Saturday, April 21, 2018

पुस्तक परिचय - अरुण वि.देशपांडे -पुण- सुरेख निसर्ग -गौरव गीत " हिरवं हिरवं जंगल -

पुस्तक परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------

 सुरेख निसर्ग -गौरव गीत "
हिरवं हिरवं जंगल -
----------------------------------------
लेखिका -कवयित्री लीला शिंदे  -  बालसाहित्यात सातत्याने लेखन करणाऱ्या साहित्यकार म्हणून परिचित आहेत,
"हिरवं हिरवं जंगल " हा त्यांचा बालकुमार कवितांचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. महत्वाच्या सामाजिक समस्येला अनुसरून त्याबद्दल लिहिणे "कवीचे एक महत्वाचे लक्षण असते ..कवयित्री लीला शिंदे यांच्या प्रस्तुत संग्रहातील कविता या  निसर्ग , सृष्टी , जंगल , या विषयवर आहेत , या सर्वांशी माणूस म्हणून आपला संबंध येतो  तो कसा आहे ? याचे उत्तर  देणारी त्यांची कविता एक महत्वाचा संदेश देणारी आहे.
संग्रहाच्या मलपृष्ठावर असलेल्या कविता ओळी - म्हणजे या कविता लेखनाचे प्रयोजन आहे ..कवयित्री म्हणते आहे की -
जंगलाचा ऱ्हास होतोय.
नासधूस होतीय .
त्याला राखणं , जपणं 
हे आपलं काम आहे .
तो भावी पिढीचा ठेवा आहे.
तो त्यांच्या मनात या 
कवितामधून 
रुजला जाईल
अशी आशा वाटते .

कवीचा आशावादी दृष्टीकोन हाच मोठा संस्कार करणारा आहे असे म्हणावेसे वाटते , त्यामुळे कवी जे सांगतोय ते या वाचकांच्या मना पर्यंत थेट पोचते .
जंगला बद्दल  कवितेतून सांगणे हे कवीला सहज जमले आहे ..
" चला चला रे जंगलात जाऊ 
गमती जमती डोळाभर पाहू 
खाली वरती चोहीकडे 
जंगलात सदा नाट्य घडे ...( जंगल सफारी .. पृ.१५ ),
अशा या जंगलाची सफर सुंदर आहे , रम्य आणि थरारक आहे , हे जंगल ज्या निसर्ग -सृष्टीचा भाग आहे , ती सुर्ष्टी कशी आहे ..बघा या कवितेत ...

" धरती वरती नद्या वाहती 
हिरवी शेते अवखळ वारा सोबती 
इंद्रधनूची वरात 
अवतरली धरती वरती ...(किती सुंदर सृष्टी ...पृ..१९ ),

अशा या हिरव्या जंगलात सृष्टीचे सुंदर रूप आपल्या नजरेस पडत असते .हिरवे डोंगर , नदी ,तलाव ,
 आणि तळे  या ठिकाणी  "एक सोहळा "पहावयास मिळतो ..त्याची एक सुंदर कविता आहे..
या तळयात .काळे-पांढरे सुंदर बगळे , सुळसुळ पळणाऱ्या मासोळ्या , पाणकोंबडे, पांढरेशुभ्र करकोचे " असे पाण-पक्षी आहेत ..एकाचवेळी हे सगळे पहाणे किती छान असेल ? त्या साठी जंगलात गेलेच पाहिजे.

निसर्ग आणि त्याचे सौंदर्य अचूक शब्दात व्यक्त करणारी कविता " ,  कवयित्री लीला शिंदे यांच्या लेखनाचा एक सुंदर अविष्कार या कवितांच्या निमित्ताने झाला आहे.
माणूस म्हणून तुम्ही आम्ही नेमके कसे आहोत ..निसर्ग संपत्ती आणि जंगल वैभव .याच्याशी आपले नाते आहे ते कसे स्वार्थी आणि विध्वंसक झाले  आहे यावर बोलणारी "हव्यास " ही कविता पहा..

"माणसाचा खोटा हव्यास 
जंगलाचा  केला नास 
पोटी आटले  चैतन्य 
झाला हिरवाईचा ऱ्हास... 
हे सगळे यावरच नाही थांबले ..त्याचा परिणाम ..कसा झाला त्यावर नेमके भाष्य .कवयित्री करते ..
" हिरवा झाड झाडोरा 
फळा फुलांनी लागडला
जंगलाचा तो तोरा 
किती ओसाड उजाडला ...(   "हव्यास ", पृ..५ ) 
असे वास्तव चित्रण या कवितेतून येते, आणि हे वाचून मन अस्वस्थ होऊन जाते ..

या शिवाय ..या संग्रहात ..जंगल ", नदीमाउली ", उत्तुंग उंच डोंगर हिरवे  ", " किमया ", डोंगरबाबा ", " पानगळ ", खारूताई "  अशा कविता आहेत  या सर्व कविता  " हिरवं हिरवं जंगल " संग्रहातून एका अर्थाने निसर्ग संस्कार करतात.
माणसाने निसर्ग -हनी केली आहे , जंगल नष्ट केले आहे " मग याची भरपाई तर माणसाने केलीच पाहिजे ..या भावनेतून कवयित्री म्हणते ..
एक नवं झाड लावू या 
परोपकराच बी रुजवू या ... ( पृ.२४ )
या संस्कार -विचारास आपण प्रत्यक्ष्य कृतीत  आणू शकलो तर  "जंगल " या भावी पिढ्यांच्या ठेव्याचे रक्षण केल्याचे समाधान आपण नक्कीच मिळवू शकतो " कवयित्रीच्या या आशावादी हेतूस यश मिळावे अशी प्राथना करू या.
"हिरवं हिरवं जंगल "  या कविता संग्रहाचे यथार्थ मुखपृष्ठ ,आतील रेखाचित्रे ..व सजावट, चित्रकार -प्रकाशक ल.म.कडू सर यांची आहे ", या उल्लेखाने सुद्धा हे पुस्तक प्रत्यक्षात किती सुरेख असेल याचा अंदाज येतो.

खूप छान कविता ,आणि तितकाच सुरेख कविता संग्रह ..हिरवं हिरवं जंगल " बद्दल कवयित्री लीला शिंदे , प्रकाशक - ल.म.कडू  आणि गमभन प्रकाशन यांचे अभिनंदन.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------
कवयित्री लीला शिंदे 
संपर्क -९४२१६८८५७६ 
हिरवं हिरवं जंगल 
कविता संग्रह 
पृ.- २४ , मुल्य रु.३० /-
ल.म.कडू 
गमभन प्रकाशन -पुणे.
०२०- २४४५८१४१ 
-----------------------------------------------------

पुस्तक-परिचय - अरुण वि.देशपांडे -पुणे. - संस्कार -कथा श्यामच्या छान छान गोष्टी " ले- नागेश सू. शेवाळकर

पुस्तक-परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------
संस्कार -कथा 
श्यामच्या छान छान गोष्टी " 
ले- नागेश सू. शेवाळकर 
---------------------------------------------------

प्रकाशक दत्ता डांगे आणि इसाप प्रकाशन यांनी प्रसिद्ध लेखक श्री.नागेश सू.शेवाळकर यांचे कडून मुलांसाठी संस्कार-गोष्टी लिहून घेऊन मुलांची सुट्टी वाचनीय केली आहे ",
साने गुरुजी , श्याम आणि श्यामची आई " ,ही नावे मराठी माणसाच्या मनात आदरणीय ठरलेली व्यक्तिमत्वे आहेत.
श्यामची आई आणि श्याम " दोघांबद्दल किती ही वाचायला प्रत्येक पिढीतील वाचक आतुर असतो.

लेखक नागेश सू.शेवाळकर यांनी अतिशय आत्मीयतेने छोटय-छोट्या  पाच-सहा छान गोष्टीचे लेखन  बालमित्रांसाठी 
केले आहे .
"प्राणीमात्रावर दया ",  कळीचे फुल " , संस्कार श्रमाचे , " आधी केले मग सांगितले ", "वाचन आणि कृती ", "लाजीरवाणा ", अशा या सहा निवडक गोष्टीतून 
 " मोलाचे संदेश ,आणि संस्कार -धन मुलांना मिळाले पाहिजे हा उदात्त लेखन हेतू " सहजतेने साध्य होतो कारण मुळातच सानेगुरुजींचे साहित्य मातृ-प्रेमाचे महामंगल स्तोत्र आहे " असे आपण म्हणतो .

श्यामच्या छान छान गोष्टी " हे सोळा पानांचे चिमुकले पुस्तक ..आकाराने मोठे आहे , यातील मजकूर मोठ्या -ठळक अक्षरात आहे ..या पुस्तकातील सगळीच्या सगळी पाने रंगीत आणि  यातील चित्र सुद्धा मोठी आहेत ..ही सर्व सजावट पुस्तकाला आणि गोष्टींना आकर्षक बनवते 
या गोष्टीच्या पुस्तकाचे छान मुखपृष्ठ / सजावट  भास्कर शिंदे आणि विजय चित्तरवाड या चित्रकार कलावंत यांनी केले आहे.
" महाराष्ट्र राज्य शासनाच्या "सर्व शिक्षा अभियान " २०१७-२०१८  "शिक्षणाचा अधिकार " या उपक्रमाअंतर्गत हे पुस्तक निवडले गेले आणि इसाप प्रकाशनास हे पुस्तक प्रकाशित करण्याचा योग आला   श्यामच्या छान छान गोष्टी "या पुस्तकाच्या ऐंशी हजार प्रती" (८००००) निघाल्या आहेत .प्रकाशाक आणि लेखक दोघांसाठी ही मोठी गौरवाची गोष्ट आहे.
लेखक नागेश सू.शेवाळकर आणि इसाप प्रकाशन व प्रकाशक दत्ता डांगे यांचे या गौरवास्पद उपलब्धीबद्दल अभिनंदन करू या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
------------------------------------------
श्यामच्या छान छान गोष्टी 
लेखक -नागेश सू.शेवाळकर 
संपर्क -९८३४५४८१६६
पृ- १६ , मूल्य- रु. २८ 
प्रकाशक -
दत्ता डांगे - इसाप प्रकाशन 
सहयोग नगर -नांदेड.
९८९००९९५४१ 
---------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख- -अरुण वि.देशपांडे - चित्रमय कविता - "गमती -जमती ", बालकविता संग्रह लीला शिंदे. --

पुस्तक-परिचय लेख- 
-अरुण वि.देशपांडे 
----------------------------------------
चित्रमय कविता -
"गमती -जमती ", 
बालकविता संग्रह 
लीला शिंदे.
----------------------------------
बालसाहित्यातील महत्वाची नावं घेतांना त्यात लेखिका -कवयित्री - लीला शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने येत असते ,
गमती जमती " या   त्यांच्या नव्या कविता संग्रहाचा परिचय करून देतांना  त्यांच्या प्रकाशित साहित्याबद्दल नव्याने काय सांगावे..,?
 लेखिका - कवयित्री -लीला शिंदे आणि त्यांचे बाल-साहित्य  सर्वपरिचित आहे., तरी पण ..त्यांच्या काही पुरस्कार प्राप्त साहित्याचा उल्लेख जरूर केले पाहिजे ..तो असा -
१.चार गोष्टी आवडीच्या - राज्य पुरस्कार , २.पंख येती पक्षाला - राज्य पुरस्कार , ३- या मुलांनो या " - बा.कु.सा .पुरस्कार , ४- अभ्यास झाला सोपा- प्रदूषण मंडल आणि इको फोक्स या संस्थांचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार .

वरील उल्लेख यासाठी केलेत की ..लीला शिंदे यांचे  बालसाहित्य लेखन हे विविध स्वरूपाचे असून  ते सातत्याने पुस्तक रूपाने येत असते 
प्रस्तुतचा  " गमती जमती " हा कविता संग्रह तसा छोटासाच आहे..पण या संग्रहाची साईझ .नेहमी पेक्षा मोठी आहे.,
"रंगीत पानावरती , मोठ्ठी रंगीत चित्र ..आणि त्या सोबत छानशी कविता ..ज्या अर्थातच  गमती-जमतीच्या आहेत.

