Tuesday, May 22, 2018

पुस्तक परिचय - अरुण वि.देशपांडे . कविता संग्रह - "द्वैत " प्रा - योगिनी देगमवार , आश्वासक वाटचालीचा आरंभ ...! --------------------------------------------------

पुस्तक परिचय लेख- 
अरुण वि.देशपांडे . 
--------------------------------------
कविता संग्रह - "द्वैत " 
 प्रा - योगिनी देगमवार ,
आश्वासक वाटचालीचा आरंभ ...!
-----------------------------------------------------------
 प्रा.योगिनी देगमवार या कवयित्रीच्या कविता .."द्वैत " या शीर्षकाच्या कविता संग्रहात आपल्याला वाचण्याचा योग आला आहे. विशेष म्हणजे कवयित्रीचा हा पहिलाच कविता संग्रह " आहे ,या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करून संग्रहाचे स्वागत करू या.
या संग्रहाच्या आरंभी कवयित्रीला .."आशीर्वाद आईचा " लाभला आहे.. आई कडून मिळालेल्या काव्य-प्रतिभेचा अविष्कार " आपल्याला या संग्रहातील कवितेतून झालेला आहे हे जाणवते.

कवयित्रीचे प्रेरणा -स्थान असलेले आदरणीय व्यक्तिमत्व डॉ.एस.व्ही .सालफळे यांची प्रस्तावना  "द्वैत "संग्रहाला लाभली आहे . कवितेबद्दल आणि कवयित्री बद्दल अतिशय आपलेपणाने व्यक्त होणारी ही प्रस्त्वाना वाचकांना या कवितेबद्दल खूप छान सांगणारी आहे. उदा -

"ह्या संग्रहातल्या साऱ्या कवितांचा प्रवास त्रिभुवानातून झालेला आहे . ह्या कवयित्रीला ह्या कवितांनीच चिंतन करावयास लावले आहे. तिनेच  "जग हे सुंदर , जगणे सुंदर " असा मंत्र दिला आहे. कृष्णाच्या भक्ती-गानातून एक सुंदर संगीत निर्माण झाले आहे .
कवयित्री योगिनी देगमवार यांच्या कविता खिन्न्तेकडून प्रसन्नतेकडे वाटचाल करणाऱ्या आहेत ..अंधारातून प्रकाशकिरणांकडे त्यांची धाव आहे " 
अशा संपर्क प्रस्तावने पाठोपाठ ..
पहिल्या आवृत्तीच्या निमित्ताने कवी श्रीपाद प्रभाकर जोशी यांचे मनोगत या संग्रहात समाविष्ट केलेले आहे..
कवी - श्रीपाद जोशी म्हणतात -
" द्वैत " या कविता संग्रहातून ..योगेश्वर कृष्ण अनेक कवितात विविध रुपात प्रबळपणे भेटतो  कृष्ण विषयक प्रीतीच्या अनुभक्तीच्या  या कविता लय, ताल, संगीत, नाद आणि शब्दकळेनं नटलेल्या आहेत..
.
"द्वैत " संग्रहाचा  ब्लर्ब - मजकूर  प्रा. राजेंद्र राऊत सरांचा आहे.. ते म्हणतात ..
या पहिल्याच काव्य संग्रहात बहुतांश कविता ह्या कृष्ण प्रेमात चिंब चिंब भिजल्यात.
श्रीकृष्णाशी संवाद साधतांना त्यांच्या शब्दाला भरते येते . नादमधुरता , शब्दांची लयबद्ध मांडणी , छोट्या शब्दातील आशयगर्भता वाचकांचे चित्त चोरते .
.कवीच्या पहिल्या संग्रहावर  इतके आश्वासक वाचायला मिळणे "खूप सुखद वाटणारे आहे. या दृष्टीने कवयित्री नशीबवान आहेत असे म्हणू या . 
"द्वैत " संग्रहातील कविता या नवोदित कवीच्या आरंभीच्या वाटचालीच्या पाउलखुणा असतील " असा अंदाज करून जर वाचू लागलो तर ..
आपला अंदाज चुकीचा ठरेल .कवयित्री योगिनी देगमवार यांचे कविता लेखन खूप आश्वासक तर आहेच  त्याच बरोबर त्यांची कविता आपली वाटचाल खूप दमदारपणाने करणारी आहे "  हे लक्षात येते.

कृष्ण-भक्तीपर रचना "या संग्रहात विपुल असल्या तरी .हा काही अध्यात्मिक किंवा भक्ती -कवितांचा  संग्रह नाहीये , इतर कवितांचा उल्लेख या ठिकाणी केला तर ..योग्य होईल असे मला वाटते.

कवयित्री योगिनी यांनी आपल्या कविता लेखनाबद्दल म्हटले आहे .."कधी थोडी वेगळी वाट चोखाळत , कधी आतील अभिव्यक्तीचा शोध घेत उत्स्फूर्तपणे मानवी वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे ";
कविता लेखनाचा कवयित्रीचा हेतू स्पष्ट आणि प्रामाणिक आहे यात शंकाच नाही. 

तसे पाहिले तर या संग्रहातील त्यांच्या इतर कविता ..विषयाने फार वेगळ्या आहेत " असे म्हणता येणार नाही..पण या कवितेतून कवयित्री एक माणूस म्हणून तळमळीने व्यक्त होत आहे हे जाणवते . कवीने नुसते भाष्य केलेले नाहीये .तर त्यांच्या मनातील जाणीव, तळमळ  हे सगळे या कवितातून अभिव्यक्त  होते.

काही कविता उदाहरणे देतो...

स्त्री- जाणीवेची ही एक कविता ..
"बघू द्या तिला अंतर्मनात 
होऊ द्या काही बोध 
तिच्यातल्या " ती " चा 
घेउ द्या जरा शोध ,
नकोय आता तिला
कौतुकाची थाप 
समर्थ तिची ती 
स्वतंत्र तिच्या विश्वात ...( ती ..पृ. ८१ ),

स्त्री-मनातली दुर्दम्य आशावाद आणि स्त्री -शक्तीला आवाहन करणारी ,विस्वास देणारी ही एक कविता..

