पुस्तक परिचय लेख –
अरुण वि.देशपांडे
भावूक व्यक्तिचित्रणे –
“सावलीची झाडं “
जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे .म्हणजे ललित –लेखनाचे मनोरम असे उदाहरण आहे ,लेखकाला अनेक व्यक्तींचा सहवास लाभला , हा सहवास लेखकाला सर्वार्थाने एक संपन्न-माणूस “ बनवणारा ठरला आहे , सहाजिकच या व्यक्तीविषयी लेखकाच्या मनात आदरभाव आहे, एक कृतज्ञता आहे . लेखक चंद्रकुमार नलगे यांच्या लेखनाचा भाव -उत्कट असा अविष्कार “सावलीची झाडं “ या लेख –संग्रहात झाला आहे.
एकूण १४ व्यक्ती-चित्रे या संग्रहात आहेत. लेखकाच्या वैयीक्तिक आयुष्यात या सर्व व्यक्तींना आदराचे स्थान तर आहेच आहे , या शिवाय या व्यक्तींनी लेखकाच्या मनावर अनेक संस्कार केले आहेत , हे संस्कार लेखकाला आपण एक “माणूस “ होऊनच जगायचे आहे “,याची जाणीव करून देणारे आहेत . व्यक्ती आणि सहवास “हे व्यक्तिमत्व जडण-घडण होण्या साठी किती महत्वाचे असतात “ याची जाणीव प्रस्तुत संग्रहातील लेखांमधून येते .
दीर्घ असा जीवनपट या लेखनातून लेखक मांडतात ,हे वाचत असतांना त्या त्या काळातील संदर्भ आपल्याला खूप काही सांगणारे वाटतील , एक सांस्कृतिक आणि समाजिक असे दर्शन या लेखनातून नक्कीच होते .
साहेब आणि मी “,-
– महाराष्ट्राचे नेते,माजी उपपंतप्रधान , रसिकाग्रणी , विचारवंत साहित्यिक नाम.यशवंतरावजी चव्हाण यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या आहेत ..लेखकाच्या एकूणच आयुष्य-प्रवासात मा.यशवंतराव चव्हाण यांच्या सह्वासातील दिवसांना असलेले असाधारण असे भावनिक महत्व “,. विद्यार्थीदशेतील दिवस, अडचणीच्या वेळी चव्हाणसाहेबांनी दिलेला मायेचा आधार ,याबद्दल लेखक अतिशय भावुकपणे व्यक्त होतात .
लेखक , प्राध्यापक अशा दोन्ही भूमिकेतून वावरत असणार्या चंद्रकुमार नलगे यांनी सातत्यानी अनेक उपक्रम राबवले “,या सर्व उपक्रमासाठी मा.यशवंतराव चव्हाणसाहेबांचे आशीर्वाद लाभले , चव्हाणसाहेब आवर्जून नलगे यांच्या उपक्रमाना आवर्जून उपस्थित राहिले “,हे दिवस लेखक कसे विसरू शेकन ?
उमेदीच्या धडपडीच्या दिवसात मा.यशवंतराव चव्हाणसाहेबांच्याबद्दल – लेखक म्हणतात..
“साहेबांना धडपडणाऱ्या मुलांबद्दल खूप आत्मीयता होती त्यांना ते कधी विसरत नसत “,
“बलदंड हिमालयाच्या सरंक्षणासाठी धावून जाणारा कणखर सह्याद्री , कृष्णाकाठची अस्सल अस्मिता ,आपल्या महाराष्ट्राचेच काय , भारत देशाचेही भविष्य उज्ज्वल घडावे म्हणून द्रष्टेपण जपणारा थोर शासनकर्ता, समाजनिष्ठ धारणेचा विचारवंत ,उपेक्षितांविषयीव दुर्लाक्षितांबद्द्ल करुणा असणारा माणूस म्हणजे साहेब.
मा.साहेबांचे सगळ्या लहान थोरावर प्रेम होते , विशेषतः स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाईवर तर खूप जीव होता. नवं हेरत ,पारखत ,त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत . तो दीप मालवला नाही, तो प्रत्येकाच्या अंत:करणात तेवत राहिला आहे.
साहेबातील माणूस “ लेखकाने खूप छान शब्दात व्यक्त केला आहे ..
संग्रहाच्या आरंभीचा हा लेख वाचून वाचकांच्या मनात पुढील लेख वाचूया असे वाटणे साहजिक आहे ,याचे कारण ..ओघवत्या शैलीतील या आठवणी नलगे सरांनी खूप आपलेपणाने सांगितल्या आहेत ,आपण एक वाचक न राहता .नलगेसरांच्या परिवारातील एक सदस्य होऊन जातो “.