.पहिलीच कविता - लबाड कोल्होबा .. ( पृ.४ ),
या कवितीत वाघोबादादा सोबत लबाडी करणाऱ्या कोल्होबाची लबाडी कशी उघडी पडते याची गोष्ट खूप छान सांगितली आहे.

.कविता दुसरी - नाजूक नि सुंदर अशा  "फुलपाखरू " ची.

"फुलपाखरा रे फुलपाखरा 
पंख चिमुकले मऊ मुलायम 
रंगीबेरंगी नक्षी नयनरम्य 
वाऱ्यांसंगे भिरभिरती 
अलगद नाजूक फुलावरती 
कित्ती रे तुझी फुलांवर प्रीती .....(पृ.५ ),

कवितेतील ओळी आणि त्याला असलेले अनुरूप असे चित्र ..यामुळे कविता कशी छान चित्रमय होते .याचे उत्तम उदाहरण म्हणजे  हा " गमती जमती "हा कविता संग्रह आहे.. ,

माकडोबा - या छोट्या कवितेत माक्डोबाची उडालेली घाबरगुंडी वाचून बाल मित्र खुदकन हसतील ..
घाबरला साप पळाला 
सळ.. सळ..सळ..
माकडोबा हसले 
खळ.. खळ..खळ... ( पृ..१२ ),

हळू वारा , जोराचा वारा , सुसाट वारा ..हे आपण नेहमीच पहातो .. पण, "वारा " कवितेत " वारा भेटला कि तो चान कविताच होतो...ही कमाल कवयित्री लीला शिंदे यांची आहे..
आला वारा वारा आला
भुर्र भुर्र...भुर्र ..
आता इथं , गेला कुठं 
दूर .. दूर .. दूर ...   (पृ.१८ ),

चित्रविचित्र - या कवितेत असे प्राणी भेटतात ..ही एक निराळीच गम्मत वाटेल.. कारण..यात 
बिनसोंडेचा हत्ती , हरणाचं तोंड असलेला पट्टेरी वाघ , आणि खट्याळ माक्डोबाला चक्क हत्तीचे पाय आहेत..
सगळीच कविता म्हणजे एक धमाल आहे ..जरूर वाचा..( पृ.२१ ),

तुमच्या-आमच्या ,सर्वांच्या आवडीच्या " पावसावर " एक मस्त कविता ..
या पावसला सारी मुले काय म्हणत आहेत बघा तरी ...
"पावसा पावसा रोज ये 
 मोठ्ठं तळ साचू दे
चिक चिक चिखल होऊ दे 
मस्त मनसोक्त खेळू दे ....(पृ.२४ ),
असा पाउस दोस्त म्हणून खूपच आवडेल ,नाही का ?

अशा गमती-जमतीच्या अजून छान छान कविता आणि सोबतची सुरेख बहारदार रंगीत चित्र यात आहेत..
काही कविता शीर्षक तर पाहा ..
" चांदोबा  (पृ.६ ), " साखरझोप "- (८) , कोण बरे रंगवितो ..(पृ..१३ ),  "सुंदरमेळ- (१५ ), 
"खूप खूप मज्जा ..(२२ ) , डोंगर ..( २८) ,  चित्रखेळ, आणि इतरही कविता या संग्रहात आहेत.

गमती जमती - कविता संग्रह आकर्षक आणि देखणा आहे, बालमित्र हा संग्रह पाहताक्षणी तो हातात घेतील हे नक्की .
लेखिका -कवयित्री  लीला शिंदे यांच्या लेखनाचा हा एक सुंदर असा अविष्कार आहे असे म्हणू या.
त्यांना लेखन शुभेच्छा.

चित्रकार -पुंडलिक वझे ..यांनी कविता आणि रंगीत चित्र खूपच सुंदर केली आहेत.त्यांचे अभिनंदन 
.
प्रकाशक -माधुरी रमेश राऊत यांनी साक्षात प्रकाशना कडून बालमित्रांना एक सुरेख कविता संग्रह भेट दिला आहे ,त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------
गमती जमती 
बाल कविता संग्रह 
लीला शिंदे 
पृ.३१ , किंमत -रु..१०० /-
संपर्क - ९४२१६८८५७६ 
-----------------------------------------------------------------
प्रकाशक - माधुरी रमेश राऊत,
साक्षात प्रकाशन - गारखेडा ,औरंगाबाद 
संपर्क - ९४२१३१७२१० 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख - अरुण वि.देशपांडे -पुणे. सुंदर आणि वेधक भावकविता - अंतर्साद - कविता संग्रह.

पुस्तक-परिचय लेख - 
अरुण वि.देशपांडे -पुणे.
----------------------------------------------------

सुंदर आणि वेधक भावकविता -
अंतर्साद  - कविता संग्रह.
-----------------------------------
कोणत्याही कवीचा पहिला कविता संग्रह प्रकाशित होतो , त्यानंतर अनेक दिवस या कवीची भाव-अवस्था ही अतीव अधिरतेची होऊन जाते , आपल्या कविता संग्रहाचे स्वागत रसिक आणि वाचक कसे करतील याची उत्सुकता ताणलेली असते . कवी प्रा.राहुल राजोपाध्ये यांच्या मनाची उत्सुकत मला जाणवते आहे.

त्यांचा  पहिलाच कविता संग्रह  "  अंतर्साद   " नुकताच वाचून झाला , या कवितेचा परिचय वाचकांना करून द्यावा  असे  वाटले ..म्हणून हा परिचय लेख.
प्रा.राहुल राजोपाध्ये हे देवरुख येथील " राजेंद्र माने -अभियांत्रिकी महाविद्यालयात  ऑटोमोबाईल विभागाचे "विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  
कवितेबरोबरच ललित लेखन आणि लघुकथा लेखन ते करीत असतात .. साहित्य लेखन आणि अध्यापन " अशा दोन्ही क्षेत्रात राहुल राजोपाध्ये  या व्यक्तिमत्वाचा "  एक कवी , एक प्राध्यापक अशा दोन्ही रुपात सहज संचार चालू आहे , 
.
मनात उमटलेल्या तरंगांचे प्रातिनिधिक आरेखन  म्हणजेच कविता " ,अशी सोपी व्याख्या  कवीने आपल्या मनोगतात व्यक्त  केली आहे , भावनांचा शब्द-रूपातील अविष्कार ..म्हणजेच साहित्य , कवीच्या मनातील आंदोलने , वादळे , आवर्तने ..हे सारे काही व्यक्त होत असते ते त्याच्या कवितेतून.

मनात जे काही उमटते ..ते कागदावर उतरवतांना जसेच्या तसे उतरवणे ", मग ही कविता नियमांच्या चौकटीत बसणारी नाहीये " हे कवी अगदी मोकळेपणाने सांगतो आहे ..या कवीचे हे असे सांगणे ..हा त्याचा आणि त्याच्या कवितेचा " प्रांजल -स्वभाव "आहे असे मला वाटते. 
एका अर्थाने "मुक्तछंद " कविता लेखन या संग्रहात आहे असे ही नाही .कारण -
कविता लयबद्ध असली पाहिजे,कविता ही "गेय -कविता असली पाहिजे " असे कविता संस्कार करणारी कवितेची जाणकार मंडळी कवीच्या सहवासात आहे , किंबहुना त्यांच्या नजरेखालून या कविता संग्रहात आलेल्या आहेत.,
यामुळे एक मात्र नक्की झाले .. कवी राहुल राजोपाध्ये यांच्या कविता ..कवितेच्या परिचित चौकटीच्या बाहेरच्या आहेत " असे जाणवत नाही.

अंतर्साद " संग्रहात एकूण ६६ कवितांचा समावेश आहे . एकेच एक विषय आणि त्याव्ची कविता " अशा या कविता नाहीत ..त्यामुळे जे जे दिसले , जे जे भावले , जे जे मनास स्पर्शून गेले ..असे सगळे काही ..कवीच्या कवितेत येऊन जाते ", या कविता म्हणजे कवीने आपल्या जवळच्या माणसांना केलेले एक भावनिक असे कळकळीचे आव्हाहन आहे.. मनापासूनच कवीचे सांगणे ..ज्यात भावूक उत्कटता आहे, जणू.. कवी म्हणतोय- बाबारे ..ऐक जरा .मला काय वाटतंय, समजून घे ..हे माझे वाटणे माझ्या साठीचे असले तरी ..त्यात तुझ्या विषयी वाटणारी माझी भावना तू समजून घे... माझ्या मते ..कवीचे हे वाटणे ..म्हणजेच या सर्व कविता आहेत..

कवितेविषयी कवी म्हणतोय की -
संग्रहातील पहिलीच कविता - अंतर्साद..
"शब्द उतरतात कागदावरती मोत्यांची जशी सर ओघळते  |
  रचनेस अर्थाचे सामर्थ्य देऊनि त्यात मनीची भावना विरघळते  ||... (पृ.११ ),

समोरच्याला दोष देणे "तसे तर सह्जेतेने जमणारी गोष्ट , पण त्या ऐवजी ,कवी मित्र सांगतो..हे बरे नव्हे ..
"फोडून खापर स्वतःच्या चुकांचे 
इतरांचा कशाला रोष घेतोस  ?
झटक धूळ चेहेर्यावरची स्वतःच्या 
आरशाला कशाला दोष देतोस ? ...(दोष ..पृ.४० ), 

एका हतबल परिस्थिती शरण बाबाची मनोवस्था ..जी एक समजावणी आहे .
.
"वाटतं आई व्हावे पण जमत नाही कामामध्ये  |
 पण थोडीशी आई असतेच रे प्रत्येक बाबामध्ये    ||
  वाटत असेन कोरडा  दाखवतही नसेन ओलावा कृतीमध्ये  |
  पण थोडीशी आई असतेच रे प्रय्तेक  बाबामध्ये   ||  ....(थोडीशी आई बाबामध्ये ...पृ.३८ ),

आपल्या माणसाचे सोबत असणे आयुष्याला अर्थपूर्ण बनवणारे असते .या अशा .भावना ,व्यक्त करणारी ही एक कविता ..
जपतेस कश्या कळेना , ऋणानुबांधाच्या या गाठी  |
सुखदु:खात सैदैव माझ्या, असतेस तूच पाठी   ||
सोसून कष्ट सारे, जपतेस सर्व नाती |
देण्या प्रकाश कागाला , जश्या जळतात शांत वाती  || ....( माझ्या साठी ..पृ.४९ ),
आजची बदलती परिस्थिती , ताण-तणाव ,दुरावत चाललेली माणसे ..कविमन व्यथित होणारच ..दोन मनातील अंतर ....परकेपणा नाहीये .यातच समाधान मानणारी  ही कविता....

" तू सुखी तुझ्या जगात 
  मी आनंदी माझ्या विश्वात 
   दुरावा दोघांमध्ये तरीही 
   अंतरे जवळची भासतात ... ( अंतरातील जवळीक ...पृ..७० ),
अशा भावनिक कविता सोबत  "प्रेम, विरह , तत्वज्ञान , निसर्ग  आणि निसर्ग घटक यांच्यातील माणसातील नाते .
विविध नातेस्वरूप ..अशा अनेक विषयावरील कविता संग्रहात आहेत ...
प्रसिध्द साहित्यिक -समीक्षक - डॉ.वसुधा वैद्य - नागपूर - यांची मौलिक अशी प्रस्तावना या संग्रहास लाभलेली आहे 
या छोटेखानी कविता संग्रह्तील कविता मोठ्या आशयपूर्ण आहेत .." असे वाचक नक्कीच म्हणेल.

हा कविता संग्रह  तरलरंग " प्रकाशनाचे जयंत भास्कर फाटक  यांनी प्रकाशित केला आहे. 
कवी.प्रा.राहुल राजोपाध्ये यांना लेखन शुभेच्छा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख - 
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------
कविता -संग्रह -अंतर्साद  
कवी- प्रा. राहुल  राजोपाध्ये 
पृ.७६ , मूल्य- रु.१२५ /-
संपर्क -  rdrajopadhye@gmail.com
------------------------------------------------------------
प्रकाशक - तरलरंग ,
जयंत भास्कर फाटक - पुणे.
संपर्क -    taralrang@gmail.com
--------------------------------------------------------------------

माझ्या नव्या पुस्तकाचा उमेश मोहिते यांनी करून दिलेला परिचय


पुस्तक परिचय ले- उमेश मोहिते ,माजलगाव जि.बीड.