"चल उठ आदिशक्ती 
चल उठ नारायणी 
करण्या उद्धार तू जगाचा 
चल घे भरारी गगनी 
चल घे भरारी गगनी .....( चल  घे भरारी गगनी ..पृ..७३.), 

पाउस आणि शेतकरी , शेतकर्याचे जीवन आणि पाउस , पावसाच्या लहारीपानाने उध्वस्त झालेल्या शेतकर्याचे दुखः कवयित्रीचे पण दुक्ख होऊन कवितेतून करुण-विनवणीच्या कवितेतून  व्यक्त होते..
" अरे पावसा पावसा 
  आता एकच मागणे 
 बळीराजाचे संपव आता 
  हे लाचारीचे जिणे..... ( अरे पावसा पावसा ..पृ. ७० ),

एका शिक्षकाच्या ,गुरु आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेतून मुलांना , नव्या पिढीला आपण सांगितले पाहिजे ..कवयित्री आपलेपणाच्या शब्दातून मुलांना सांगते..पालक आणि बालक दोघांनी लक्षात ठेवावा असा हा मोलाचा संदेश आहे..

अभ्यासात हुशार म्हणजेच हुशारी नसते 
चित्र रेखाटण्याची कला देखील एखाद्यात असते 
रंगबेरंगी रंगांनी ,रंगवा जीवनाला 
कधीच लेखू नका कमी स्वतहाला ....( मुलांनो एकच सांगायचंय ... पृ.६५ ),

स्त्री -आणि तिच्या शिक्षणासाठी आयुष्यभर लढत राहिलेल्या "माय - सावित्री "बद्दल ची कविता ..
" सावित्री तू माय आमुची 
   लढलीस आमच्यासाठी 
   ज्ञानामृत हे शिक्षणाचे 
 लाविले आमच्या ओठी .... ( सावित्री ..पृ.५३ ),

मानवाच्या ठायी माणुसकी असावी , मानवतेचा विशाल  अशा दृष्टीकोनातून ..कवयित्री मानवतेची लेणी शब्दातून साकारते आहे ..ही तळमळ मोठी भावणारी आहे..

" जाती, पंथ , धर्म सोडुनिया सारे 
शब्द हीच लेकुरे कवितेठायी 
चला पाहू आता बंधने तोडूनी 
मानवतेची लेणी कवितेमाजी ...(पृ..४२ )...,
ही झाली इतर कवितांची उदाहरणे ... "

 द्वैत " कविता संग्रहाचे खरे आकर्षण आहे ते.. कृष्णमय कविता . 

कृष्ण-भक्ती , कृष्ण प्रीती , आणि  कृष्ण-भक्ताच्या भक्ती-भावाचा अतिशय उत्कट , हृदयंगम असा शब्द-अविष्कार कवयित्री योगिनी देगमवार यांच्या काव्य- रचनेतून होतो.
कृष्ण -मिलन, कृष्ण -विरह .हा कृष्ण -आणि गोपी यांच्यातील भक्ती-नाते बंध ..या नात्यांचे विलक्षण असे भावूक दर्शन कवयित्रीच्या रचनेतून होते..

आजच्या भीषण अशा वर्तमानात कृष्णाला .."एकदा परत ये " अस बोलावणे किती महत्वाचे आहे..ते पहा..

" तुझ्या वस्त्रांची लांबी वाढवावी लागेल तुला 
  किती तरी पांचाली आज भोगतायत मरणकळा.....( एकदा परत ये ..पृ.२० ),

रसिक हो ..कवयित्री योगिनी देगमवार यांच्या कविता संग्रहाने खूप छान कवितांचा आस्वाद-आनंद दिला , अशा छान कविता-लेखनाबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील लेखन-प्रवासास शुभेच्छा.

या संग्रहाचे अनुरूप मुखपृष्ठ करणारे कलावंत चंद्रपूरचे श्री.सुदर्शन बारापात्रे यांचा उल्लेख करावा लागेल.

"द्वैत " काव्यसंग्रह ..अमरावतीच्या मेधा पब्लिशिंग हाउस व प्रकाशक संजय रा.महल्ले यांनी प्रकाशित केला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
-------------------------------------------------------------------------
द्वैत -
(कविता -संग्रह )
पृ.८८ , मूल्य- रु. ८० /-
प्रा.योगिनी देगमवार -चंद्रपूर 
संपर्क - ९९७०१५५२७८ 
---------------------------------------------------------------------------------------
प्रकाशक -
मेधा पब्लिशिंग हाउस - अमरावती 
संपर्क -९४२३६२२६६७ 


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक परिचय लेख – अरुण वि.देशपांडे भावूक व्यक्तिचित्रणे – “सावलीची झाडं “

