Wednesday, March 27, 2019

पुस्तक-परिचय लेख- कथा-संग्रह- वैशाख वणवा

पुस्तक परिचय लेख-  
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------
होरपळलेल्या जीवांच्या चटका लावणाऱ्या कथा - 
"वैशाख वणवा ( कथा संग्रह )- छाया बेले .
----------------------------------------------------------------------
मराठवाड्यातील साहित्यिका छाया बेले यांचे कविता आणि कथा लेखन पुस्तकरूपाने वाचकांच्या पर्यंत आलेले आहे ते असे -
१.पहिला कविता संग्रह - लढाई अस्तित्वाची , २०१२ साली प्रकाशित झाला 
आणि त्यांचा दुसरा कविता संग्रह -
"घर याचे हृदयी माझ्या " २०१५ मध्ये प्रकाशित झालाय.
या कविता संग्रहाच्या  प्रस्तावनेत - छाया बेले यांच्या कविते विषयीचा हा अभिप्राय वाचकांसाठी आवर्जून दिला पाहिजे -

 "नव्या वाण्ग्मयीन  जाणीवा आणि नव्या वाण्ग्मयीन प्रवृत्ती " याची प्रचीती देणाऱ्या कविता " अशी पावती 
त्यांच्या लेखनास  दिली आहे ती आदरणीय डॉ.गंगाधर पानतावणे सरांनी ."
हा अभिप्राय वाचून आपणास साहित्यिका छाया बेले यांच्या लेखना विषयी कल्पना येण्यास मदत होईल.

छाया बेले कविता लेखन ज्या जाणीवेने करीत आहेत ,त्याच जाणीवेने त्या कथा लेखन करीत आहेत . या लेखन सातत्यामुळे 
त्यांच्या कथा संग्रहरुपात आलेल्या आहेत.
त्यांचा पहिला कथा संग्रह "चकवा " २०१५ साली प्रकाशित झाला .

पहिल्या तीन पुस्तका नंतर त्यांचे प्रकाशित झालेले चौथे पुस्तक - "वैशाख वणवा " असून हा एक कथा संग्रह आहे.
या संग्रहातील मनोगतात लेखिका म्हणते आहे -
"जीवन जगत  असतांना आपण आजूबाजूला अनेक गोष्टी बघत असतो त्यातील काही गोष्टी मनात कायम घर करून राहतात .
काही चूक नसतांना एखाद्याचं जगणं नाकारलं जातं  ही दुसर्याची वेदनाही मनात सलत राहते  अशाच गोष्टी मी शब्दात मांडण्याचा 
प्रयत्न करते ".
आपल्या या मनोभूमिकेशी समरस होऊन लेखिका कथा लेखन करते याची प्रचीती "वैशाख वणवा " संग्रहातील कथा वाचून येते .
 
संग्रहाचे शीर्षक - वैशाख वणवा "हे या कथातील आशयाची पूर्वकल्पना देणारे आहे असेच म्हणू या. या कथा म्हणजे -ज्यांच्या जगण्यात 
सगळ्याच सुखांची , आनंदाची कायमच  " वाणवा " आहे अशा जीवांच्या वेदना मांडणार्या कथा वाचकांच्या जीवाला चटका 
लावतील हे नक्की.
छाया बेले यांच्या "वैशाख वणवा " संग्रहातील कथा आणि त्यातील विशेष गुण - माझ्या दृष्टीने खालील आहेत ..
१. व्यक्तिचित्रणे असो वा व्यक्तिरेखा असो ..त्यांचे अचूक शब्दचित्र उभे करणे हे लेखिकेचे कौशल्य आहे .सगळ्याच कथा वाचनीय आहेत 
त्याचे श्रेय या कथातील व्यक्तिरेखांचे आहे . एक माणूस ,एक व्यक्ती म्हणून या कथेतील व्यक्तिरेखा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.

२. कविता असो किंवा कथा वा इतर लेखन असो ..यातला आशय -केंद्र  माणूस आणि त्याच्या भावना असतात , ते लेखन वाचकांच्या 
मनाला नक्कीच भिडणारे असते . छाया बेले यांच्या कथेत हे सर्व नेमकेपणाने आलेले  आहे .

३. ओघवती कथन शैली वाचकांना खिळवून ठेवणारी आहे ..कथा लेखन प्रभावी  होण्यासाठी लागणारे लेखन -घटक कोणते आहेत ", याची 
उत्तम जाण लेखिका - छाया बेले यांना आहे ..
प्रभावी निवेदन शैली , कथेतील वातवरण -परिसर  निर्मिती या  कथा-आशयाला अधिक वास्तव रूप देणारी आहे , या सर्वाचे शब्द-रूप 
वाचकांच्या समोर त्याचे अचूक चित्ररूप सादर करते ..त्यामुळे .कथेतील वातावरणात त्या त्या व्यक्तिरेखे सोबत वाचक फिरू लागतो "
हे विशेष आहे.
दिन-प्रहर असो,परिसर वर्णन असो किंवा व्यक्तीचे मानसिक  चित्रण असो प्रत्येक कथेत ते खूप सूक्ष्मपणे येऊन जाते ..याचे श्रेय लेखिकेच्या 
लेखन-दृष्टीला आहे जे दिसणारे ,जाणवणारे असे खूप काही अचूकपणे शब्दात टिपते .

४.या कथा आहेत त्या सामन्य जीवन स्तरातील माणसांच्या , ज्या ग्रामीण परिसरात रहाणार्या आहेत ,त्यांचा जीवन-अवकाश , मनातली स्वप्ने ,
पूर्ण व्हाव्यात असे वाटणाऱ्या इच्छा -आंकाक्षा " या फार अशक्य आहेत असे ही नाही ..पण त्यांच्या वास्तवात , त्यांच्या भावनिक विश्वात 
सगळ्या गोष्टींची  वानवा " आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होणे ,आपल्या मनाप्रमाणे होणे "या गोष्टी केवळ एक अपूर्ण  इच्छा होऊन रहाते .
 अशाच घटना असे ,प्रसंग ..आणि खूप काही .या कथेतील व्यक्तिरेखांच्या वाट्याला आलेले "वैशाख -वणवा " सारखे आयुष्य आहे.
अशा आशय-द्रव्यावर लेखिका छाया बेले कथा लेखनातून   व्यक्त होतात .

या संग्रहातील कथा  प्राधान्याने "भावनिक कथा आहेत ", वैचारिक बोजडपणा , सामाजिक -वैचारिक अभिसरण " असे काही या लेखनाचे 
प्रयोजन आहे असे जाणवत नसले तरी माणसांच्या  ..भावना सुद्धा खूप महत्वाचा सामाजिक आशयाचा संदेश देणाऱ्या असतात ",
हे या कथा सांगतात ", हे ही विशेष सांगावे असे आहे.

या कथा संग्रहातील पहिलीच कथा ..वंदू .. ही तिची आणि मुकुदाची प्रेम-कथा आहे ,असफल प्रेमाची कथा छान जमून आली आहे .
लेखिका आपल्या कथेतून लेखन ओघात -खूप छान असे भाष्य करते .. 
या कथेतील  "प्रेमाच्या संदर्भातील हे विचार ..
"मात्र एक गोष्ट अनादी कालापासून आपलं अस्तित्व टिकवून आहे ..वेगवेगळ्या रुपात .
ती म्हणजे प्रेम  !!
जगण्याची तीच तर मूळ प्रेरणा असते .प्रत्येकाच्या जीवनात तिचं रूप वेगळं असतं एवढच .कुणाचं धर्मावर जातीवर देशावर आईवडील 
नात्यागोत्यावर , मुलांवर , मित्रांवर , स्वतहा:वर  " प्रेम असते . "प्रेम ही अशी भावना आहे जी माणसाला कोणत्याही परिस्थितीवर मात करायला 
शिकवते , जगायला शिकवते .."
वरील भाव-भावनांची सुरेख प्रचीती देणारी कथा - वणवा "(पृ..४६ )-

कथेतील वसुधा- तिची जीवन कहाणी आणि मनातील नाजूक भावना या दोन्ही वाचतांना तिच्याविषयी एक आपलेपणा वाचकांच्या मनात 
नक्कीच निर्माण होईल ,या कथेचा शेवट वाचकांना सुखावणारा आहे 
या संग्रहातील कथा नायिका -प्रधान आहेत..त्यामुळे "स्त्री " स्त्रीत्व ",स्त्री-सुलभ भावना " स्त्री -सबला ,स्त्री -शक्ती " हे सर्व कथेत 
वाचावयास मिळते .
उदा - कथा  "सरवा (पृ.१५ ) मधील दुर्गी ..,कथा -चिमा (पृ.२७ ) मधली चिमाची दुर्दैवी कहाणी , कथा -परतीची वाट-(पृ -३५ )- सुमन आणि 
तिच्या वडिलांच्या नात्यातील भावनिक बंध , कथा - संगु -(पृ.७९ ) संगुच्या वाट्याला आलेले भीषण जगणे , कथा -जोगतीन -(पृ.९५ )-
अंबा आणि चंपा ..थोपवलेले आयुष्य नाकारण्याचे थेट धीटपण दाखवू पाहतात ,.त्याची थरारक कथा .
हे असे आयुष्य जगणार्या स्त्रियांचे जीवन दर्शन सुद्धा वाचकांना विशेषतः नागरी वाचकांना नवा अनुभव देणारे ठरावे .

संग्रह्तील या  पेरणी -मधील महादू , अंतर -कथेतील -धोंडीबा , बाप-कथेतील "बाबा " या व्यक्तिरेखा खूप प्रभावी आहेत .

छान ,आशयपूर्ण कथा लेखना बद्दल लेखिका -छाया बेले यांचे अभिनंदन. व पुढील लेखनास शुभेच्छा.
चित्रकार - मित्र - प्रमोद दिवेकर यांचे समर्पक मुखपृष्ठ संग्रहास लाभले आहे."याचाही उल्लेख केला पाहिजे 
प्रकाशक व मित्र श्री.जयप्रकाश सुरनर यांनी संगत प्रकाशन -नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या "वैशाख वणवा " या संग्रहाचे सर्वत्र स्वागत होईल 
व वाचक प्रतिसाद लाभेल याची खात्री आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क -९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------
कथा संग्रह - वैशाख वणवा 
छाया बेले 
प्रकाशक -
संगत प्रकाशन , नांदेड .
पृ.१०८ , मूल्य- रु.१६० /-


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख- कविता-संग्रह- मातीत हरवल्या कविता

पुस्तक-परिचय लेख -
अरुण वि.देशपांडे -पुणे 
------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख -
मातीच्या ओलाव्यात भिजलेल्या कविता -"
मातीत हरवल्या कविता - 
(कविता संग्रह )
--------------------------------------------------------------
वाचकांच्या मनात घर करणाऱ्या कवितांचे लेखन करणारा एक भावूक -संवदनशील कवी - अशी ठळकपणे ओळख  देणारा
मातीत हरवल्या कविता "  कविता संग्रह संतोष आळंजकर या कवीचा आहे.  विशेष म्हणजे हा या कवीचा "पहिला कविता संग्रह आहे .
 मातीशी भावनिक दृष्ट्या एकरूप असलेल्या या कवीने 
आपल्या गावातील चित्रण करतांना  इतके अस्सल केले आहे की ..या कविता आणि त्यातील भाव हे प्रत्येकाच्या नजरे समोर असलेल्या 
गावाचे आणि शेताचे चित्र उभे करते . आपण  या सर्वांचा  एक अभिन्न असा भाग आहोत ही भावना दृढ होऊ लागते .

कवीने व्यक्त केलेली खंत , त्याच्या मनातील वेदना , त्याला होणारे अपेक्षाभंदुख, मनावर साठलेली आगतिक -निराशा " हतबलता ,या कवितेतून येते 
आणि ती  या कवीची एकट्याची न रहाता आपल्या सर्वांची , वर्तमानावर व्यक्त होणारी आपली सर्वांची कविता वाटू लागते .
सहजता "हा या कवितेचा भावणारा असा कविता-गुण आहे . या सहजतेला एक वेग आहे , यातील भावनाचा  जो आवेग आहे , कवीने तो अतिशय संयतपणे
 आपल्या शब्दातून व्यक्त केला आहे.

९६ पृष्ठांच्या या कविता संग्रहात एकूण ८१ कविता आहेत ..या सर्व कविता "गावाकडच्या वातावरणातील आहेत . ज्याचं "बालपण "आता आठवणीत आहे ,
आणि वर्तमानातील रेट्यामुळे आता ज्यांचे  "गावपण " हरवले आहे , अशा आपल्यासाठी  कवी -  संतोष आळंजकर यांच्या "मातीत हरवलेल्या कविता " 
 भावनिक अनुभूती बरोबरच ,वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या आहेत.
या कविता  संवाद करतात ,र कधी निसर्ग -रूप दाखवतात , अनेक कवितेतून   भाव-विश्वातील आपल्या माणसाची शब्द-चित्र कवी रेखाटतो ,त्यात 
 या सर्वांच्या मनातील "मातीशी असलेली , रुजलेली ओढ ,गावाशी असलेली नाळ " जाणवते , या  कविता खूपच छान आहेत.
लयबद्ध , गेयतापूर्ण अशा या रचना विविध कविता -आकृतीबंधात लिहून कवी संतोष आळंजकर यांनी आपल्या कविता लेखनाचे विविध -गुण दर्शनच घडवले आहे.
या कवितेतून  गावाकडील दिनक्रम , जगण्याचे आणि शेतकरी जीवन जगण्यातील असफल- प्रयोजन , निसर्गक्रम , शेती आणि शेतकरी यांचे अतूट असे भावबंध ,
 बदलत्या जीवन शैलीमुळे गावाकडील माणसांच्या जगण्यावर काय नि कसे विपरीत परिणाम झाले आहे हे आपल्या समोर मांडले आहे ..


कवी संतोष आळंजकर एक कवी आणि एक माणूस म्हणून आज ही या वातावरणात , या शेतात , जमिनीशी आणि या माणसाच्या सहवासात आहेत , त्यांच्या या प्रत्यक्ष 
जीवन-अनुभवाचे शब्द-रूप आणि  कविता एक "नैसर्गिक वाटणारे अस्सल रूप "वाटते .
मातीत हरवल्या कविता "- असे या कवीला किती ही वाटो, पण या कविता वाचून माझ्या सारखा वाचक  म्हणेल- या तर कधी पासूनच्या मनाच्या मातीत खूप खोलवर रुजलेल्या 
कविता आहेत ..म्हणूनच तर गावाकडील माणसांचे कष्ट , त्यांचे श्रम , त्यांची मातीशी असलेली एकरूप ओढ " हे सगळ काही कविता-कोंब -रुपात आपल्या समोर 
आलेलं आहे . 

रसिक हो -मला आवडलेल्या काही कवितांचे अंश आपल्या अभिप्रायार्थ देतो -
" कुणब्याची लगबग 
  होता वापसा मातीला 
 बीज तिफणता पडे 
 हिर्व सपान सखीला "....(वळीव स्पर्श ..पृ..२० ),

पावसाची वाट पहाणे , डोळे सारखे आभाळाकडे लागलेले , त्या साठी दात्या कडे "दान "मागावे लागते ..
"काय झालं मायबापा 
केलं काळीज निबार 
थोडं होऊन उदार 
माझं भिजू दे शिवार ...( दान ..पृ.२१ ).,

शेतावर राबणारा जीव .आसुसलेला असतो तो "सुगीच्या दिवसासाठी ..
"असे सुगीचे दिवस
नित येऊ दे रे देवा
तुझ्या देणाऱ्या हाताचा 
कोणा वाटू नये हेवा ...( सुगी ..पृ..२४ )

कृतज्ञता ही एक खूप मोठी भावना त्यांचे हे मनस्पर्शी उदाहरण ..
आपल्या शेतात राबणाऱ्या बैलावर पुत्रवत प्रेम करणारा -उतराई "होण्यासाठी इच्छा व्यक्त करतोय..
" तुझी होण्या उतराई 
राजा सांग काय करू 
जर झालास तू गाय 
तुझे होईन वासरू .....(उतराई ..पृ.२८),

कुणबी आणि या कुणबीपणामुले सोसावी लागणारी  दु:खः यावर संग्रहात अनेक कविता आहेत...