*मनोरंजनातून शिकवण देणारी बालकविता : मस्त फिरू रे मस्त फिरु !** 


     .        जेष्ठ बालसाहित्यिक अरुण वि. देशपांडे यांचा ' मस्त फिरू रे मस्त फिरू ' हा आठवा बालकवितासंग्रह असून यात एकूण २५ बालकविता आहेत. या सर्व कविता मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असून मुलांच्या विचार विश्वातील विविध स्पंदनांना संवेदनशीलतेने आविष्कृत करतात  आणि त्यांच्या निरागस मनावर काहिएक संस्कारांची रुजवणदेखील करतात.आई , बाबा , पाऊस , शाळा, परी , झाडे , पक्षी , संगणक , पुस्तके , विविध खेळ इ.बाबी मुलांच्या भावविश्वातील अविभाज्य घटक असतात. मुले या सर्व घटकांवर जिवापाड माया करत असतात. अगदी हेच ध्यानात घेऊन कवी अरुण देशपांडे यांनी साधी -सोपी शब्दकळा योजून ही गुणगुणावीशी वाटेल अशी छंदोबध्द कविता लिहली आहे.
      आज वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे म्हणून मुलांच्या कोवळ्या मनावर पुस्तक वाचनाचे महत्त्व बिंबवण्यासाठी कवी अरुण देशपांडे ' पुस्तके ' या कवितेमधून वाचन महिमा सांगून मुलांच्या जडण=घडणीतील पुस्तकांचे स्थानही विशद करतात आणि वाचन संस्कृतीलाही हातभार लावतात. ते लिहीतात :
         छान गोष्टी छान चित्र
         पुस्तके असतात मित्र
         वाचनाची लागो गोडी
         खूप असो वा थोडी
         वाचन सुरु केले की
         थांबत नसते गाडी !
         खूप सारे ज्ञान देती
         ग्रंथ असती गुरुजन
         वाचन करावे तुम्ही
         होऊन ग्रंथात मग्न
परी ही मुलांच्या भावविश्वातील एक सुंदर आणि मनोहारी कल्पना ! मुले परीच्या काल्पनिक विश्वात रममाण होत असतात, याची सार्थ जाण कवीला आहे.परी स्वप्नात येऊन मोलाचा संदेश देतेय,अशी कल्पना करुन कवीने जलसंवर्धन व वृक्षारोपणाची गरज सांगितली आहे. कवी म्हणतो : 
        रुक्ष झाला परिसर
        गेली सारी हिरवाई
        झाडे लावण्याची रे
        करा सारेजण घाई
तर ' निसर्ग मित्र ' या कवितेमधेही कवी निसर्ग संवर्धनाची निकड व्यक्त करतो . कवी म्हणतो :
          माणूस म्हणून आपलेही
          काही कर्तव्य हो आहे 
          पर्यावरण रक्षण करुनी
          होऊ सारे निसर्ग मित्र !
याशिवाय मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडण -घडणीसाठी चार उपयुक्त गोष्टीही कवीने सांगितल्या आहेत. आजच्या संगणकाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल असतो. त्यांचा सुट्टीचा काळ खेळण्या- वाचण्यात गेला पाहिजे, या प्रांजळ हेतूने ' सुट्टीच्या दिवसात ' या कवितेत कवी म्हणतो :
          आमराईत जाऊन
          पडावे सावलीला
          छान एक पुस्तक
          असावे सोबतीला
मुलांनी एकटे राहू नये. मित्रांसोबत हसले,खेळले आणि बागडले पाहिजे, असा संदेश देताना कवी म्हणतो : 
         एकटे एकटे
         राहू नये कधी
         राहूनी सर्वात
         मित्र जमवावे आधी
         दोस्त असे आपला
         एक मस्त सोबती
         मदत करेल जो
         खरी त्याची दोस्ती !
या कवितेतून कवीने खऱ्या मित्राचीही ओळख मुलांना सहजतेने करुन दिली आहे. मुलांनी निसर्गात रमले पाहिजे. रानोवनी भटकले पाहिजे. चार भिंतीआड न राहता बाहेरच्या मुक्त जगाचा अनुभव घेतला पाहिजे, असे सांगताना ' मस्त फिरु रे मस्त फिरु ' या कवितेत कवी लिहीतो :
         मस्त फिरु रे मस्त फिरु
         खेळ खेळू नि मस्ती करु
         झोका खेळू , गरगर फिरु 
         गमती - जमती खूप करु 
         चार भिंतीच्या घरामध्ये
         केांडू नये कधी मनपाखरू
         विशाल गगनात त्याला
         द्यावे मुक्तपणे रे फिरु
याशिवाय मुलांच्या निरागस व आनंददायी विश्वाची चुणूक दर्शवणाऱ्याही काही कविता या संग्रहात आहेत.बालमनाला मित्राची खास ओढ असते. मित्र म्हणजे त्याच्यासाठी सारे काही असते. हे नोंदवताना कवी म्हणतो :
        खूप आवडती मला
        माझे सगळे दोस्त
        शाळेतले , वर्गातले
        आजुबाजूचे दोस्त !
पाऊस हा मुलांच्या विशेष जिव्हाळयाचा विषय ! त्यांना पावसात मनसोक्त भिजायला आवडते. हेच कवी कवितेत शब्दबद्ध करताना म्हणतो :
          पाऊस पडे जेंव्हा
          आनंद खूप होतो
          चिंब चिंब भिजून
          मनमोर नाचतो !
सध्या संगणकदेखील मुलांचा मित्र झालेला आहे, याचीही कवी बालसुलभ वृत्तीने नोंद घेताना दिसतो.कवी म्हणतो : 
          कॉम्प्यूटरशी दोस्ती झाली
          छानच मिळाला हा दोस्त
          नवे ज्ञान नि नवी माहीती
          देत असतो हा माझा दोस्त
याशिवाय ' पावसाची जादू ', ' दिवाळी , ' माझे आबा ', ' माळी दादा ' या कवितांदेखील मुलांच्या तरल भावनांचा सहजसुंदर आविष्कार आहेत.
           एकूणात ' मस्त फिरु रे मस्त फिरू ' मधील कवी अरूण देशपांडे यांची ही बालविता म्हणजे मुलांच्या भावविश्वाचा समरसून घेतलेला वेध आहे. संस्कारक्षम बोध देऊन मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडण - घडण करणे,हे बालसाहित्य लेखनाचे प्रयोजन असते. टोकदार संवेदनशीलता, बालमानसशास्त्राचा अभ्यास , सुक्ष्म निरीक्षणशक्ती आणि प्रतिभेची साथ असल्यावरच मुलांच्या अंतर्मनातील स्पंदनांचा समर्थ वेध घेतला जाऊ शकतो. कवी अरुण देशपांडे हे करण्यात  यशस्वी झाले आहेत. हेच त्यांचे यश आहे....


 *मस्त फिरु रे मस्त फिरू*  : *बालकविता* 
कवी                       :  अरुण वि.देशपांडे
प्रकाशन                   :  नंदिनी प्रकाशन, पुणे .
पृष्ठे                         :   ३२
मूल्य                       :   ४० रु .




परीक्षण
उमेश मोहिते ,
माजलगाव जि. बीड
भ्र. क्र. ९४०५०७२१५४
🌷🙏🏻🌷

पुस्तक-परिचय लेख- बालगीत संग्रह - रंगीत रंगीत रानफूल ",- कवी- बालाजी मदन इंगळे

पुस्तक-परिचय लेख- 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------
बालगीत संग्रह - 
रंगीत रंगीत रानफूल ",
- कवी- बालाजी मदन इंगळे 
--------------------------------------------------------------
मराठी कवितेतील सर्वपरिचित कवी-व्यक्तिमत्व -बालाजी मदन इंगळे यांचा पहिला बालगीत संग्रह "रंगीत रंगीत रानफूल " नुकताच प्रकाशित झाला आहे. मोठ्यांच्या कवितेतील एक मोठे नाव ",अशी ओळख ..कवी-बालाजी मदन इंगळे या काविमित्राची आहे यात आणखी एका नव्या आणि छान ओळखीची भर पडली आहे .ती म्हणजे या कवीच्या बालगीतांची समृध्द अशी भर बाल्कुमारांच्या साहित्यात पडली आहे.
आदरणीय विजया वाड आपल्या प्रस्तावनेत या बालगीतांच्या बद्दल लिहितात की ..
" बालाजी मुलांच्या जगात मस्त मुशाफिरी करणारे कवी आहेत. मुलांना निसर्ग आवडतो तसाच डोरेमोनही  !
मुलांची आई म्हणजे हळवा कोपरा तर खोड्या म्हणजे आवडती खेळी . कविराज ,आपले "रंगीत रंगीत रानफूल " मुलेच काय मोठेही वाचतील नि मग गाता गाता नाचतील "..

या संग्रहात असाच बालगीतांचा समावेश आहे..मुलांना आवडणार्या विषयावरील कविता असल्यामुळे बालमित्र या पुस्तकात सहजपणे रमून जातील हे नक्की.
४८ पानांच्या या संग्रहात एकूण ३४ कविता आहेत .गंमत गाण्यापासून ते संस्कारक्षम कविता हे संग्रहाचे विशेष आहे.
झाडे ,पाने,फुले आणि फळे ही आपल्याला लाभलेली निसर्ग देणगी .. खूप काही देणारे झाड काय सांगते बघा..

"आधी मुळा जमिनीत रोवा 
 मग वरती झाड पुलवा 
आधी पाया मग कळस वर जाय  ||
प्रत्येक झाड ऐका सांगते काय 
जीवनाचे मर्मच जणू या कवितेतून उलगडून दाखवले आहे. (पृ..४३ ),

आपल्या मनाची मोठी गम्मत असते..स्वप्ने पहाणे , काही बनावे वाटणे हे त्यातच आले .कधी हे तर कधी ते..
अशा या कवितेत ..कवी आपल्या बाल मित्रांना म्हणतोय .काही वाटू द्या .पण शेवटी..महत्वाचे आहे ते.हे की 
" शेवटी वाटले मला
   आधी अभ्यास करुया 
   मग जे व्हायचे आहे 
   ते आपण होऊ या  ", ( कधी वाटते मला ..पृ..३९ ),
आपण विदार्थी म्हणून आपले अभ्यास कर्तव्य पार पाडू या , मग बाकीचे ..हे गोष्ट एक शिक्षक असलेला कवीच इतक्या छान कवितेतून सांगू शकतो.

अभ्यास आणि परीक्षा ..हे वेळापत्रक नाही म्हटले तरी खूप थकवणारे ,मन  कंटाळून जाणारच की..अशावेळी सुट्टीचे येणे म्हणजे आनंदास उधाण येणे.. त्याची ही कविता ..
या कवितेत ..खेळ खेळू , वाचन करू " हा संस्कार संदेश कवी देतो आहे .
" कॅरम खेळू 
   क्रिकेट खेळू 
   नव्या नव्या 
   कविता वाचू 
  आता नाचू बूमबूम  बूम ....( बुमबूम बूम ..पृ..३३ ),

गावाकडे गेल्यावर शेत-शिवार खुणावते ..हे ओढ मनाला धावायला लावते .या शिवारात काय आहे नेमकं ..त्याचे हे सुंदर कविता रूप...

गच्च पीक भरात 
धुंद वास शिवारात ||

गाय हम्बरे यादीनं
धावे वासरू ओढीनं 
उड्या मारू रानात 
धुंद वास शिवारात   || ...( धुंद वास शिवारात ..पृ,२७ ),

"शेतकऱ्यांचे मित्र "या कवितेत  " बैल ,गाय , साप, गांडूळ, पाखरं " या मित्रांबद्दल खूप छान लिहितांना कवी म्हणतो..
"अशा मित्रांसोबत 
करी  हसत चाकरी 
कसून सारे रान 
जगा देई भाकरी . ...( पृ..१५ ),