पुस्तक परिचय लेख –
अरुण वि.देशपांडे
भावूक व्यक्तिचित्रणे –
“सावलीची झाडं “
जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे .म्हणजे ललित –लेखनाचे मनोरम असे उदाहरण आहे ,लेखकाला अनेक व्यक्तींचा सहवास लाभला , हा सहवास लेखकाला सर्वार्थाने एक संपन्न-माणूस “ बनवणारा ठरला आहे , सहाजिकच या व्यक्तीविषयी लेखकाच्या मनात आदरभाव आहे, एक कृतज्ञता आहे . लेखक चंद्रकुमार नलगे यांच्या लेखनाचा भाव -उत्कट असा अविष्कार  “सावलीची झाडं “ या लेख –संग्रहात झाला आहे.
एकूण १४ व्यक्ती-चित्रे या संग्रहात आहेत. लेखकाच्या वैयीक्तिक आयुष्यात या सर्व व्यक्तींना आदराचे स्थान तर आहेच आहे , या शिवाय या व्यक्तींनी लेखकाच्या मनावर अनेक संस्कार केले आहेत , हे संस्कार लेखकाला आपण एक “माणूस “ होऊनच जगायचे आहे “,याची जाणीव करून देणारे आहेत . व्यक्ती आणि सहवास “हे व्यक्तिमत्व जडण-घडण होण्या साठी किती महत्वाचे असतात “ याची जाणीव प्रस्तुत संग्रहातील लेखांमधून येते .
दीर्घ असा जीवनपट या लेखनातून लेखक मांडतात ,हे वाचत असतांना त्या त्या काळातील संदर्भ आपल्याला खूप काही सांगणारे वाटतील , एक सांस्कृतिक आणि समाजिक असे दर्शन या लेखनातून नक्कीच होते . 
साहेब आणि मी “,-
– महाराष्ट्राचे नेते,माजी उपपंतप्रधान , रसिकाग्रणी , विचारवंत  साहित्यिक नाम.यशवंतरावजी चव्हाण यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या आहेत ..लेखकाच्या एकूणच आयुष्य-प्रवासात मा.यशवंतराव चव्हाण यांच्या सह्वासातील दिवसांना असलेले असाधारण असे भावनिक महत्व “,. विद्यार्थीदशेतील दिवस, अडचणीच्या वेळी चव्हाणसाहेबांनी दिलेला मायेचा आधार ,याबद्दल लेखक अतिशय भावुकपणे व्यक्त होतात .
लेखक , प्राध्यापक अशा दोन्ही भूमिकेतून वावरत असणार्या चंद्रकुमार नलगे यांनी सातत्यानी अनेक उपक्रम राबवले “,या सर्व उपक्रमासाठी मा.यशवंतराव चव्हाणसाहेबांचे आशीर्वाद लाभले , चव्हाणसाहेब आवर्जून नलगे यांच्या उपक्रमाना आवर्जून उपस्थित राहिले “,हे दिवस लेखक कसे विसरू शेकन ?
उमेदीच्या धडपडीच्या दिवसात मा.यशवंतराव चव्हाणसाहेबांच्याबद्दल – लेखक म्हणतात..
“साहेबांना धडपडणाऱ्या मुलांबद्दल खूप आत्मीयता होती त्यांना ते कधी विसरत नसत “,
“बलदंड हिमालयाच्या सरंक्षणासाठी धावून जाणारा कणखर सह्याद्री , कृष्णाकाठची अस्सल अस्मिता ,आपल्या महाराष्ट्राचेच काय , भारत देशाचेही भविष्य उज्ज्वल घडावे म्हणून द्रष्टेपण जपणारा थोर शासनकर्ता, समाजनिष्ठ धारणेचा विचारवंत ,उपेक्षितांविषयीव दुर्लाक्षितांबद्द्ल करुणा असणारा माणूस म्हणजे साहेब.
मा.साहेबांचे सगळ्या लहान थोरावर प्रेम होते , विशेषतः स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाईवर तर खूप जीव होता. नवं हेरत ,पारखत ,त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत . तो दीप मालवला नाही, तो प्रत्येकाच्या अंत:करणात तेवत राहिला आहे.
साहेबातील माणूस “ लेखकाने खूप छान शब्दात व्यक्त केला आहे .. 
संग्रहाच्या आरंभीचा हा लेख वाचून वाचकांच्या मनात पुढील लेख वाचूया असे वाटणे साहजिक आहे ,याचे कारण ..ओघवत्या शैलीतील या आठवणी नलगे सरांनी खूप आपलेपणाने सांगितल्या आहेत ,आपण एक वाचक न राहता .नलगेसरांच्या परिवारातील एक सदस्य होऊन जातो “.
रवींद्रनाथांच्या साक्षीनं “, या लेखात लेखकाने वाचकांना त्रिपुराची सुंदर सहल घडवली आहे नलगेसर त्यांच्या दादाबद्दल म्हणजे पद्मश्री डी.वाय .पाटील यांचे बद्दल लिहितात –“ त्रिपुराचे राज्यपाल ,एक शिक्षणमहर्षी ,सकळ जनांचे कैवारी ,निगर्वी महंत, असंख्यांची सावली “ ,
अगदी समर्पक शब्दात व्यक्त होणे नलगे सरांना खूप छान जमते “ हे या संग्रहातील सर्वच लेखनात जाणवते , यामुळे हे व्यक्तिचित्रे अधिक ठळकपणे आपल्या समोर आकारून येतात , नलगे सरांच्या लेखनाचे हे एक छान वैशिट्य आहे.
या संग्रहातील लेखनशैली साधारण लेख " अशी नाहीये , प्रत्येक लेख एकाद्या ललित निबंधाची सुरुवात वाटावी अशी आहे,  जीवन विषयक तत्वज्ञान , निसर्गवर्णन , कधी गहन-गंभीर वाटावे असे आत्म-निवेदन ", असा आरंभ करून लेखक आपल्या व्यक्तीविषयी व्यक्त होत जातात ..त्यांच्या मनाचे हे उलगडणे वाचकांना खूप भावणारे असेच आहे.
प्रसिध्द साहित्यकार प्राचार्य रा.रं.बोराडे सर यांच्या बद्दलचा लेख " एक मनस्वी स्नेही ",व्यक्ती-रूपातील अनेक पैलूंचे घडणारे हे दर्शन लेखकाने अतिशय स्नेह-भावनेने केले आहे.
लेखक चंद्रकुमार नलगे यांनी स्वतःच्या कथेवर निर्माण केलेला "अंगाई " हा चित्रपट ,त्यानिमित्ताने त्यांना आलेले अनुभव संग्रहातील अनेक लेखातून आलेले आहेतच , या ओघाने असलेला  "साधुत्व " हा लेख .. मराठी चित्रपट सृष्टीतील थोर कला-दिग्दर्शक  बळीराम बीडकर " , यांच्याबद्दल रसिकांना फारशी माहिती नसेल , पण लेख्कामुळे "बीडकर साहेब" वाचकांच्या पर्यंत पोंचले . "साधुत्व " हा लेख खूप छान झाला आहे.
संग्रहाचे शीर्षक आहे ..सावलीची झाडं ", या संग्रहात एक लेख आहे - सावलीचं झाड ",
कवी-वामन होवाळ ", यांच्याबद्दलचा अतिशय मनस्पर्शी मनोगतून लेखक व्यक्त होतात ."वामनरावांच टवटवीत मन , निरागस अंत:करण, त्यातील असलेला कळवळा माझ्यासारख्या खेड्यातल्या मातीत रमलेल्याला नवा जोश देणारा असतो. त्यांच्या या शुभेच्छांनी पिढ्याच्या पिढ्या घडलेल्या आहेत. मनाचा स्वच्छ नि नितळ माणूस म्हणजे वामन होवाळ ..".सर्वांना आपला वाटणारा माणूस.
सावलीची झाडं " संग्रहातील अन्य व्यक्ती-चित्रांची शीर्षक अशी आहेत..
" रामबापू "(पृ.२१ ), स्वप्न " (३९ ) , "आनंदी आनंद " (पृ.५६ ), दिबा ",(पृ.६६ ), "नाथ पंढरीचा (पृ,७७ ), ""नामा म्हणे ", (पृ.९५ ), "पंत " (पृ.१०३ ), "माझे दादा .(पृ..११५ ),आणि " ज्वाळा " (पृ.१२५ ).
"सावलीची झाडं " हे लेखन स्नेहभावाने ओतप्रत भरलेले असे लेखन आहे , मित्र-जिव्हाळा , पारिवारिक जिव्हाळा , प्रेम, श्रद्धा , विस्वास , जीवनविषय निष्ठा आणि आयुष्यातील चढ-उतार करतांना मनाच्या ठायी असलेली दुर्दम्य इच्छा ",असे अनेक भाव-रंग या लेखनात आहेत ,जरूर वाचावा असा हा संग्रह आही.
लेखक चंद्रकुमार नलगे यांचे साहित्य वाचकप्रिय आहेच ,त्यांच्या या साहित्यकृतीला नेहमीप्रमाणे वाचक भरभरून प्रतिसाद देतीलच . सरांना शुभेच्छा.
मुखपृष्ठ चित्रकार आहेत अविनाश कुंभार , आणि शिवशाहीर राजू राउत यांची रेखाचित्रे या सजावटीने संग्रह आकर्षक झाला आहे.
प्रकाशक दादासाहेब काका जगदाळे यांच्या तेजश्री प्रकाशनने हा संग्रह प्रकाशित केला आहे. 
-------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
---------------------------------------------
ले- चंद्रकुमार नलगे 
संपर्क- ९८९०४११३२३ 
----------------------------------------------------
सावलीची झाडं 
(व्यक्तिचित्रे )
पृ. १३६. मूल्य-रु.१७५ /-
प्रकाशक - 
तेजश्री प्रकाशन ,
संपर्क- ८२७५६३८३९६ 
-------------------------------------