रोजचाच दैवभोग 
हाता -तोंडाचा मिलाप 
बांधा -बांधाहून उठे 
फासा-फासाचा विलाप 

नको खचू रे कुणब्या 
नको असा धीर सोडू 
तोड बाभळीचा फास 
खोड एकेकाची मोडू ...(नको खचू रे कुणब्या ..प्र..३१ ),

शेतकरी हा पंढरीचा वारकरी , विठुरायाचा अनन्य असा भक्त .अशा या शेतकरी -बापात "कवीला विठूराया दिसतो ..
"रोज जमती शेतात 
दोन पंखी वारकरी 
बाप माझा विठूराया 
शेत त्याचे पंढरी ... (बाप माझा विठूराया ..पृ..३३ ),

संतोष आळंजकर हे कवी तर आहेतच ..एका शिक्षकाच्या रुपात ते आपली सामाजिक कार्य जबाबदारीने पार पाडतात ..
स्व-जाणीव निर्माण करणे , सजग नागरिक घडवणे ..हे कार्य एक शिक्षकच करीत असतो , शिक्षक हा कवी असल्यामुळे 
कवितेतून तो हे संस्कार -कार्य अधिक प्रभावीपणे करतो याची प्रचीती देणार्य कविता या संग्रहात आहेत.

"बिनभिंतीच्या शाळेमध्ये चला जाऊ या मैदानावर 
पराभवाने खचू नये ही शिकवण मिळते मैदानावर ...(मैदानावर ..पृ..८९ ),

माणूस वयाने कितीही मोठा होवो , किंवा लौकिक दृष्ट्या खूप मोठेपणा त्याच्या वाट्याला येवो ..त्याला मनात वाटत असते 
की "आपले बालपण "पुन्हा एकदा अनुभवता यायला पाहिजे ..म्हणून तो म्हणतो..
"आता वाटे आणिक मजला कासाश आपण मोठे झालो 
बालपणीच्या स्वर्गसुखाला उगीच आपण परके झालो 

आयुष्याची घड्याळ देवा पुन्हा एकदा उलट फिरावी 
बालपणीच्या त्या दिवसांची पुन्हा एकदा लूट करावी ... ( मोठेपणीची कविता ..पृ..८३ ),

आपल्या जगण्याची एकूणच कशी दैना झालीय यावर लिहितांना कवी म्हणतोय..
"आता येऊन बसत नाहीत चिमण्या 
काळवंडलेल्या आढयाच्या हलकडीवर 
की जाऊन बसत नाहीत 
मंदिरात टांगून ठेवलेल्या कणसावर 
सुपातलं धान्य पाखडतांना 
पसाभर दाणे अंगणात टाकणारे हात गेले 
तेंव्हापासून सोडून दिलयं त्यांनी अंगणात येणं ....( चिमण्या ..पृ..५९ ),

दारिद्र्याशी लढाई लढण्यात जन्म गेलेल्या माणसाची  करुण कहाणी असलेल्या अनेक कविता या संग्रहात आहेत..
" का कुणास ठाऊक पण 
शेवटपर्यंत सांभाळून ठेवलं तिनं
पांढरी कवडी असलेलं सुई -दोऱ्याचं डब
शेवटपर्यंत घालत राहिली टाके 
आमच्या डोक्यावरच्या फाटक्या आभाळाला 
आणि तिच्या टाके उसवलेल्या कपाळाला ....(पांढरी कवडी ..पृ.५३ ),

नशीब आणि नशीब उजळेल या आशेवर पाहिलेली स्वप्न कधी खरी  न होणे .. शेतकरी बापाच्या जीवनाची अशी  शोकांतिका  ..
"अशीच कैक सालं राबता राबता 
आई बाचं जीव सरलं
अन एक इटाच्या घराचं सपान 
खोपटातच राहून गेलं ....!  (सपान ..पृ..४८ ),

आपल्या गावावर जीवापाड प्रेम असणारी , गावात जीव गुंतलेली माणसे ..गाव बदलून गेली हे त्याचं दु:ख..
"लहानसं होतं गावं झाडाझुडपात दडलेलं ,
शहरापासून दूर आणि माणूसकीन भरलेलं ...
खरचं रे बाळा असं होतं माझं गावं 
आता सारच बदललाय .! राहिलंय फक्त नाव..! ( गावाची कविता ..पृ..४७ ),

निसर्गाशी असलेले नाते , मातीशी असलेले ऋणानुबंध यातूनच कवी त्याची कृतज्ञता शेवटच्या कवितेतून व्यक्त करतो.
"सृजनाचे हे बीज टाकतो कोण झोळीत माझ्या 
पेरून उरते कसे चांदणे अरे खोळीत माझ्या 
या मातीशी असेल माझे युगायुगांचे नाते 
तरीच काही हिरवी पाने अरे ओळीत माझ्या  ||

कवी  संतोष आळंजकर या कवीच्या आशयपूर्ण कवितांचा आणि संग्रहाचा हा परिचय वाचून तुम्ही हा संग्रह नक्कीच वाचाल .
पुढील लेखन -प्रवासास कविमित्रास अनेक शुभेच्छा .
चित्रकार -अरविंद शेलार यांनी अन्रूप असे मुखपृष्ठ रेखाटले आहे , त्यांचा आवर्जून उल्लेख करतो 
कवी-मित्र -आणि जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
------------------------------------------------
मातीत हरवल्या कविता -(कविता संग्रह )
- संतोष आळंजकर
पृ.९६ , मूल्य- रु.१००/-
संपर्क-९४२३७२४४५० 
--------------------------------------------------------
प्रकाशक -
जनशक्ती वाचक चळवळ 
समर्थ नगर -औरंगाबाद ,
संपर्क-०२४०/ २३४१००४ 
-----------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय लेख- कविता -संग्रह - "सेल्फी ".

पुस्तक परिचय-लेख-
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
------------------------------------
कविता -संग्रह - सेल्फी 
-साहेबराव पवळे 
-------------------------------------------------------
पुण्यात वारजे येथे वास्तव्यास असलेले कवी- साहेबराव पवळे यांचे लेखन विश्व बहरले ते राजगुरूनगर भवतीच्या ग्रामीण परिसरात.
अनेक कवी सम्मेलनातील त्यांच्या नियमित सहभागामुळे कवी म्हणून ते सर्वपरिचित आहेत. दिवाळी अंकातूनही त्यांच्या कविता व कथा प्रसिद्ध होतात.