आपल्या चालण्यासाठी कधी रस्ता असतो तर कधी असते पाऊलवाट..या पाऊलवाटेची खूप अर्थपूर्ण कविता ..
" पायाखालची 
  पाऊलवाट
 सर्वांना दाखवते 
 आपापली वाट ....(पृ..७  ),
या शिवाय मुलांना आवडतील अशा गम्मतशीर कविता या पुस्तकात आहेत..
" पोहे करू ", ( पृ.५ ) , एकावर एक ( पृ.१४ ), एव्हढा मोठा रेडा "..(पृ..२३ ),  " शनिवार एके शनिवार (पृ. २४ ),
"चिक्या आणि बब्या (पृ. २८ ), "चक्रम  "...(पृ.२९ ),
या शिवाय १० चित्र -कोडी असलेली  "ओळखा पाहू कोण ? ही कविता खूप आवडेल.
आपणा सर्वांना वंदनीय असणारे "छत्रपती शिवाजी " , आणि डॉ.भीमराव आंबेडकर " या दोन महापुरुषांच्या चरित्र कविता खूप बोधक आणि प्रेरक आहेत .
कवी-बालाजी मदन इंगळे यांच्या लेखन-प्रवासात प्रस्तुत बालगीत लेखनाचे मोठेच योगदान राहील.त्यांच्या लेखनास शुभेच्छा.
हा बालगीतसंग्रह सर्वांनाच आवडेल असा सुरेख स्वरूपात आहे .याचे श्रेय ..चित्रकार -प्रमोद दिवेकर यांच्या आकर्षक सजावटीला द्यावे लागेल.
प्रकाशक -दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशनाने  "रंगीत रंगीत रानफुले " बालगीत संग्रह प्रकाशित केला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख- 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------
कवी- बालाजी मदन इंगळे 
संपर्क -९८८१८२३८३३ 
---------------------------------------------------
बालगीत संग्रह - 
रंगीत रंगीत रानफूल ",
कवी- बालाजी मदन इंगळे 
पृ. ४८ , मूल्य- रु. ६० /-
प्रकाशक -
दत्ता डांगे -इसाप प्रकाशन नांदेड.
संपर्क - ९८९००९९५४१ 
--------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख- कविता संग्रह- माझे तुला नि:शब्द शब्द ,कवयित्री - पुष्पांजली कर्वे.

पुस्तक-परिचय लेख-  
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------
कविता संग्रह- माझे तुला नि:शब्द शब्द ,
कवयित्री - पुष्पांजली कर्वे.
-------------------------------------------------------------------------------------
शब्दातून व्यक्त होण्याचे माध्यम कविता ", आणि जेंव्हा कविता नि:शब्द करणारे शब्द घेऊन आपल्याला भेटते तेंव्हा शब्दांचे सामर्थ्य म्हणजे काय नि ते किती असते याची शब्दातीत प्रचीती येऊन जाते . कवयित्री पुष्पांजली कर्वे यांचा  " माझे तुला नि:शब्द शब्द " या शीर्षकाचा कविता संग्रह नुकताच वाचून झाला ,अनेक कविता मनात रेंगाळत राहिल्या आहेत.एक छान कवितानुभूती दिली या कवितांनी.

कवयित्रीचा हा पहिला कविता संग्रह आहे म्हणून काही तो एका नवोदित कवीचा संग्रह आहे असे मुळीच नाहीये , कारण पुष्पांजली कर्वे यांचे कविता लेखन रसिक वाचकांच्या अगोदर  पासूनच परिचयाचे आहे , लिहून झालेल्या कवितांचा  प्रकाशित झालेला "त्यांचा पहिला संग्रह आहे" असे म्हणू या.

या संग्रहासाठी "चार शब्द " लिहिले आहेत जेष्ठ कवयित्री  आसावरी काकडे , संग्रहाच्या ब्लर्ब वर या कवितेबद्दल लिहिलेले शब्द आहेत कविवर्य अशोक जी बागवे सरांचे .. या शिवाय मनोगतात ...
स्वताच्या कवितेबद्दल ..कवयित्री अगदी सविस्तरपणे  व्यक्त होते ..,ही तीनही मनोगत आवर्जून वाचावीत  अशीच आहेत ..कवी,कविता आणि कविता लेखन ..या बद्दल खूप समजून घेण्यासारखं वाचण्यास मिळतं .

इंटरनेट या माध्यमामुळे ..लेखक आणि कवी यांचे साहित्य मोठ्या वेगाने वाचकांच्या पर्यंत येत असते .आणि या लेखनास प्रतिसाद मोठ्या प्रमाणत मिळत असतो . कवयित्री म्हणते की  " आपल्या स्वताच्या  ब्लॉगवर -कविता शेअर करतांना  त्यांच्या कवितांना  -त्यातही ..प्रेम कवितांना खूप मोठा प्रतिसाद मिळत गेला , नव्या पिढीतील वाचकांनी अभिप्राय दिले ." 
 कवीच्या लेखन [-प्रवासातील हे मोठीच आनंददायक गोष्ट आहे.

कविता निर्मिती , कवितेचे मनातून कागदावरती उतरणे , रसिकांचा प्रतिसाद मिळणे ..हा अनुभव घेतलेल्या या कवयित्रीला आपला कविता संग्रह यायला हवा " असे वाटणे हा खरे तर महत्वाचा टप्पा ,यात देखील कवयित्रीला यश आले आहे असे प्रस्तुतचा कविता - संग्रह वाचून वाटले. 
" माझे तुला नि:शब्द शब्द " , 
१४४ पानांच्या या कविता संग्रहात कविता संख्या १०१ आहेत , प्रेम कविता या जास्त आहेत ..त्यामुळे "प्रेम कवितांचा संग्रह " असे ठळकपणे म्हणता येईल .काही कविता सामजिक जाणीवेच्या , स्त्री"जाणीवेच्या आहेत., शेवटी ८ कवितांचा " कणिका " हा छोटासा विभाग आहे .
प्रेम कविता जास्त आहेत म्हणजे ..या कवितेत एक "तो "आहे आणि एक "ती " आहे ..आणि या कवितेतून "ती" व्यक्त होते ..प्रेम विषयी तिला काय काय वाटतंय ..हे सर्व शब्दरूप ..ज्याच्या साठी कविता आहेत..त्याला नि:शब्द "करून टाकतात .
कारण .
.शब्दांना माहिती आहे 
आपल्या आतलं भांडण
तुझ्या माझ्या नजरेतलं
दाटलेलं  नभांगण 
नभांगण बरसातांना 
शब्द असतातच कुठे 
तेंव्हा फक्त तुझ्यामाझ्या 
प्रेमाला मिठीच कोंदण ....( शब्दांना माहित आहे ..पृ..७४.,), 