Saturday, April 21, 2018

पुस्तक परिचय - अरुण वि.देशपांडे -पुण- सुरेख निसर्ग -गौरव गीत " हिरवं हिरवं जंगल -

पुस्तक परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------

 सुरेख निसर्ग -गौरव गीत "
हिरवं हिरवं जंगल -
----------------------------------------
लेखिका -कवयित्री लीला शिंदे  -  बालसाहित्यात सातत्याने लेखन करणाऱ्या साहित्यकार म्हणून परिचित आहेत,
"हिरवं हिरवं जंगल " हा त्यांचा बालकुमार कवितांचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. महत्वाच्या सामाजिक समस्येला अनुसरून त्याबद्दल लिहिणे "कवीचे एक महत्वाचे लक्षण असते ..कवयित्री लीला शिंदे यांच्या प्रस्तुत संग्रहातील कविता या  निसर्ग , सृष्टी , जंगल , या विषयवर आहेत , या सर्वांशी माणूस म्हणून आपला संबंध येतो  तो कसा आहे ? याचे उत्तर  देणारी त्यांची कविता एक महत्वाचा संदेश देणारी आहे.
संग्रहाच्या मलपृष्ठावर असलेल्या कविता ओळी - म्हणजे या कविता लेखनाचे प्रयोजन आहे ..कवयित्री म्हणते आहे की -
जंगलाचा ऱ्हास होतोय.
नासधूस होतीय .
त्याला राखणं , जपणं 
हे आपलं काम आहे .
तो भावी पिढीचा ठेवा आहे.
तो त्यांच्या मनात या 
कवितामधून 
रुजला जाईल
अशी आशा वाटते .

कवीचा आशावादी दृष्टीकोन हाच मोठा संस्कार करणारा आहे असे म्हणावेसे वाटते , त्यामुळे कवी जे सांगतोय ते या वाचकांच्या मना पर्यंत थेट पोचते .
जंगला बद्दल  कवितेतून सांगणे हे कवीला सहज जमले आहे ..
" चला चला रे जंगलात जाऊ 
गमती जमती डोळाभर पाहू 
खाली वरती चोहीकडे 
जंगलात सदा नाट्य घडे ...( जंगल सफारी .. पृ.१५ ),
अशा या जंगलाची सफर सुंदर आहे , रम्य आणि थरारक आहे , हे जंगल ज्या निसर्ग -सृष्टीचा भाग आहे , ती सुर्ष्टी कशी आहे ..बघा या कवितेत ...

" धरती वरती नद्या वाहती 
हिरवी शेते अवखळ वारा सोबती 
इंद्रधनूची वरात 
अवतरली धरती वरती ...(किती सुंदर सृष्टी ...पृ..१९ ),

अशा या हिरव्या जंगलात सृष्टीचे सुंदर रूप आपल्या नजरेस पडत असते .हिरवे डोंगर , नदी ,तलाव ,
 आणि तळे  या ठिकाणी  "एक सोहळा "पहावयास मिळतो ..त्याची एक सुंदर कविता आहे..
या तळयात .काळे-पांढरे सुंदर बगळे , सुळसुळ पळणाऱ्या मासोळ्या , पाणकोंबडे, पांढरेशुभ्र करकोचे " असे पाण-पक्षी आहेत ..एकाचवेळी हे सगळे पहाणे किती छान असेल ? त्या साठी जंगलात गेलेच पाहिजे.

निसर्ग आणि त्याचे सौंदर्य अचूक शब्दात व्यक्त करणारी कविता " ,  कवयित्री लीला शिंदे यांच्या लेखनाचा एक सुंदर अविष्कार या कवितांच्या निमित्ताने झाला आहे.
माणूस म्हणून तुम्ही आम्ही नेमके कसे आहोत ..निसर्ग संपत्ती आणि जंगल वैभव .याच्याशी आपले नाते आहे ते कसे स्वार्थी आणि विध्वंसक झाले  आहे यावर बोलणारी "हव्यास " ही कविता पहा..

"माणसाचा खोटा हव्यास 
जंगलाचा  केला नास 
पोटी आटले  चैतन्य 
झाला हिरवाईचा ऱ्हास... 
हे सगळे यावरच नाही थांबले ..त्याचा परिणाम ..कसा झाला त्यावर नेमके भाष्य .कवयित्री करते ..
" हिरवा झाड झाडोरा 
फळा फुलांनी लागडला
जंगलाचा तो तोरा 
किती ओसाड उजाडला ...(   "हव्यास ", पृ..५ ) 
असे वास्तव चित्रण या कवितेतून येते, आणि हे वाचून मन अस्वस्थ होऊन जाते ..

या शिवाय ..या संग्रहात ..जंगल ", नदीमाउली ", उत्तुंग उंच डोंगर हिरवे  ", " किमया ", डोंगरबाबा ", " पानगळ ", खारूताई "  अशा कविता आहेत  या सर्व कविता  " हिरवं हिरवं जंगल " संग्रहातून एका अर्थाने निसर्ग संस्कार करतात.
माणसाने निसर्ग -हनी केली आहे , जंगल नष्ट केले आहे " मग याची भरपाई तर माणसाने केलीच पाहिजे ..या भावनेतून कवयित्री म्हणते ..
एक नवं झाड लावू या 
परोपकराच बी रुजवू या ... ( पृ.२४ )
या संस्कार -विचारास आपण प्रत्यक्ष्य कृतीत  आणू शकलो तर  "जंगल " या भावी पिढ्यांच्या ठेव्याचे रक्षण केल्याचे समाधान आपण नक्कीच मिळवू शकतो " कवयित्रीच्या या आशावादी हेतूस यश मिळावे अशी प्राथना करू या.
"हिरवं हिरवं जंगल "  या कविता संग्रहाचे यथार्थ मुखपृष्ठ ,आतील रेखाचित्रे ..व सजावट, चित्रकार -प्रकाशक ल.म.कडू सर यांची आहे ", या उल्लेखाने सुद्धा हे पुस्तक प्रत्यक्षात किती सुरेख असेल याचा अंदाज येतो.