बहर " हा त्यांचा पहिला प्रकाशित कविता संग्रह .  या लिहित्या कवीचा दुसरा कविता संग्रह " सेल्फी' " प्रकाशक ललित कोलते यांच्या
 ललित पब्लिकेशन्स -पुणे,यांनी प्रकाशित केला आहे.
आपल्या वाचनात नेहमी ज्या मोठ्या म्हणता येतील अशा कविता येतात त्या 28 ते 32 म्हणजेच 7- 8 कडव्यांच्या असतात.
प्रस्तुत - सेल्फी "संग्रहातील कविता यापेक्षाही दुप्पट- तिप्पट मोठ्या , 3 ते चार पानांच्या कविता आहेत.
कवीला आपले दीर्घ -कविता 'लेखन अतिशय प्रिय असणे', अगदी स्वाभाविक आहे. याला एक भावनिक किनार देखील आहे.
 'त्याबद्दलचे मनोगत कवींच्या शब्दातच वाचू या-
"सेल्फी हा दीर्घ कवितांचा संग्रह आहे.
अनेक काव्यमचं व काव्यस्पर्धेत दीर्घ काव्यरचनेमुळे माझा सहभाग नाकारला गेला आहे".कविता आशयबध्द असून सुद्धा प्रवेश नाकारला गेला".
याचा राग न मानता या कवीने आपले कविता लेखन चालू ठेवले. 

आपल्या कविता लेखनाच्या प्रयोजनाबद्दल कवी म्हणतो-
माझ्या दीर्घ कवितांतून सर्वसामान्य लोकांचे दु:ख, सल,त्यांचा कोंडमारा " या भावना व्यक्त करीत असतो ,त्याच प्रमाणे
सामाजिक बदल व परिवर्तनाचा मार्ग,परिणामाची वास्तवता, कटू सत्य"
असे माझ्या कवितेतून व्यक्त होत असते.
आपल्या लेखनहेतूशी कवी अतिशय प्रामाणिक आहे, त्यांची तळमळ आतुन- मनातून आहे", याची प्रचिती "सेल्फी -संग्रहातील हे दीर्घ कविता वाचतांना नक्कीच येते.
या लेखनाला पद्य -कविता म्हणायचे का?या तर गद्य स्वरूपातील कविता ? असे विचार वाचकांच्या मनात येणे आश्चर्याचे नाही.

एक वाचक म्हणून या सर्व कवितांबद्दल मला जाणवले  आहे  ते असे-
खरे तर - "या कवितांना सामाजिक आणि वैचारिक , प्रबोधन करणाऱ्या गद्य स्वरूपातील-विधानात्मक,मुक्त- कविता " असे म्हणता येईल. "
एका विषयाला धरून हे कविता लेखन आहे. त्यामुळे प्रत्येक दीर्घ कवितेला  एक सूत्र आहे",त्याला धरून एक मोठा काल- अवकाश ",
 कवी साहेबराव आपल्या कवितेतून साकारतात, या कवितांचा हा लेखन विशेष कौतुकास्पद वाटावा असाच आहे. "

या कवितेतून कवीने त्याच्या मनातील
सामाजिक परिस्थितीवरील त्याचे मत, आणि विचार व्यक्त करण्याचे प्रयत्न केले आहेत,ते ही अगदी सविस्तरपणे.  मग या कविता गद्य वाटो, की आणखी काही,"
ते कवींसाठी मह्त्वाचे नाही,
कवीसाठी मह्त्वाचे आहे -जे दिसते आहे त्याबद्दल सांगणे, आणि शब्दातून ते मांडणे जे  समाजहितासाठीचे आहे .
आणि हे सगळं कवीने त्याच्या पद्धतीने व्यक्त केले आहे. हे असे प्रांजळपणच  या कवितांचे खरे स्वरूप आहे. "

या संग्रहाच्या अनुक्रमणिकची एक गमंत आहे, कविता कोणत्या प्रकारची आहे हे
कवीने स्वतःच्या नावाच्या अक्षरातून सांगितले आहे, कसे ते बघा-
सामाजिक कविता
हेलकवा देणाऱ्या कविता
बहुरंगी कविता
राजकीय कविता
वस्त्रहरण कविता
"साहेबराव" हे आहे कवीचे नाव.

83 पृष्ठांच्या सेल्फी " संग्रहात कविता आहेत त्या फक्त 29 .या संख्येवरून कवितेच्या दीर्घ रूपाची कल्पना यावी..
या मोठ्या कवितेतून कवीने व्यापक अशा
सांस्कृतिक , सामाजिक, राजकीय, भावनिक बदलांचे संदर्भ देतांना एक जाणीव करून दिली आहे, यातूनच बदल होईल, परिवर्तन होईल असा आशावाद कवी व्यक्त करतो",
कवींची ही लेखन भूमिका महत्त्वाची वाटावी ", असे वाटते.
विविध सामाजिक प्रश्न, समस्या, आधुनिक जीवनमान व त्यामुळे आर्थिक व भावनिक प्रश्न कसे निर्माण झालेत,
या विषयावरती लिहितांना कवीला भवतालीच्या परिस्थितीची अचूक जाण आहे अगदी टप्प्या टप्प्याने आणि क्रमाने त्या त्या विषयांवर  दीर्घ कविता बोलते.

काही  कवितेतील कडवी उदाहरण म्हणून देतोय..

जुन्या आणि नव्या पिढीतील संवाद ,विसंवाद जुनी गोष्ट असली तरी
हल्ली "वृद्धाश्रम " या संकल्पनेमुळे सर्वांचे भावविश्व कोसळून गेले आहे,
नव्या पिढीतील नातू आपल्या आईबाबांना सांगतोय -

पण..बाबा..
आजी- आजोबा गावी अनाथा सारखे जगले
तुमच्या मनीऑर्डरला नाही भुलले
भावबंधानी त्यांना प्रेम दिले
'मी आजी आजोबांच्या प्रेमाला दुरावलो
मग माझं काय चुकलं ?
बाबा झटपट उरका
वृद्धाश्रमात जायचं आहे तुम्हाला..
..विरहाचे दु:ख  (पृ-२९),

 आणखी एका कवितेत कवी म्हणतो-
"पाश्चिमात्याचे अनुकरण करून
फादर डे साजरा करून
बापाचे स्मरण करून
बापाचे ऋण फेडता येत नाही..
..बाप (पृ..३५),
"सेल्फी "या शीर्षक कवितेत आपण नेमक्या कोणत्या सेल्फी काढीत नाहीत याची खंत अशी व्यक्त करतो-
"आतंकवाद्यांनी सैनिक पोलीस मारले
त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली
त्या पोरक्या कुटुंबाबरोबर 
सांत्वनाचा सेल्फी काढायला कोणी येईना
..सेल्फी ' ..(पृ..६७),
कवितेबद्दल आपल्या भावना कवी अशा व्यक्त करतो-
"कविता असते भजन
त्यात असते समाज प्रबोधन
कविता असते भारूड
त्यात असते परिवर्तनाचे गारुड..
..कविता..(पृ..४९).

कवी साहेबराव पवळे यांच्या नव्या कवितासंग्रहातील कविता नेहेमी प्रमाणे  आशयपूर्ण असतील , त्या यापुढे मात्र ,
 शब्द-संख्येने आटोपशीर असतील  अशी अपेक्षा करू या .
 त्यांना पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा .
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------
सेल्फी -
(कविता संग्रह )
पृ -८४, मूल्य-रु.१००/-
साहेबराव पवळे 
संपर्क - ९३२२८४०८७० 
------------------------------------------------------
प्रकाशक - ललित पब्लिकेशन , पुणे.
संपर्क - ७७७६८२५७८३ 
------------------------------------------------------------

Saturday, March 9, 2019

पुस्तक परिचय - कवितां प्रवासाचा - आश्वासक आरंभ " कविता संग्रह , -आरंभ

पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------
पुस्तक परिचय -  
कवितां प्रवासाचा - आश्वासक आरंभ "
 कविता संग्रह , -आरंभ 
-------------------------------------------------------------------------
नमस्कार रसिक -वाचक मित्र हो -
कविमित्र - आदित्य जाधवच्या पहिल्या कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. या निमित्ताने प्रथम आपणा सर्वांच्या वतीने मी कवी मित्राचे अभिनंदन करतो.

आरंभ " कविता संग्रहाची प्रस्तावना लेखनाची जबाबदारी आदित्यने माझ्यावर सोपवली होती , ती जबाबदारी एक कविता -वाचक  या भूमिकेतून 
आणि मी स्वतहा: कविता लिहितो म्हणून "कवी " या ओळखीने थोडाफार जो परिचित झालोय , या दुसऱ्या भूमिकेतून ..-मी आदित्य जाधवच्या 
कविते बद्दल  लिहिले आहे , संग्रह वाचतांना आपण ही प्रस्तावना वाचालच.
प्रस्तुत "आरंभ " या कविता संग्रहात एकूण ७० कवितांचा समावेश आहे.

ग्रामीण -बोलीभाषा व त्यातील शब्द योजनेने या कवितेची शब्दकळा अधिकच शोभिवंत झाली आहे.
 हे सर्व शब्द  बहु-अर्थ शक्यता घेऊन आलेले आहेत .. .कविता पूर्ण वाचूनच त्यातील आशयाचा विचारपूर्वक अर्थ लावता येणे शक्य होईल.
या कवितेतून सामजिक नितीमुल्य , चालीरीती , जन-जीवन ,जन-समूह जीवनाचे दर्शन होते . , दिनमान , काल-चक्र " हे ही येतं  ,हे कवितेतून मांडतंना कवी .सर्वांना अनेक 
इशारे देतो , जे सूचक आहेत ," स्त्री-विषयक काही कवितेतून हे आपल्याला ठळक वाचावयास मिळते .
उदा- झरा (पृ.५ ) , मेणा "(१० ) ,, झळा " (पृ.२४ ), , काडी -माडी (पृ.२९ ), रात्र " (३० ), , "हा रंग नाही इथला " (पृ.३५ ), ,जोगवा (पृ.६० ), जळजळ (५० ), मृगजळ "(३३ ),

या कवितेत गूढता आहे ती अर्थांच्या अनेक शक्यतांची , यात व्यक्त होतांना कवी समाजमनाचे भान ठेवून .सांगतो आहे - हितकारक काय आहे ." हे सांगत असतांना ..
जे वाईट आहे, जे दूर करावे असे आहे " ते तसे करण्यातच सर्वांचे भले आहे 
 अशा कविता .. "सोळा आणे , उमाळा , पोरकी पाने , सुई दोरा , नकटा ,  फांदी , जळकुटे,
या काही कविता - टोकं ,  सावल्या ",  वजीर , गाऱ्हाणे ", शिंपण ", " फकीर  ", नीजधाम " , या आणि अजून काही कविता जशा दिसतात -तशा नाहीत ..,त्यातील अर्थ ,जीवन-सार आत खोलवर 
सूर मारल्यावर दिसून येते .