रवींद्रनाथांच्या साक्षीनं “, या लेखात लेखकाने वाचकांना त्रिपुराची सुंदर सहल घडवली आहे नलगेसर त्यांच्या दादाबद्दल म्हणजे पद्मश्री डी.वाय .पाटील यांचे बद्दल लिहितात –“ त्रिपुराचे राज्यपाल ,एक शिक्षणमहर्षी ,सकळ जनांचे कैवारी ,निगर्वी महंत, असंख्यांची सावली “ ,
अगदी समर्पक शब्दात व्यक्त होणे नलगे सरांना खूप छान जमते “ हे या संग्रहातील सर्वच लेखनात जाणवते , यामुळे हे व्यक्तिचित्रे अधिक ठळकपणे आपल्या समोर आकारून येतात , नलगे सरांच्या लेखनाचे हे एक छान वैशिट्य आहे.
या संग्रहातील लेखनशैली साधारण लेख " अशी नाहीये , प्रत्येक लेख एकाद्या ललित निबंधाची सुरुवात वाटावी अशी आहे, जीवन विषयक तत्वज्ञान , निसर्गवर्णन , कधी गहन-गंभीर वाटावे असे आत्म-निवेदन ", असा आरंभ करून लेखक आपल्या व्यक्तीविषयी व्यक्त होत जातात ..त्यांच्या मनाचे हे उलगडणे वाचकांना खूप भावणारे असेच आहे.
प्रसिध्द साहित्यकार प्राचार्य रा.रं.बोराडे सर यांच्या बद्दलचा लेख " एक मनस्वी स्नेही ",व्यक्ती-रूपातील अनेक पैलूंचे घडणारे हे दर्शन लेखकाने अतिशय स्नेह-भावनेने केले आहे.
लेखक चंद्रकुमार नलगे यांनी स्वतःच्या कथेवर निर्माण केलेला "अंगाई " हा चित्रपट ,त्यानिमित्ताने त्यांना आलेले अनुभव संग्रहातील अनेक लेखातून आलेले आहेतच , या ओघाने असलेला "साधुत्व " हा लेख .. मराठी चित्रपट सृष्टीतील थोर कला-दिग्दर्शक बळीराम बीडकर " , यांच्याबद्दल रसिकांना फारशी माहिती नसेल , पण लेख्कामुळे "बीडकर साहेब" वाचकांच्या पर्यंत पोंचले . "साधुत्व " हा लेख खूप छान झाला आहे.
संग्रहाचे शीर्षक आहे ..सावलीची झाडं ", या संग्रहात एक लेख आहे - सावलीचं झाड ",
कवी-वामन होवाळ ", यांच्याबद्दलचा अतिशय मनस्पर्शी मनोगतून लेखक व्यक्त होतात ."वामनरावांच टवटवीत मन , निरागस अंत:करण, त्यातील असलेला कळवळा माझ्यासारख्या खेड्यातल्या मातीत रमलेल्याला नवा जोश देणारा असतो. त्यांच्या या शुभेच्छांनी पिढ्याच्या पिढ्या घडलेल्या आहेत. मनाचा स्वच्छ नि नितळ माणूस म्हणजे वामन होवाळ ..".सर्वांना आपला वाटणारा माणूस.
सावलीची झाडं " संग्रहातील अन्य व्यक्ती-चित्रांची शीर्षक अशी आहेत..
" रामबापू "(पृ.२१ ), स्वप्न " (३९ ) , "आनंदी आनंद " (पृ.५६ ), दिबा ",(पृ.६६ ), "नाथ पंढरीचा (पृ,७७ ), ""नामा म्हणे ", (पृ.९५ ), "पंत " (पृ.१०३ ), "माझे दादा .(पृ..११५ ),आणि " ज्वाळा " (पृ.१२५ ).
"सावलीची झाडं " हे लेखन स्नेहभावाने ओतप्रत भरलेले असे लेखन आहे , मित्र-जिव्हाळा , पारिवारिक जिव्हाळा , प्रेम, श्रद्धा , विस्वास , जीवनविषय निष्ठा आणि आयुष्यातील चढ-उतार करतांना मनाच्या ठायी असलेली दुर्दम्य इच्छा ",असे अनेक भाव-रंग या लेखनात आहेत ,जरूर वाचावा असा हा संग्रह आही.
लेखक चंद्रकुमार नलगे यांचे साहित्य वाचकप्रिय आहेच ,त्यांच्या या साहित्यकृतीला नेहमीप्रमाणे वाचक भरभरून प्रतिसाद देतीलच . सरांना शुभेच्छा.
मुखपृष्ठ चित्रकार आहेत अविनाश कुंभार , आणि शिवशाहीर राजू राउत यांची रेखाचित्रे या सजावटीने संग्रह आकर्षक झाला आहे.
प्रकाशक दादासाहेब काका जगदाळे यांच्या तेजश्री प्रकाशनने हा संग्रह प्रकाशित केला आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------ ---------------
ले- चंद्रकुमार नलगे
संपर्क- ९८९०४११३२३
------------------------------ ----------------------
सावलीची झाडं
(व्यक्तिचित्रे )
पृ. १३६. मूल्य-रु.१७५ /-
प्रकाशक -
तेजश्री प्रकाशन ,
संपर्क- ८२७५६३८३९६
------------------------------ -------
No comments:
Post a Comment