एकमेकांना शब्द दिले ,ते हवेत विरून जाणारे नाहीत ..ते कसे आहेत ...
याची जाणीव करून देणारी ही छान कविता..
 " तुला दिलेले शब्द सहज दिलेले नाहीत 
ती वचनं आहेत
मी ती कळ्यासारखी माळली आहेत 
तू मोरपिसासारखे खोवून ठेव
जेंव्हा कधी माझी स्य येईल 
उशाजवळ पसरून ठेव ....  ( तुले दिलेले शब्द ...पृ..६७ ),,,


प्रेम भावनेचा आदर होत नसेल ..मन दुखावले जाते ..त्याची ही कविता ..
अन 
गुंतलेल्या श्वासांना 
धुरांच्या लाटांवर 
सोडून द्यावे 
अगदी तेव्हड्याच अलिप्ततेने 
दूर लोटून देतोस..!
किती सहज सिगारेट 
तुझ्या ओठांवर जळत असते ...!
अन मी ...?
आत अंतस्थी विझत असते ...!  ...( सिगारेट ..पृ.८७  ),

कधी कधी ..प्रेम " म्हणजे नेमके काय ..? समजत नाही की उमजत नाही ..गोंधळच असतो सगळा ,

" खर तर साद प्रतिसादाची भाषा 
उमजल्या शिवायच काही निर्णय 
आपसूक होऊन जातात ...
त्यालाच " प्रेम " म्हणतात ..!     (त्यालाच "प्रेम " म्हणतात ..पृ..५५ )

प्रेम म्हणजे आधार , प्रेम म्हणजे विस्वास ..आणि प्रेमात पडल्यावर "नवे वेड लागते " .
मग मनाची अशी अवस्था होणारच ,
" तू दिसला नाहीस की 
किती शंका भीतीचे काळे ढग
मनात दाटायचे
मग मनातले डोळ्यातून बरसायचे ..,  . ( तू दिसला नाहीस की ..पृ.४७ ),.
.
आलेला पाउस , बरसणाऱ्या धारा .आणि प्रेमी जीवांच्या मनातला विरह यांचे अतूट असे नाते आहेच..
विरहाच्या कला मनाला सोसवत नाहीत ..मग असे होते या मनाचे..
" दाटुनी नभात जेव्न्हां
  घन व्याकुळ रडले 
  साद माझीच ती 
  एक तू..
  आक्रोश धारांत रे....    .( घन निळे ..पृ...४१ ),

अशा वेळी आठवतात त्या झालेल्या भेटी...

" किती भेटी झाल्या 
मोजदाद नाही..
त्या थांबल्या वेळा तिथेच 
थोड्या पापण्यात कैद 
 अन आलिंगनात काही ...!    ( किती भेटी ...! पृ.१९ )
हे सारे विसरण्याच्या पलीकडचे आहे ..मनाच्या नि:शब्द अवस्थेत अनुभवावे असे...
....त्याची ही कविता अशी होते..
परि -
पाहून रंग 
तुझा तृप्त 
मनी अतृप्त 
मी न राहते 
ठाऊक असे मजला 
आतला रंग , रंगातला ...    .( सांग कसे विसरायचे ...पृ..२३ ),

अशा अनेक प्रेम कविता या संग्रहात आहेत..काही शीर्षके -क्षण काही वेचलेले " (२० ), उगवाव म्हणते तुझ्यातून ..(२५), , "आज कित्ती कट्टी दिवसांनी ..(२९ ), ऎक ना ..! (७९ ), " तू उमलतो ..(९२ ) ,
त्याच्या उबदार श्वासावर..." (६८ ), ," प्रेम तुझा रंग कसा ..? (६० ),
या कविता संग्रहात
स्त्री -जाणीव विषय खूप  कविता आहेत..त्यांची शीर्षके -
"सखे " (१०७ ), " जिथे घराच्या भिंतीत ..(११६ ),  "ती ...(पृ.११७ ),  " एकेकीच्या अश्रुमागे (१२१ ),,

 कवयित्री पुष्पांजली कर्वे  यांच्या काव्य लेखनाचा भावसुंदर ,भावपूर्ण असा लेखन अविष्कार म्हणजेच त्यांचा हा कविता संग्रह आहे.  , प्रेम भावना संयमित रुपात अधिक भावणारी असते " ,सावरणे , विस्वास असणे , उमजणे आणि समजणे ,समर्पण ..या आशयाच्या कविता आणि यातली  भावपूर्ण शब्द योजना  कवितेला अधिक अर्थपूर्ण बनवते, निर्मल भावपूर्ण कविता " असे या कवितांचे वर्णन करावेसे वाटते .
कवयित्री पुष्पांजली कर्वे ..यांच्या पाह्लिया कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत..आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पुस्तक-परिचय लेख-  
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------
कविता संग्रह- माझे तुला नि:शब्द शब्द ,
कवयित्री - पुष्पांजली कर्वे.
९८९२६६७४८२ 
पृष्ठ - १४४ , मूल्य-रु.१५०/-
---------------------------------------------------------------
प्रकाशक - शारदा प्रकाशन 
नौपाडा -ठाणे 
संपर्क - ९८२०१७६९३४ 
---------------------------------------------------------

Saturday, April 7, 2018

मस्त फिरू रे मस्त फिरू साठी आलेला अभिप्राय

ज्येष्ठ बालसाहित्यकार अरुण वि.देशपांडे, पुणे यांचा 'मस्त फिरू रे मस्त फिरू' हा नवाकोरा  बालकुमार कवितासंग्रह आज घरी पोहचला.
 मुलांची मनं आनंदीत आणि सुसंस्कारीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांची कविता करते. मुलांचा ज्ञानविस्तार वाढवते.
खरे वाटो की खोटे कुणा
खरेच सांगतोय रे बाबा
काॅम्प्युटर मस्त वापरतात
माझे लाडके आबा....
....असं सहज लिहून जाणारे, आजची बालकविता लिहिणारे, मुलांचे लाडके देशपांडे आबा. त्यांच्या या नव्या पुस्तकासाठी त्यांना खूप शुभेच्छा आणि
अभिनंदन.

एकनाथ आव्हाड.