पुस्तक-परिचय लेख -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ ----------------------
सुंदर आणि वेधक भावकविता -
अंतर्साद - कविता संग्रह.
------------------------------ -----
कोणत्याही कवीचा पहिला कविता संग्रह प्रकाशित होतो , त्यानंतर अनेक दिवस या कवीची भाव-अवस्था ही अतीव अधिरतेची होऊन जाते , आपल्या कविता संग्रहाचे स्वागत रसिक आणि वाचक कसे करतील याची उत्सुकता ताणलेली असते . कवी प्रा.राहुल राजोपाध्ये यांच्या मनाची उत्सुकत मला जाणवते आहे.
त्यांचा पहिलाच कविता संग्रह " अंतर्साद " नुकताच वाचून झाला , या कवितेचा परिचय वाचकांना करून द्यावा असे वाटले ..म्हणून हा परिचय लेख.
प्रा.राहुल राजोपाध्ये हे देवरुख येथील " राजेंद्र माने -अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल विभागाचे "विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
कवितेबरोबरच ललित लेखन आणि लघुकथा लेखन ते करीत असतात .. साहित्य लेखन आणि अध्यापन " अशा दोन्ही क्षेत्रात राहुल राजोपाध्ये या व्यक्तिमत्वाचा " एक कवी , एक प्राध्यापक अशा दोन्ही रुपात सहज संचार चालू आहे ,
.
मनात उमटलेल्या तरंगांचे प्रातिनिधिक आरेखन म्हणजेच कविता " ,अशी सोपी व्याख्या कवीने आपल्या मनोगतात व्यक्त केली आहे , भावनांचा शब्द-रूपातील अविष्कार ..म्हणजेच साहित्य , कवीच्या मनातील आंदोलने , वादळे , आवर्तने ..हे सारे काही व्यक्त होत असते ते त्याच्या कवितेतून.
मनात जे काही उमटते ..ते कागदावर उतरवतांना जसेच्या तसे उतरवणे ", मग ही कविता नियमांच्या चौकटीत बसणारी नाहीये " हे कवी अगदी मोकळेपणाने सांगतो आहे ..या कवीचे हे असे सांगणे ..हा त्याचा आणि त्याच्या कवितेचा " प्रांजल -स्वभाव "आहे असे मला वाटते.
एका अर्थाने "मुक्तछंद " कविता लेखन या संग्रहात आहे असे ही नाही .कारण -
कविता लयबद्ध असली पाहिजे,कविता ही "गेय -कविता असली पाहिजे " असे कविता संस्कार करणारी कवितेची जाणकार मंडळी कवीच्या सहवासात आहे , किंबहुना त्यांच्या नजरेखालून या कविता संग्रहात आलेल्या आहेत.,
यामुळे एक मात्र नक्की झाले .. कवी राहुल राजोपाध्ये यांच्या कविता ..कवितेच्या परिचित चौकटीच्या बाहेरच्या आहेत " असे जाणवत नाही.
अंतर्साद " संग्रहात एकूण ६६ कवितांचा समावेश आहे . एकेच एक विषय आणि त्याव्ची कविता " अशा या कविता नाहीत ..त्यामुळे जे जे दिसले , जे जे भावले , जे जे मनास स्पर्शून गेले ..असे सगळे काही ..कवीच्या कवितेत येऊन जाते ", या कविता म्हणजे कवीने आपल्या जवळच्या माणसांना केलेले एक भावनिक असे कळकळीचे आव्हाहन आहे.. मनापासूनच कवीचे सांगणे ..ज्यात भावूक उत्कटता आहे, जणू.. कवी म्हणतोय- बाबारे ..ऐक जरा .मला काय वाटतंय, समजून घे ..हे माझे वाटणे माझ्या साठीचे असले तरी ..त्यात तुझ्या विषयी वाटणारी माझी भावना तू समजून घे... माझ्या मते ..कवीचे हे वाटणे ..म्हणजेच या सर्व कविता आहेत..
