्त्रियांना ", कारण या संग्रहातील कथा या स्त्री-प्रधान आहेत ,
या कथा-नायिकांची दु:ख ,वेदना , खंत , अपूर्ण राहिलेली स्वप्न ,आकांक्षा , हे समजून घेत असतांना "आत्मभान : जागेल असे खूप काही या कथेतून 
वाचकांच्या समोर येते ,जे मनाला नक्कीच एक जाणीव देईल असे आहे.

अनुवादिका रचना -यांचे मनोगत या दृष्टीने खूप महत्वाचे आहे- त्या म्हणतात -
"साधी शब्दकळा असून सुद्धा जगण्याचे विदारक वास्तव मांडण्याचे कसब  "कमला सत्पथी "या लेखिकेने साधले आहे . मनाचा तळ ढवळून काढत 
विचारप्रवृत्त करणाऱ्या या कथा आहेत. या कथा प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रश्नावर आणि बाईपणाच्या भोगवटा चित्रित करणाऱ्या आहेत..
या संग्रहातील कथांचे हे अगदी यथार्थ असे विशेष आहे.

शीर्षकात "गोष्टी "हा शब्द आहे ..या अर्थाने कथानायिका वाचकांना आपल्या आयुष्याची गोष्ट सांगतात - त्यांचे . उमेदीनचे पर्व सारून गेलेले आहे , समोर 
आलेल्या आयुष्याला स्वीकारून तडजोडीचे -नवे जगणे सुरु केलेल्या या नायिका ..आहेत..पण मनात ते जुने सगळे अगदी सांभाळून ठेवलेले आहे..
हे दु:ख मनस्वी आहे . असहायता , हतबलता , निराशा , आधार नसल्याची खंत , आणि मनाला समजून न घेणारी माणसे ".. ही या सर्व नायिकांच्या 
वाट्याला आलेले विदारक असे वास्तव- जगणे आहे.....  स्त्री-पुरुष , नवरा -बायको , मित्र-मैत्रिणी , पारिवारिक नाते-संबंध " याच्यातील 
विस्मयकारक असे विसंगतीपूर्ण चित्र  एकेका कथेतून येते ,ते आपल्या मनात निश्चितच एक अपराधीपणाची भावना निर्माण करेल.

बहुतेक कथेतून कथा -नायिका हीच  निवेदिका असल्यामुळे ..तिच्या  गोष्टीतील प्रत्येक भावनेला , दु:खाला एक सच्चेपणाचा स्वर लाभला आहे असे सतत जाणवते .

कथा - असहाय आयुष्य -(पृ..२३)- मधील - "मी "- बनूचाचाचे गोष्ट सांगते .या कथेत जुन्याकालातील मोठ्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले पिढी-पिढी 
मधले संघर्ष सांगताना , कळत नकळत म्हणा किंवा जाणूनबुजून म्हणा आपल्या माणसावर आपलीच माणसे कसा अन्याय करतात " हे खूप प्रभावीपणे आलेले 
आहे.

विवश मातृत्व -(पृ..३२) - जन्मदात्या आईच्या भेटीसाठी आंतरिक तळमळीने निघालेली एक मुलगी ..श्रीमंत बापाच्या सोबत जगात असलेल्या या मुलीला 
आपल्या जन्मदात्या आई बद्दल कळते , ती गरीब आहे, निर्धन आहे , दूर कुठे वस्तीवर राहणाऱ्या या आईला स्वतःच्या मुलीबद्दल काहीच माहिती नाहीये.
अशा माय-लेकीची ही कथा खूपच भावस्पर्शी आहे.

एक्स्चेंज ऑफर - (पृ,४३ )- कथानायक महापात्तबाबू " यांच्या मनातील सर्वच गोंधळ म्हणजे पुरुष-मनोवृत्तीचे चित्रण आहे , हलकी-फुलकी वाटणारी ही कथा 
गांभीर्याने एक महत्वाचे जीवन-सत्य सांगते ..जे वाचण्यातच मजा आहे.

अबलेचा बळी -(पृ..५१ ) - डॉक्टर आणि पेशंट हे नाते म्हटले तर उपचारापुरते असलेले नाते, गरज सरो ..आणि ..हे आपण अनुभवतो . पण दरवेळी असेच होते 
असे नाही .या कथेतील डॉक्टर .सवयीने सगळे उपचार -कार्य पार पडतो , पण समोरचा पेशंट .त्याची मृतप्राय अवस्था , आणि हे सर्व जिला भोगायचे आहे ती "सीता",
केवळ मोठ्या माणसांच्या अविचारी वागण्याने , निर्णयाने तिच्यावर कोसळलेल्या आपत्तीने मनातून हलून गेलाय, गलबलून गेलाय . काहीच चूक नसतांना 
जबर किमत चुकवावी लागणाऱ्या "सीताची "गोष्ट  डॉक्टर खूप दु:खाद मनाने सांगतात .

आपले घर , आपली वास्तू " एक जिव्हाळा " याची कथा - घरबेचान -(पृ.५९ ).. व्यवहार आणि भावना या लढाईत .कधी कधी भावनेचा विजय होऊ शकतो "अशी ही 
सुखद कथा आहे.

दाटलेलं आभाळ - (पृ..७५ )- सुकामिनीच्या आयुष्यात जे घडत ,त्याचीच पुनरावृत्ती तिच्या मुलीच्या आयुष्यात घडू पाहते आहे . सुकामिनी बंड नाही करू शकली ,
त्याची कारण पुन्हा आठवून उपयोग नाहीये ..पण म्हणून , आता आपल्याच मुलीच्या वाट्याला ते येऊ नये ..हा विचार  अधिक दृढ होणे ..हे सुद्धा तिच्यातील 
स्त्रीला एक नवे आत्मभान देणारे आहे.

अन्य  काही कथा व त्यांची शीर्षके - १.सरत्या वसंताच्या गोष्टी..(पृ.७), २.सहजीवन ..(पृ.८८ ), ३. कलाकाराचा मृत्यू ..(पृ.९८ ), ४. न परतणारा नदीचा प्रवाह .(पृ.१२५),
नाही म्हणू नकोस ..(पृ.१४३ ), 

ही थोडीशी झलक काही कथांची द्यावीशी वाटली . संपूर्ण संग्रहात अशाच सरस कथा आहेत. वाचनीय आणि चिंतनीय असे हे अनुवादित कथा लेखन आहे.
अनुवादिका -रचना यांना या लेखन -उपक्रमासाठी खूप खूप धन्यवाद.

प्रसिध्द साहित्यिक श्री.संजय बोरुडे यांनी स्थापन केलेल्या "हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र -अहमदनगर " या संस्थेच्या माध्यमातून अनुवादिका -रचना ,यांनी 
हे अनुवाद कार्य केले आहे.

या संग्रहाचे मुखपृष्ठ चित्रकार आहेत- श्री.तौफिक बागवान , छान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन.

प्रकाशिका -कोमल धनंजय खेडेकर यांच्या निशिराज प्रकाशन -पुणे ,यांनी या संग्रहाचे प्रकाशन केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------
अनुवादित कथा संग्रह -
सरत्या वसंताच्या गोष्टी -
मूळ लेखिका - कमला सत्पथी 
अनुवादिका - रचना 
पृ.१६० /- मूल्य- रु..२७० /-

प्रकाशक -
कोमल धनंजय खेडेकर 
निशिराज प्रकाशन -पुणे.
संपर्क -८८०४५६५०२३ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------