या कवितेतील "कावळे " बघा ,
दोन कावळ्यांची शाळा 
माझ्या दाराच्या मुळाशी
एकांताचे मग देणे 
सारे डोहाच्या तळाशी ..(तळ .पृ ..१७) .
वरील रानभूल "असो वा चंद्र , किंवा तळ ..या कविता पूर्ण वाचून हाताशी काही लागत नाही ..कारण जे काही आहे ते " सारे डोहाच्या तळाशी " असणारे आहे, त्यासाठी कविता 
पुन्हा पुन्हा वाचावी लागते .

पांगळा (पृ, स०) या कवितेत्तून माणसांच्या दर्शनी आणि अंतरीच्या वृत्तीवर कवी नेमकं व्यक्त होतो ..
लुप्त होईल "पांगळा
आम्ही डोळस अंधळे 
सारे करुनिया पाप 
नेसू अंगात सोवळे ..,

या संग्रहातील कविता .ज्यांना वास्तूरूप असे शीर्षक आहे . उदा. माडी ", शाळा , चांदण्याची गढी , काडी - माडी ", खोपा ", अंगण ", या कवितातून कवी व्यक्त होतांना आपल्या समोर एक 
नवे जग खुले करून दाखवतो ..
अंगण ..(पृ..६२ )..
 बाई  ! अंगण परस
दोन्ही सांभाळ नेटाने
नको विसरू वादळा
येतं उघड्या दाराने ... (अंगण .पृ..६२ )..

कविता लेखन आणि आदित्य हा तसा आता एकरूपतेचा प्रवास आहे, सहजतेने कविता लेखन करणे आदित्यला जमू लागलय  हे जाणवते आहे.
त्याच्या कविता "अष्टाक्षरी , अभंग आणि मुक्तछंदातल्या रचना आहेत.
सुचलेली कविता , कागदावर उतरवल्या नंतर आपल्याच कवितेवर पुनर-लेखनाचे संस्कार करण्याची त्याची तयारी ,त्यासाठी लागणारी -परिश्रम -भावना 
मला नेहमीच कौतुकास्पद वाटत आली आहे.
सोशल -मिडीयावर आदित्यच्या कवितांनी  रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहेच , आता "आरंभ - संग्रहाच्या पुस्तक रुपात त्याची आलेली 
कविता  जाणकार वाचकांच्या पर्यंत जाणार आहे ..हे बाब या  कवीच्या लेखन-प्रवासा साठी खूप उपयुक्त ठरणारी आहे.

आदित्यच्या कवितातून जीवन-अनुभव व्यक्त होतात  या कवीची आगळी वाटणारी " शब्द-योजना -या शब्दांचे कविता रूप  " पाहताक्षणी 
जितके वेगळे वाटेल ..तितकेच वेगळेपण या कविता वाचून पाहिल्यावर जाणवेल हे नक्की.
समाजभान  असणारा हा कवी त्याच्या कवितांमधून .शाश्वत जीवन-मूल्य , इष्ट -अनिष्ट , सुष्ट- दुष्ट , आणि मानवे स्वभावांचे विविध आणि सूक्ष्म 
कंगोरे " अशा अनेक विषयावर मनापासून व्यक्त होतांना दिसतो.

निसर्ग-चक्र , जीवनमान , आणि मानवी -भाव-भावना, स्त्री -पुरुष , बाई-माणूस , बाप्या -माणूस " अशा विषयावर कविता लिहितांना कवीमनाची 
उलघाल , खंत आणि वेदना , हे सर्व आदित्यच्या कवितांचे अर्थपूर्ण असे आशय आहेत , आणि या कविता वाचकाला अस्वथातेचा अनुभव जास्त 
प्रभावीपणे देतील .
या कवी साठी त्याच्या भोवती असलेला  माणूस अतिशय महत्वाचा आहे. याच तळमळीच्या भावने पोटी "आपल्या माणसाच्या चांगल्या आणि वाईट ,
स्वीकृत आणि त्याज्य" अशा दोन्ही स्वभाव -आणि  गुण -अव-गुनानावर याची कविता स्पष्टपणे बोलते .

कवी आदित्यच्या प्रस्तुत संग्रहातील कविता ", हा त्याच्या कवी म्हणून सुरु झालेल्या लेखन प्रवासाचा आरंभ "झाला आहे , एक नवा  आरंभ करणारा हा कवी 
आणि त्याच्या कविता ..हे दोन्ही नवोदित नसले तरी ..
या प्रवासातील रुळलेले लेखन -प्रवासी नाहीत , या पुढील वाटचालीत आदित्य ची कविता अधिक ठळकपणे व्यक्त होईल अशी अपेक्षा बाळगू या .

आरंभ " मधील कविता वाचल्यावर वाचक या पुढे  "-नवी पिढीच्या आश्वासक कवी"- मध्ये कवी आदित्य जाधवचा समावेश ..करतील ' या कवितेत याच्या खुणा 
आहेत .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------
 कविता संग्रह , -आरंभ 
कवी- आदित्य अ.जाधव 
पृ.७० , मूल्य-रु.१५०/-
संपर्क-९४०४४००००४ 
-------------------------------------------------------------
प्रकाशक-ललित कोलते 
ललित पब्लिकेशन 
आंबेगाव -पुणे-४६ 
संपर्क -८०८७२१८११३ 
--------------------------------------------------------------------

पुस्तक परिचय - आई ( ललित लेख संग्रह ).

