Thursday, December 28, 2017

पुस्तक-परिचय लेख- ले- अरुण वि.देशपांडे . पुणे.- कविता संग्रह - जमाना बदलल्याचं चिन्हं दुसरं काय ?

पुस्तक-परिचय लेख- ले- अरुण वि.देशपांडे . पुणे.
----------------------------------------------------------------
मनाला भिडणाऱ्या कवितांचे एक अनोखे भावविश्व "
कविता संग्रह -
 जमाना बदलल्याचं चिन्हं 
दुसरं काय ?
----------------------------------------------------------------
कविमित्र प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ( सागर ), यांचा कविता संग्रह - जमाना बदलल्याचं चिन्हं दुसरं  काय ?
संग्रहाचे  शीर्षक वाचकांच्या मनात एकाच वेळी अनेक भाव-प्रश्न उभे करून जाणारे आहे आहे असे मला वाटते ,  एखाद्या भावनिक अशा  क्षणी आपण सहज म्हणून जातो ..आता आपल्या हातात काय राहिलंय ? ,जमाना बदललाय दुसरं काय !,
कधी कधी सभोवतालची विलक्षण वेगाने बदलत जाणारी परिस्थिती पाहून आपण मनोमन स्तब्ध होतो, नि:शब्द होतो ..अशावेळी एकच स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आपल्या मनात उमटते  ती म्हणजे ..अहो काय सांगावे..
जमाना बदलल्याचं  अजून दुसरं चिन्हं आणखी काय हवं ?

मित्रांनो .संग्रहाच्या शीर्षकाने कविता अर्थाच्या शक्यतेची  अशी आवर्तने निर्माण केली ..त्यामुळे  वेगळ्या आस्वादात्मक पातळीवरून या कवीच्या कविता वाचतांना एक छान कविता अनुभव आला हे सांगावेसे वाटते.
११९ पृष्ठांच्या संग्रहात एकूण ९२ कविता आहेत ..आणि चार विभगात या कविता आहेत. पहिल्या भागात आहे -
झाड, निसर्ग , शेती - या विषयावरच्या २५ कविता ,
दुसऱ्या भागात -२५ गेय कविता आहेत ,तिसऱ्या विभागात - ३२ - मुक्तछंद आणि मी विषयक कविता आहेत , आणि शेवटच्या  चार कविता या  " स्त्री जाणीवेच्या कविता " असे ठळकपणे सांगितलेले आहे.

संग्रहाच्या आरंभी कवीचे मनोगत हे त्याच्या "व्यथित मनाची घालमेल " आहे हे कळते .आणि आपल्या मनाची ही घालमेल ..मोठ्या व्यथित मनाने कवीने विविध कविता-रचनेतून यथायोग्य शब्दातून व्यक्त केली आहे ..हे या संग्रहातील कवितेचे ठळक असे वैशिट्य आहे. या मनोगतातील कवीच्या मनातले पुन्हा इथे सांगणे ..योग्य होणार नाही,  हे सगळे मनोगत संग्रह आस्वादन करतांना वाचले तर ते कवीच्या कविता प्रवासाबद्दल नेमकेपणाने सांगते आहे हे जाणवेल.

संग्रहाच्या शेवटी " क्षीरसागरांची कविता = एक रसास्वाद  कवी प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितेबद्दल अनेक मान्यवरांचे  अभिप्राय वाचावयास मिळतात ..यातून कवी क्षीरसागर यांच्या कविते बद्दल खूप चांगले आणि महत्वाचे असे जाणून घेता येणे शक्य झालेले आहे .
प्रस्तुत संग्रहातील कवितेबद्दल आणि कवी बद्दल --
प्रा.श्रीकृष्ण अडसूळ , मडगाव - यांनी संग्रहाच्या ब्लर्बवरील  आपले मत नोंदवतांना म्हटले आहे की -
" एकविसाव्या शतकातील जीवनाचं कृषीकेंद्रित अशा ग्रामजीवनाचं विविधांगी आणि अर्थपूर्ण दर्शन घडविणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितेची भाषा नागरसन्मुख आहे ".

संग्रहातील काही कविता अंश ..
झाड ,निसर्ग, शेती 
-------------------------------------
कविमन  मन निसर्गाशी संवाद साधणारे आहे, त्यांच्यातील नाते जीवाभावाचे असे दृढ आहे .म्हणूनच निसर्गातील दुखांचे हुंकार त्याच्या कवितेतून उमटतात ..अशा काही कविता ..
१.
" कटाच काढला 
 जरी माणासाने 
 झाडे गाती गाणे 
सुखाचेच 
जगतात झाडे 
माणसासाठी 
मरणाच्या गाठी 
घेऊनच .....( पृ....२० )
२,
त्यांचे सर्द दर्द मौन 
दंवातुन पाझरत
तेंव्हा नकळत  झाड 
गदगदून उठते ....( वेदना फुलांच्या ..पृ..१६ ),
३.
झाडं व मुली वयात आल्या की 
माणसांच्या नजरा वखवखू लागतात '
त्या नजरांनीच ती लागतात सुकू ...
त्यांच्या नजरा बाद करतील 
तो दिवस दूर नाही,
मित्र असलेला माणूस वैरी झाला 
आता त्यांची खैर नाही ....( माणसांची खैर नाही  पृ..३९ )