खूप छान कविता ,आणि तितकाच सुरेख कविता संग्रह ..हिरवं हिरवं जंगल " बद्दल कवयित्री लीला शिंदे , प्रकाशक - ल.म.कडू  आणि गमभन प्रकाशन यांचे अभिनंदन.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------
कवयित्री लीला शिंदे 
संपर्क -९४२१६८८५७६ 
हिरवं हिरवं जंगल 
कविता संग्रह 
पृ.- २४ , मुल्य रु.३० /-
ल.म.कडू 
गमभन प्रकाशन -पुणे.
०२०- २४४५८१४१ 
-----------------------------------------------------

पुस्तक-परिचय - अरुण वि.देशपांडे -पुणे. - संस्कार -कथा श्यामच्या छान छान गोष्टी " ले- नागेश सू. शेवाळकर

पुस्तक-परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------
संस्कार -कथा 
श्यामच्या छान छान गोष्टी " 
ले- नागेश सू. शेवाळकर 
---------------------------------------------------

प्रकाशक दत्ता डांगे आणि इसाप प्रकाशन यांनी प्रसिद्ध लेखक श्री.नागेश सू.शेवाळकर यांचे कडून मुलांसाठी संस्कार-गोष्टी लिहून घेऊन मुलांची सुट्टी वाचनीय केली आहे ",
साने गुरुजी , श्याम आणि श्यामची आई " ,ही नावे मराठी माणसाच्या मनात आदरणीय ठरलेली व्यक्तिमत्वे आहेत.
श्यामची आई आणि श्याम " दोघांबद्दल किती ही वाचायला प्रत्येक पिढीतील वाचक आतुर असतो.

लेखक नागेश सू.शेवाळकर यांनी अतिशय आत्मीयतेने छोटय-छोट्या  पाच-सहा छान गोष्टीचे लेखन  बालमित्रांसाठी 
केले आहे .
"प्राणीमात्रावर दया ",  कळीचे फुल " , संस्कार श्रमाचे , " आधी केले मग सांगितले ", "वाचन आणि कृती ", "लाजीरवाणा ", अशा या सहा निवडक गोष्टीतून 
 " मोलाचे संदेश ,आणि संस्कार -धन मुलांना मिळाले पाहिजे हा उदात्त लेखन हेतू " सहजतेने साध्य होतो कारण मुळातच सानेगुरुजींचे साहित्य मातृ-प्रेमाचे महामंगल स्तोत्र आहे " असे आपण म्हणतो .

श्यामच्या छान छान गोष्टी " हे सोळा पानांचे चिमुकले पुस्तक ..आकाराने मोठे आहे , यातील मजकूर मोठ्या -ठळक अक्षरात आहे ..या पुस्तकातील सगळीच्या सगळी पाने रंगीत आणि  यातील चित्र सुद्धा मोठी आहेत ..ही सर्व सजावट पुस्तकाला आणि गोष्टींना आकर्षक बनवते 
या गोष्टीच्या पुस्तकाचे छान मुखपृष्ठ / सजावट  भास्कर शिंदे आणि विजय चित्तरवाड या चित्रकार कलावंत यांनी केले आहे.
" महाराष्ट्र राज्य शासनाच्या "सर्व शिक्षा अभियान " २०१७-२०१८  "शिक्षणाचा अधिकार " या उपक्रमाअंतर्गत हे पुस्तक निवडले गेले आणि इसाप प्रकाशनास हे पुस्तक प्रकाशित करण्याचा योग आला   श्यामच्या छान छान गोष्टी "या पुस्तकाच्या ऐंशी हजार प्रती" (८००००) निघाल्या आहेत .प्रकाशाक आणि लेखक दोघांसाठी ही मोठी गौरवाची गोष्ट आहे.
लेखक नागेश सू.शेवाळकर आणि इसाप प्रकाशन व प्रकाशक दत्ता डांगे यांचे या गौरवास्पद उपलब्धीबद्दल अभिनंदन करू या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
------------------------------------------
श्यामच्या छान छान गोष्टी 
लेखक -नागेश सू.शेवाळकर 
संपर्क -९८३४५४८१६६
पृ- १६ , मूल्य- रु. २८ 
प्रकाशक -
दत्ता डांगे - इसाप प्रकाशन 
सहयोग नगर -नांदेड.
९८९००९९५४१ 
---------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख- -अरुण वि.देशपांडे - चित्रमय कविता - "गमती -जमती ", बालकविता संग्रह लीला शिंदे. --

पुस्तक-परिचय लेख- 
-अरुण वि.देशपांडे 
----------------------------------------
चित्रमय कविता -
"गमती -जमती ", 
बालकविता संग्रह 
लीला शिंदे.
----------------------------------
बालसाहित्यातील महत्वाची नावं घेतांना त्यात लेखिका -कवयित्री - लीला शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने येत असते ,
गमती जमती " या   त्यांच्या नव्या कविता संग्रहाचा परिचय करून देतांना  त्यांच्या प्रकाशित साहित्याबद्दल नव्याने काय सांगावे..,?
 लेखिका - कवयित्री -लीला शिंदे आणि त्यांचे बाल-साहित्य  सर्वपरिचित आहे., तरी पण ..त्यांच्या काही पुरस्कार प्राप्त साहित्याचा उल्लेख जरूर केले पाहिजे ..तो असा -
१.चार गोष्टी आवडीच्या - राज्य पुरस्कार , २.पंख येती पक्षाला - राज्य पुरस्कार , ३- या मुलांनो या " - बा.कु.सा .पुरस्कार , ४- अभ्यास झाला सोपा- प्रदूषण मंडल आणि इको फोक्स या संस्थांचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार .

वरील उल्लेख यासाठी केलेत की ..लीला शिंदे यांचे  बालसाहित्य लेखन हे विविध स्वरूपाचे असून  ते सातत्याने पुस्तक रूपाने येत असते 
प्रस्तुतचा  " गमती जमती " हा कविता संग्रह तसा छोटासाच आहे..पण या संग्रहाची साईझ .नेहमी पेक्षा मोठी आहे.,
"रंगीत पानावरती , मोठ्ठी रंगीत चित्र ..आणि त्या सोबत छानशी कविता ..ज्या अर्थातच  गमती-जमतीच्या आहेत.

.पहिलीच कविता - लबाड कोल्होबा .. ( पृ.४ ),
या कवितीत वाघोबादादा सोबत लबाडी करणाऱ्या कोल्होबाची लबाडी कशी उघडी पडते याची गोष्ट खूप छान सांगितली आहे.

.कविता दुसरी - नाजूक नि सुंदर अशा  "फुलपाखरू " ची.

"फुलपाखरा रे फुलपाखरा 
पंख चिमुकले मऊ मुलायम 
रंगीबेरंगी नक्षी नयनरम्य 
वाऱ्यांसंगे भिरभिरती 
अलगद नाजूक फुलावरती 
कित्ती रे तुझी फुलांवर प्रीती .....(पृ.५ ),

कवितेतील ओळी आणि त्याला असलेले अनुरूप असे चित्र ..यामुळे कविता कशी छान चित्रमय होते .याचे उत्तम उदाहरण म्हणजे  हा " गमती जमती "हा कविता संग्रह आहे.. ,

माकडोबा - या छोट्या कवितेत माक्डोबाची उडालेली घाबरगुंडी वाचून बाल मित्र खुदकन हसतील ..
घाबरला साप पळाला 
सळ.. सळ..सळ..
माकडोबा हसले 
खळ.. खळ..खळ... ( पृ..१२ ),

हळू वारा , जोराचा वारा , सुसाट वारा ..हे आपण नेहमीच पहातो .. पण, "वारा " कवितेत " वारा भेटला कि तो चान कविताच होतो...ही कमाल कवयित्री लीला शिंदे यांची आहे..
आला वारा वारा आला
भुर्र भुर्र...भुर्र ..
आता इथं , गेला कुठं 
दूर .. दूर .. दूर ...   (पृ.१८ ),

चित्रविचित्र - या कवितेत असे प्राणी भेटतात ..ही एक निराळीच गम्मत वाटेल.. कारण..यात 
बिनसोंडेचा हत्ती , हरणाचं तोंड असलेला पट्टेरी वाघ , आणि खट्याळ माक्डोबाला चक्क हत्तीचे पाय आहेत..
सगळीच कविता म्हणजे एक धमाल आहे ..जरूर वाचा..( पृ.२१ ),

तुमच्या-आमच्या ,सर्वांच्या आवडीच्या " पावसावर " एक मस्त कविता ..
या पावसला सारी मुले काय म्हणत आहेत बघा तरी ...
"पावसा पावसा रोज ये 
 मोठ्ठं तळ साचू दे
चिक चिक चिखल होऊ दे 
मस्त मनसोक्त खेळू दे ....(पृ.२४ ),
असा पाउस दोस्त म्हणून खूपच आवडेल ,नाही का ?

अशा गमती-जमतीच्या अजून छान छान कविता आणि सोबतची सुरेख बहारदार रंगीत चित्र यात आहेत..
काही कविता शीर्षक तर पाहा ..
" चांदोबा  (पृ.६ ), " साखरझोप "- (८) , कोण बरे रंगवितो ..(पृ..१३ ),  "सुंदरमेळ- (१५ ), 
"खूप खूप मज्जा ..(२२ ) , डोंगर ..( २८) ,  चित्रखेळ, आणि इतरही कविता या संग्रहात आहेत.

गमती जमती - कविता संग्रह आकर्षक आणि देखणा आहे, बालमित्र हा संग्रह पाहताक्षणी तो हातात घेतील हे नक्की .
लेखिका -कवयित्री  लीला शिंदे यांच्या लेखनाचा हा एक सुंदर असा अविष्कार आहे असे म्हणू या.
त्यांना लेखन शुभेच्छा.

चित्रकार -पुंडलिक वझे ..यांनी कविता आणि रंगीत चित्र खूपच सुंदर केली आहेत.त्यांचे अभिनंदन 
.
प्रकाशक -माधुरी रमेश राऊत यांनी साक्षात प्रकाशना कडून बालमित्रांना एक सुरेख कविता संग्रह भेट दिला आहे ,त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------
गमती जमती 
बाल कविता संग्रह 
लीला शिंदे 
पृ.३१ , किंमत -रु..१०० /-
संपर्क - ९४२१६८८५७६ 
-----------------------------------------------------------------
प्रकाशक - माधुरी रमेश राऊत,
साक्षात प्रकाशन - गारखेडा ,औरंगाबाद 
संपर्क - ९४२१३१७२१० 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख - अरुण वि.देशपांडे -पुणे. सुंदर आणि वेधक भावकविता - अंतर्साद - कविता संग्रह.

पुस्तक-परिचय लेख - 
अरुण वि.देशपांडे -पुणे.
----------------------------------------------------

सुंदर आणि वेधक भावकविता -
अंतर्साद  - कविता संग्रह.
-----------------------------------
कोणत्याही कवीचा पहिला कविता संग्रह प्रकाशित होतो , त्यानंतर अनेक दिवस या कवीची भाव-अवस्था ही अतीव अधिरतेची होऊन जाते , आपल्या कविता संग्रहाचे स्वागत रसिक आणि वाचक कसे करतील याची उत्सुकता ताणलेली असते . कवी प्रा.राहुल राजोपाध्ये यांच्या मनाची उत्सुकत मला जाणवते आहे.

त्यांचा  पहिलाच कविता संग्रह  "  अंतर्साद   " नुकताच वाचून झाला , या कवितेचा परिचय वाचकांना करून द्यावा  असे  वाटले ..म्हणून हा परिचय लेख.
प्रा.राहुल राजोपाध्ये हे देवरुख येथील " राजेंद्र माने -अभियांत्रिकी महाविद्यालयात  ऑटोमोबाईल विभागाचे "विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  
कवितेबरोबरच ललित लेखन आणि लघुकथा लेखन ते करीत असतात .. साहित्य लेखन आणि अध्यापन " अशा दोन्ही क्षेत्रात राहुल राजोपाध्ये  या व्यक्तिमत्वाचा "  एक कवी , एक प्राध्यापक अशा दोन्ही रुपात सहज संचार चालू आहे , 
.
मनात उमटलेल्या तरंगांचे प्रातिनिधिक आरेखन  म्हणजेच कविता " ,अशी सोपी व्याख्या  कवीने आपल्या मनोगतात व्यक्त  केली आहे , भावनांचा शब्द-रूपातील अविष्कार ..म्हणजेच साहित्य , कवीच्या मनातील आंदोलने , वादळे , आवर्तने ..हे सारे काही व्यक्त होत असते ते त्याच्या कवितेतून.

मनात जे काही उमटते ..ते कागदावर उतरवतांना जसेच्या तसे उतरवणे ", मग ही कविता नियमांच्या चौकटीत बसणारी नाहीये " हे कवी अगदी मोकळेपणाने सांगतो आहे ..या कवीचे हे असे सांगणे ..हा त्याचा आणि त्याच्या कवितेचा " प्रांजल -स्वभाव "आहे असे मला वाटते. 
एका अर्थाने "मुक्तछंद " कविता लेखन या संग्रहात आहे असे ही नाही .कारण -
कविता लयबद्ध असली पाहिजे,कविता ही "गेय -कविता असली पाहिजे " असे कविता संस्कार करणारी कवितेची जाणकार मंडळी कवीच्या सहवासात आहे , किंबहुना त्यांच्या नजरेखालून या कविता संग्रहात आलेल्या आहेत.,
यामुळे एक मात्र नक्की झाले .. कवी राहुल राजोपाध्ये यांच्या कविता ..कवितेच्या परिचित चौकटीच्या बाहेरच्या आहेत " असे जाणवत नाही.

अंतर्साद " संग्रहात एकूण ६६ कवितांचा समावेश आहे . एकेच एक विषय आणि त्याव्ची कविता " अशा या कविता नाहीत ..त्यामुळे जे जे दिसले , जे जे भावले , जे जे मनास स्पर्शून गेले ..असे सगळे काही ..कवीच्या कवितेत येऊन जाते ", या कविता म्हणजे कवीने आपल्या जवळच्या माणसांना केलेले एक भावनिक असे कळकळीचे आव्हाहन आहे.. मनापासूनच कवीचे सांगणे ..ज्यात भावूक उत्कटता आहे, जणू.. कवी म्हणतोय- बाबारे ..ऐक जरा .मला काय वाटतंय, समजून घे ..हे माझे वाटणे माझ्या साठीचे असले तरी ..त्यात तुझ्या विषयी वाटणारी माझी भावना तू समजून घे... माझ्या मते ..कवीचे हे वाटणे ..म्हणजेच या सर्व कविता आहेत..

कवितेविषयी कवी म्हणतोय की -
संग्रहातील पहिलीच कविता - अंतर्साद..
"शब्द उतरतात कागदावरती मोत्यांची जशी सर ओघळते  |
  रचनेस अर्थाचे सामर्थ्य देऊनि त्यात मनीची भावना विरघळते  ||... (पृ.११ ),

समोरच्याला दोष देणे "तसे तर सह्जेतेने जमणारी गोष्ट , पण त्या ऐवजी ,कवी मित्र सांगतो..हे बरे नव्हे ..
"फोडून खापर स्वतःच्या चुकांचे 
इतरांचा कशाला रोष घेतोस  ?
झटक धूळ चेहेर्यावरची स्वतःच्या 
आरशाला कशाला दोष देतोस ? ...(दोष ..पृ.४० ), 

एका हतबल परिस्थिती शरण बाबाची मनोवस्था ..जी एक समजावणी आहे .
.
"वाटतं आई व्हावे पण जमत नाही कामामध्ये  |
 पण थोडीशी आई असतेच रे प्रत्येक बाबामध्ये    ||
  वाटत असेन कोरडा  दाखवतही नसेन ओलावा कृतीमध्ये  |
  पण थोडीशी आई असतेच रे प्रय्तेक  बाबामध्ये   ||  ....(थोडीशी आई बाबामध्ये ...पृ.३८ ),

आपल्या माणसाचे सोबत असणे आयुष्याला अर्थपूर्ण बनवणारे असते .या अशा .भावना ,व्यक्त करणारी ही एक कविता ..
जपतेस कश्या कळेना , ऋणानुबांधाच्या या गाठी  |
सुखदु:खात सैदैव माझ्या, असतेस तूच पाठी   ||
सोसून कष्ट सारे, जपतेस सर्व नाती |
देण्या प्रकाश कागाला , जश्या जळतात शांत वाती  || ....( माझ्या साठी ..पृ.४९ ),
आजची बदलती परिस्थिती , ताण-तणाव ,दुरावत चाललेली माणसे ..कविमन व्यथित होणारच ..दोन मनातील अंतर ....परकेपणा नाहीये .यातच समाधान मानणारी  ही कविता....

" तू सुखी तुझ्या जगात 
  मी आनंदी माझ्या विश्वात 
   दुरावा दोघांमध्ये तरीही 
   अंतरे जवळची भासतात ... ( अंतरातील जवळीक ...पृ..७० ),
अशा भावनिक कविता सोबत  "प्रेम, विरह , तत्वज्ञान , निसर्ग  आणि निसर्ग घटक यांच्यातील माणसातील नाते .
विविध नातेस्वरूप ..अशा अनेक विषयावरील कविता संग्रहात आहेत ...
प्रसिध्द साहित्यिक -समीक्षक - डॉ.वसुधा वैद्य - नागपूर - यांची मौलिक अशी प्रस्तावना या संग्रहास लाभलेली आहे 
या छोटेखानी कविता संग्रह्तील कविता मोठ्या आशयपूर्ण आहेत .." असे वाचक नक्कीच म्हणेल.

हा कविता संग्रह  तरलरंग " प्रकाशनाचे जयंत भास्कर फाटक  यांनी प्रकाशित केला आहे. 
कवी.प्रा.राहुल राजोपाध्ये यांना लेखन शुभेच्छा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख - 
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------
कविता -संग्रह -अंतर्साद  
कवी- प्रा. राहुल  राजोपाध्ये 
पृ.७६ , मूल्य- रु.१२५ /-
संपर्क -  rdrajopadhye@gmail.com
------------------------------------------------------------
प्रकाशक - तरलरंग ,
जयंत भास्कर फाटक - पुणे.
संपर्क -    taralrang@gmail.com
--------------------------------------------------------------------

माझ्या नव्या पुस्तकाचा उमेश मोहिते यांनी करून दिलेला परिचय


पुस्तक परिचय ले- उमेश मोहिते ,माजलगाव जि.बीड.