पुस्तक-परिचय 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342 
-----------------------------------------
मातृमहतीचे  काव्यात्म -गद्य लेखन -
"आई "
----------------------------------------------------------------------------------------------
"आई " या विषयावर नेहमीच लेखन केले जाते ,त्यात ही कवितेतून "आईच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला घडत असते , अशा या 
परिचित विषयावर संपूर्ण एक पुस्तकच असावे ",असा योग लेखक द.गो.शिर्के या लेख-संग्रहाने आलेला आहे.
एकूण १८ लेखांचा  "आई " हा संग्रह  पुण्याच्या चपराक प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.

हे सर्व लेख  "आई " संबंधित आहेत.या लेखांची शीर्षक योजना अगदी अनुरूप अशीच केलेली आहे . 
वाचकाला आवडेल असे हे लेखन आहे ,याचे श्रेय लेखकाच्या भावनाप्रधान असलेल्या लेखन  -शैलीला आहे , ओघवत्या आणि रसाळ भाषेत त्यांनी हे लेखन केले आहे.
लेखक हे शिक्षक म्हणून कार्यरत होते , त्यांच्या या भूमिकेचा या लेखनास खूप चांगला उपयोग झाला आहे "असे म्हणावेसे वाटते.
या लेखामधून त्यांना जे सांगायचे आहे ते सर्व वाचकांच्या मनावर पूर्णपणे बिंबवले आहे.हे या लेखनाचे यशच आहे.

हे लेख म्हणजे भावूक असे ललित निबंध आहेत , प्रत्येक लेखातून त्यांनी "आई" संबंधी कुणी कुणी काय काय व्यक्त केले आहे ",हे वाचकांना 
सांगितले आहे, या साठी लागणारी सर्वसमावेशक दृष्टी ,आणि योय ते शोधून ते शब्दरूपात व्यक्त करणे " हे तसे अवघडसे कार्य आहे , आणि  लेखक -
द.गो.शिर्के यांनी परिश्रमपूर्वक छानच सिध्द केले आहे , या  अर्थाने लेख-स्वरूपात "आई" संबंधीचेच  त्यांचे हे लेखन वेगळे आणि वैशिष्टयपूर्ण 
ठरावे असेच आहे.
त्यांनी दिलेले कवितांचे काव्यांश केवळ अप्रतिम असेच आहेत ..या निमित्ताने नामवंत साहित्यिक-कवींच्या "आई" बद्दलच्या भावना आपणा 
वाचकांच्या पर्यंत आल्या  आहेत ,या उपक्रमाबद्दल द.गो.शिर्के सरांना धन्यवाद दिले पाहिजेत.

काही लेखांची ही शीर्षके ..लेखन-स्वरुपाची कल्पना देणारी आहेत.
"वात्सल्याचा अप्रतिम अविष्कार "-(पृ.१६ ), आभाळाची माया -(पृ.३९) ,"मराठी कवितेतील आई "-( पृ-५७ ), " काळी आई "- (पृ.६३ ).
"एक तीर्थक्षेत्र" -(पृ -७८ ), "श्यामची आई "- (पृ-८३ ), "मायेचा गाभारा "- (पृ -९७ ) ,

प्रत्येक लेखाची सुरुवात करतांना लेखक  "आई" या संकल्पनेची- भावनेचे जणू शब्द-पूजा करतात ,अनेक उदाहरणे .जी विचारांची ,चिंतनाची आणि 
कवितांची आहेत ..या सगळ्यातून एक वत्सल -प्रवाह  आहे तो -आईच्या मायेचा . यातील अनेक लेखनातून "आईचे -अनेक रूपातील दर्शन 
आपल्याला होते ..
दारिद्र्य आणि कष्ट , गरिबीमुळे सोसावी लागलेली अवहेलना , सर्वच गोष्टींचा असलेला अभाव ..यामुळे आपल्या मुलांच्या
वाट्याला आलेले जीवन ..हे सर्व सोसणे ..आईच्या आयुष्याचा संघर्ष आहे, तिनी जिद्दीने लढाई लढून ,संकटावर कशी मात केली ",हे सर्व 
तिच्या मुलांनी "आपल्या आईबद्दल "जे व्यक्त केले ..ते सर्व वाचून आपले मन भरून आल्याशिवाय राहणार नाही.

"आई" म्हणजे देवता स्वरूप , देवाला जे देवत्व मिळाले आहे "त्याला सुद्धा "माउली -स्वरूप" मिळाले "हा मातृ-रूपाचा गौरवच आहे असे म्हणू या.
साधू-संत , विचारवंत , लेखक-कवी , कथा-कविता ..माध्यम कोणते ही असो, यातून "आई" बद्दल व्यक्त होणे सगळ्यांना भावनिक -कर्तव्य वाटते ,
कारण "आपण जे घडतो .जे आयुष्य आपल्याला मिळाले -ते देणारी जननी , माय, आई , माता " आहे, म्हणूनच तिच्याविषयी किती बोलू ,किती लिहू ?
असे वाटणे साहजिक आहे 

. द.गो. शिर्के सरांनी आपल्या सगळ्या लेखातून याच सगळ्याना जे वाटले ..ते आपल्या पर्यंत आणले आहे.त्यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा.
आदरणीय शामराव कराळे- प्रमुख कार्यवाह - अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला ", यांनी या पुस्तकास यथोचित प्रस्त्वाना दिली आहे .
हे पुस्तक वाचून मनाला मोठेच समाधान मिळेल हे नक्की.
प्रकाशक -श्री.घनश्याम पाटील आणि चपराक टीम यांचे या पुस्तकाबद्दल अभिनंदन.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क -9850177342 
-------------------------------------------------------------------------------
आई 
पृ -१०४ , मूल्य- रु.१०० /-
ले- द.गो.शिर्के 
संपर्क -7588607138
प्रकाशक - घनश्याम पाटील 
चपराक प्रकाशन कोथरूड -पुणे .
संपर्क - 020-25384909
mo- 7057292092


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------