कवितेविषयी कवी म्हणतोय की -
संग्रहातील पहिलीच कविता - अंतर्साद..
"शब्द उतरतात कागदावरती मोत्यांची जशी सर ओघळते |
रचनेस अर्थाचे सामर्थ्य देऊनि त्यात मनीची भावना विरघळते ||... (पृ.११ ),
समोरच्याला दोष देणे "तसे तर सह्जेतेने जमणारी गोष्ट , पण त्या ऐवजी ,कवी मित्र सांगतो..हे बरे नव्हे ..
"फोडून खापर स्वतःच्या चुकांचे
इतरांचा कशाला रोष घेतोस ?
झटक धूळ चेहेर्यावरची स्वतःच्या
आरशाला कशाला दोष देतोस ? ...(दोष ..पृ.४० ),
एका हतबल परिस्थिती शरण बाबाची मनोवस्था ..जी एक समजावणी आहे .
.
"वाटतं आई व्हावे पण जमत नाही कामामध्ये |
पण थोडीशी आई असतेच रे प्रत्येक बाबामध्ये ||
वाटत असेन कोरडा दाखवतही नसेन ओलावा कृतीमध्ये |
पण थोडीशी आई असतेच रे प्रय्तेक बाबामध्ये || ....(थोडीशी आई बाबामध्ये ...पृ.३८ ),
आपल्या माणसाचे सोबत असणे आयुष्याला अर्थपूर्ण बनवणारे असते .या अशा .भावना ,व्यक्त करणारी ही एक कविता ..
जपतेस कश्या कळेना , ऋणानुबांधाच्या या गाठी |
सुखदु:खात सैदैव माझ्या, असतेस तूच पाठी ||
सोसून कष्ट सारे, जपतेस सर्व नाती |
देण्या प्रकाश कागाला , जश्या जळतात शांत वाती || ....( माझ्या साठी ..पृ.४९ ),
आजची बदलती परिस्थिती , ताण-तणाव ,दुरावत चाललेली माणसे ..कविमन व्यथित होणारच ..दोन मनातील अंतर ....परकेपणा नाहीये .यातच समाधान मानणारी ही कविता....
" तू सुखी तुझ्या जगात
मी आनंदी माझ्या विश्वात
दुरावा दोघांमध्ये तरीही
अंतरे जवळची भासतात ... ( अंतरातील जवळीक ...पृ..७० ),
अशा भावनिक कविता सोबत "प्रेम, विरह , तत्वज्ञान , निसर्ग आणि निसर्ग घटक यांच्यातील माणसातील नाते .
विविध नातेस्वरूप ..अशा अनेक विषयावरील कविता संग्रहात आहेत ...
प्रसिध्द साहित्यिक -समीक्षक - डॉ.वसुधा वैद्य - नागपूर - यांची मौलिक अशी प्रस्तावना या संग्रहास लाभलेली आहे
या छोटेखानी कविता संग्रह्तील कविता मोठ्या आशयपूर्ण आहेत .." असे वाचक नक्कीच म्हणेल.
हा कविता संग्रह तरलरंग " प्रकाशनाचे जयंत भास्कर फाटक यांनी प्रकाशित केला आहे.
कवी.प्रा.राहुल राजोपाध्ये यांना लेखन शुभेच्छा.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---
पुस्तक-परिचय लेख -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------ ----------------------
कविता -संग्रह -अंतर्साद
कवी- प्रा. राहुल राजोपाध्ये
पृ.७६ , मूल्य- रु.१२५ /-
संपर्क - rdrajopadhye@gmail.com
------------------------------ ------------------------------
प्रकाशक - तरलरंग ,
जयंत भास्कर फाटक - पुणे.
संपर्क - taralrang@gmail.com
------------------------------ ------------------------------ --------
No comments:
Post a Comment