*मनोरंजनातून शिकवण देणारी बालकविता : मस्त फिरू रे मस्त फिरु !** 


     .        जेष्ठ बालसाहित्यिक अरुण वि. देशपांडे यांचा ' मस्त फिरू रे मस्त फिरू ' हा आठवा बालकवितासंग्रह असून यात एकूण २५ बालकविता आहेत. या सर्व कविता मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असून मुलांच्या विचार विश्वातील विविध स्पंदनांना संवेदनशीलतेने आविष्कृत करतात  आणि त्यांच्या निरागस मनावर काहिएक संस्कारांची रुजवणदेखील करतात.आई , बाबा , पाऊस , शाळा, परी , झाडे , पक्षी , संगणक , पुस्तके , विविध खेळ इ.बाबी मुलांच्या भावविश्वातील अविभाज्य घटक असतात. मुले या सर्व घटकांवर जिवापाड माया करत असतात. अगदी हेच ध्यानात घेऊन कवी अरुण देशपांडे यांनी साधी -सोपी शब्दकळा योजून ही गुणगुणावीशी वाटेल अशी छंदोबध्द कविता लिहली आहे.
      आज वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे म्हणून मुलांच्या कोवळ्या मनावर पुस्तक वाचनाचे महत्त्व बिंबवण्यासाठी कवी अरुण देशपांडे ' पुस्तके ' या कवितेमधून वाचन महिमा सांगून मुलांच्या जडण=घडणीतील पुस्तकांचे स्थानही विशद करतात आणि वाचन संस्कृतीलाही हातभार लावतात. ते लिहीतात :
         छान गोष्टी छान चित्र
         पुस्तके असतात मित्र
         वाचनाची लागो गोडी
         खूप असो वा थोडी
         वाचन सुरु केले की
         थांबत नसते गाडी !
         खूप सारे ज्ञान देती
         ग्रंथ असती गुरुजन
         वाचन करावे तुम्ही
         होऊन ग्रंथात मग्न
परी ही मुलांच्या भावविश्वातील एक सुंदर आणि मनोहारी कल्पना ! मुले परीच्या काल्पनिक विश्वात रममाण होत असतात, याची सार्थ जाण कवीला आहे.परी स्वप्नात येऊन मोलाचा संदेश देतेय,अशी कल्पना करुन कवीने जलसंवर्धन व वृक्षारोपणाची गरज सांगितली आहे. कवी म्हणतो : 
        रुक्ष झाला परिसर
        गेली सारी हिरवाई
        झाडे लावण्याची रे
        करा सारेजण घाई
तर ' निसर्ग मित्र ' या कवितेमधेही कवी निसर्ग संवर्धनाची निकड व्यक्त करतो . कवी म्हणतो :
          माणूस म्हणून आपलेही
          काही कर्तव्य हो आहे 
          पर्यावरण रक्षण करुनी
          होऊ सारे निसर्ग मित्र !
याशिवाय मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडण -घडणीसाठी चार उपयुक्त गोष्टीही कवीने सांगितल्या आहेत. आजच्या संगणकाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल असतो. त्यांचा सुट्टीचा काळ खेळण्या- वाचण्यात गेला पाहिजे, या प्रांजळ हेतूने ' सुट्टीच्या दिवसात ' या कवितेत कवी म्हणतो :
          आमराईत जाऊन
          पडावे सावलीला
          छान एक पुस्तक
          असावे सोबतीला
मुलांनी एकटे राहू नये. मित्रांसोबत हसले,खेळले आणि बागडले पाहिजे, असा संदेश देताना कवी म्हणतो : 
         एकटे एकटे
         राहू नये कधी
         राहूनी सर्वात
         मित्र जमवावे आधी
         दोस्त असे आपला
         एक मस्त सोबती
         मदत करेल जो
         खरी त्याची दोस्ती !
या कवितेतून कवीने खऱ्या मित्राचीही ओळख मुलांना सहजतेने करुन दिली आहे. मुलांनी निसर्गात रमले पाहिजे. रानोवनी भटकले पाहिजे. चार भिंतीआड न राहता बाहेरच्या मुक्त जगाचा अनुभव घेतला पाहिजे, असे सांगताना ' मस्त फिरु रे मस्त फिरु ' या कवितेत कवी लिहीतो :
         मस्त फिरु रे मस्त फिरु
         खेळ खेळू नि मस्ती करु
         झोका खेळू , गरगर फिरु 
         गमती - जमती खूप करु 
         चार भिंतीच्या घरामध्ये
         केांडू नये कधी मनपाखरू
         विशाल गगनात त्याला
         द्यावे मुक्तपणे रे फिरु
याशिवाय मुलांच्या निरागस व आनंददायी विश्वाची चुणूक दर्शवणाऱ्याही काही कविता या संग्रहात आहेत.बालमनाला मित्राची खास ओढ असते. मित्र म्हणजे त्याच्यासाठी सारे काही असते. हे नोंदवताना कवी म्हणतो :
        खूप आवडती मला
        माझे सगळे दोस्त
        शाळेतले , वर्गातले
        आजुबाजूचे दोस्त !
पाऊस हा मुलांच्या विशेष जिव्हाळयाचा विषय ! त्यांना पावसात मनसोक्त भिजायला आवडते. हेच कवी कवितेत शब्दबद्ध करताना म्हणतो :
          पाऊस पडे जेंव्हा
          आनंद खूप होतो
          चिंब चिंब भिजून
          मनमोर नाचतो !
सध्या संगणकदेखील मुलांचा मित्र झालेला आहे, याचीही कवी बालसुलभ वृत्तीने नोंद घेताना दिसतो.कवी म्हणतो : 
          कॉम्प्यूटरशी दोस्ती झाली
          छानच मिळाला हा दोस्त
          नवे ज्ञान नि नवी माहीती
          देत असतो हा माझा दोस्त
याशिवाय ' पावसाची जादू ', ' दिवाळी , ' माझे आबा ', ' माळी दादा ' या कवितांदेखील मुलांच्या तरल भावनांचा सहजसुंदर आविष्कार आहेत.
           एकूणात ' मस्त फिरु रे मस्त फिरू ' मधील कवी अरूण देशपांडे यांची ही बालविता म्हणजे मुलांच्या भावविश्वाचा समरसून घेतलेला वेध आहे. संस्कारक्षम बोध देऊन मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडण - घडण करणे,हे बालसाहित्य लेखनाचे प्रयोजन असते. टोकदार संवेदनशीलता, बालमानसशास्त्राचा अभ्यास , सुक्ष्म निरीक्षणशक्ती आणि प्रतिभेची साथ असल्यावरच मुलांच्या अंतर्मनातील स्पंदनांचा समर्थ वेध घेतला जाऊ शकतो. कवी अरुण देशपांडे हे करण्यात  यशस्वी झाले आहेत. हेच त्यांचे यश आहे....


 *मस्त फिरु रे मस्त फिरू*  : *बालकविता* 
कवी                       :  अरुण वि.देशपांडे
प्रकाशन                   :  नंदिनी प्रकाशन, पुणे .
पृष्ठे                         :   ३२
मूल्य                       :   ४० रु .




परीक्षण
उमेश मोहिते ,
माजलगाव जि. बीड
भ्र. क्र. ९४०५०७२१५४
🌷🙏🏻🌷