काही गेय कविता -अंश पाहू या ..
१.
वेचून घेतो | काळोख थोडा ||
सांजवेळी मी | नदीकिनारी  ||
गूढ बोलणे | झाडावरती  ||
अस्वस्थ होतो  | नदीकिनारी  || ( नदीकिनारी ..पृ.४४ ),
२.
या फुलांना समजावतो मी
दुखः: हे दावू नका 
काटे जरी सोबतीला '
गंध गुपित ठेवू नका .... (नका .. पृ..४९ ),
३.
ते थेंब नभीचे गंधित झाले 
ते शोषले कुणी ?
झाडांनी ? , कळ्यांनी ? नाही 
वाऱ्याने ? नाही ..फक्त माणसांनी ...( ते थेंब नभीचे ..पृ..५५ ),

मुक्तछंद आणि मी विषयक काही कविता 
१.
हे आख्खं शहर आता 
डस्टबीन बनण्याच्या 
मार्गावर निघालाय 
प्रदूषित चेहेरयाची अन 
मनाची ही माणसे ,
घालतात आताशा 
धूर आणि धुळीचेच मास्क ...( अस्तित्व ..पृ.६७ ),
२.
आता आईबापचं देतात 
मुलाबाळांना , लेकीबाळींना 
मोबाईल , इअरफोन , हेडफोन 
कोंबतात ते रात्रंदिवस कानात 
जमाना बदलल्याच चिन्हं 
दुसरं काय  !      ( शीर्षक कविता ...पृ..७० ),

३.
माझ्या गावाच्या भूमीत 
आता बदलते जग 
गेली शेती ,गेली बैल 
करी भुई तगमग 
माझ्या गावाच्या भूमीत 
नाही माडांचे ते बन 
नाही दर्या जरी तिथे 
लोकांचे निर्मल मन ...( माझ्या गावाच्या भूमीत ..पृ..८१ )
४.
जगणे जमत नसतांनाही 
जगतात इथे माणसे 
मरणाची इच्छा नसताही 
मरतात जिती माणसे ....( धडपड .पृ.९७ ).
५.
भोवताली हाव वसले की 
रस्त्याला हटविले जाते 
ही शिक्षा असते जणू 
रस्त्यालाच 
पिकांना हटविल्याची .....(शिक्षा ..पृ..१०२ ),,
६,
जाहले अंगण रिते 
मनातही काही नाही 
दानतीचे कुठे कोणा 
आपलेच भागत नाही ...( आपलेच भागत नाही ...पृ.१०५ ),


तर असे आहे प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ..(सागर ) या कवीचे ही भावविश्व .आणि त्यातल्या आयुष्याचे हे प्रतिबिंब कवीचे न वाटता आपले चित्र वाटू लागते ..याचे कारण यातील कवीची खंत , त्याच्या मनाला घेरून राहिलेली निराशा , निसर्गाशी असलेले नाते आणि आता या नात्याच्या  झालेली फरपट पाहून मनाला होणारी वेदना ..हे एकट्या फक्त कवीची राहत नाही तर ती तुमची आमची, माझी ..अशी सर्वांची आहे ,हे असे वाटायला लावणारी ही कविता ..आणि हा कवी ..आपला मित्र वाटतो .जो आपल्या मनातील अनेक भावना त्याच्या कवितेतून अगदी सहज..सध्या .शब्दातून मांडतो आहे ..अशा या मनाला भिडणार्या कवितांचा संग्रह .वाचकांना खूप भावणारा ठरेल यात शंकाच नाही.


प्रसिध्द चित्रकार व मित्र - श्री. दिलीप दारव्हेकर यांनी या कविता संग्रहाचे अर्थपूर्ण आणि साजेसे मुखपृष्ठ केले आहे ,त्यांचे अभिनंदन.
कवी -प्रकाश क्षीरसागर यांचे अभिनंदन आणि पुढील कविता प्रवासासाठी लेखन-शुभेच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
-------------------------------------------
पुस्तक-परिचय
मनाला भिडणाऱ्या कवितांचे एक अनोखे भावविश्व "
कविता संग्रह -
 जमाना बदलल्याचं चिन्हं 
दुसरं काय ?
पृ.१२० , मूल्य- रु.१५०/- 
-----------------------------------------------------------
कवी- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 
संपर्क- ९०११०८२२९९ 
----------------------------------------------------------
प्रकाशक - माधव राघव प्रकाशन
ताळगाव - गोवा 
------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment