Friday, March 13, 2020

#संवादिनीकथासंग्रह - परिचय भाग-२

#संवादिनीकथासंग्रह  -परिचय भाग - २ रा
कथा -१.तनुजा समित इनामदार ,२.स्मिता देशपांडे (मनस्मित ),३. नेहा खांदवे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो -
प्रस्तुतच्या संवादिनी कथासंग्रहातील चाळीस कथांचा एक समान -धागा असल्याचे मला जाणवले .. संग्रहातील बहुसंख्य कथा या पारिवारिक चित्रण असलेल्या आहेत.
यातील व्यक्तिरेखा ,त्यांच्यातील नातेबंध , परस्पर - भावना आणि त्यातील जाणीवा , यांचे चित्रण या कथातून लेखक -लेखिकांनी केले आहे .
सामाजिक आणि आर्थिक जीवनस्तर, त्यातील विषमता आणि संघर्ष "या कथातून प्रभावीपणे चित्रित झालेला आहे.
संग्रहातील एकूण ४० कथा पैकी लेखिकांनी लिहिलेल्या २४ कथा आणि १६ कथा- या लेखकांनी लिहिल्या आहेत.
१.
कथा - शीर्षक - अचला ...(पृ.१२५ ).. ले- तनुजा समित इनामदार (मना )- पुणे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजच्या आधुनिक जीवनशैलीत आलेल्या अनेक नव्या प्रव्हात एक चर्चित प्रवाह आहे तो म्हणजे - "लिव्ह -इन - रिलेशनशिप ".
हा विषय अजून तरी सोसायटीतील उच्चभ्रू वर्गापुरता आहे"असे जाणवते . ही सिस्टीम अजून सर्व-सामान्य वर्तुळात आलेली नाही ,
किंवा "आपण असे करायचे का ?" अशा विचारांनी अजून मूळ धरलेले नाहीये.
कॉर्पोरेट विश्व , त्यातील महत्वाकांशी स्त्री आणि पुरुष ", त्यांचे "इगोज ", सतत एकत्र राहण्याने तयार होणारे भावनिक नाते ",यातून
एकमेकांच्या सोबतीची अपरिहार्यता ",याचे स्वरूप म्हणजे ."लिव्ह -इन-रिलेशनशिप " असे म्हणता येईल.
अशा वातावरणात राहणारी माणसे- व्यक्ती यांच्यात भाव-भावना ,नाते-संबंध यातील सखोलपणा "यांचा तसा अभावच असतो ,
कारण बहुतेक करून या व्यक्ती -स्व-केंद्रित असतात , अशा दोन व्यक्ती सहवासात आल्या तरी त्या आपापले "इगोज " कुरवाळीत बसतात .
असे जगता -जगता ते सोबती म्हणून राहू लागतात .. ज्यावेळी त्यांचा "भ्रमनिरास "होतो त्याच वेळी ते वेगळे होऊन जातात..
अशा नात्यात मने जोडली गेलेलीच नसतात ..मग अशा मनाच्या व्यक्तींना दूर होणे "सहज जमते .
या कथेची नायिका -अचला - "लिव्ह -इन-रिलेशन "संकल्पना स्वीकारते . तिच्या आयुष्यात आलेल्या मिलिंदला ती गमावून बसते , तिच्या
आयुष्यात तिचा हा मिलिंद पुन्हा येतो ..त्यावेळी मिलीन्द्चा राग येऊनही अचला पुन्हा त्याला सामावून घेते .
अचालाचे हे भावनिक प्रेम ..तिच्या आणि मिलिंदच्या "लिव्ह -इन-रिलेशनशिपच्या " नात्यात एक गहिरा रंग भरणारे आहे..
लेखिका -तनुजा इनामदार यांनी कथानायीकेच्या - अचलाच्या व्यक्तिरेखेत स्वप्नाळू आणि भावूक्वृत्तीचे रंग छान भरले आहेत
अशा हळव्या -भावूक प्रेमकथा वाचकप्रिय असतात .
२.
कथा -शीर्षक - बायको आणि मैत्रीण ..(पृ..१६२ ), ले- स्मिता देशपांडे (मनस्मित )- पुणे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
शैला आणि शेखर " एकेकाळी नवरा-बायको असलेल्या दोन व्यक्तींची ही कथा आहे. सुशिक्षित असणाऱ्या जोडप्यात भावनिक अपेक्षा ,
त्याने होणारे अपेक्षाभंग , विचारांच्या अभावी होणारे ठाम -गैरसमज " हे फार गंभीर परिणाम करार्या गोष्टी असतात .
असे झाले तर जोडलेली मने -लगेच दुराव्याच्या खाईत लोटली जातात .
वैचारिक अहं , बुद्धीमत्तेचा इगो , रूप-स्वरूपाचा गर्व , व्यक्ती-स्वातंत्र्य या कल्पनेचा सोयीनुसार केलेल्या कल्पना आणि अपेक्षा .
या सर्वातून बाहेर पडण्याचा एकच उपाय योग्य वाटायला लागतो ..तो असतो ."एकमेकापासून कायमचे वेगळे होणे ",.
काहीवेळा नंतर या गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ येते .. पण,काही होऊ शकत नाही ..मग, वियोगाचे दुखः उराशी घेऊन
आयुष्य जगणारी जोडपी आपल्याला दिसून येतात.
बायको आणि मैत्रीण " या स्मिता देशपांडे लिखित कथेत शैला आणि शेखर या जोडप्याच्या असफल वैवाहिक जीवनाची कथा आहे.
विसंवादाचे अचूक चित्रण हे या कथेचे वैशिष्ट्य आहे..
"बायको -ही मैत्रीण होऊ शकत नाही , कारण तिला तसे होता येत नाही , पत्नीच्या नात्याला असलेली मर्यादा सत्य म्हणून स्वीक्रणे
पुरुषाला जडच जाते.
आणि "मैत्रीण - ही बायको "होईलच याची खात्री देतायेत नसते.. हे असे का ?
उत्तर नसलेला हा प्रश्न "बायको आणि मैत्रीण "या कथेत अस्फुटपणे जाणवतो.
लेखिका स्मिता देशपांडे यांच्या लेखनातील सहजता छान आहे.
३.
कथा - शीर्षक - दगड ..(पृ.१६९ )..ले- नेहा खांदवे -पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
तरुणाईच्या तारुण्य-सुलभ जगण्याला प्रेमभावनेचा स्पर्श होणे ",हे नैसर्गिक भावनेचे लक्षण असते . अशा प्रेम-भावनेचा स्पर्श झालेल्या
मनाचा एक प्रोब्लेम असतो तो म्हणजे - कधी कधी एखाद्या मनातले प्रेम हे अखेर पर्यंत अव्यक्तच राहून जाते ",
अशा अव्यक्त राहिलेल्या प्रेमाच्या वाट्याला कसे दुक्ख येते, किती यातना सहन कराव्या लागतात ". ?
आशिष आणि शरयू यांही कथा अव्यक्त राहिलेल्या प्रेमाची आहे . कथा-नायक आशिष .शरयू वर एकतर्फी प्रेम करणारा आहे.
भावनिक प्रेमाच्या आहारी जाऊन हा भावूक प्रेमवीर स्वताच्याच दुनियेत राहून शारायुवर प्रेम करतो .
या आशिषला वास्तवात मात्र ..शरयू वर त्याचे प्रेम आहे " हे सांगण्याचे धाडस सुद्धा झालेले नाही . आपले प्रेम व्यक्त करायचे तो
कितीदा तरी मनोमन ठरवतो आणि प्रत्यक्षात व्यक्त करण्याचे रहित करतो ..त्याची कारणे ..त्याचे समर्थन तोच करून मोकळा होतो..
परिणामी ..आपण असफल प्रेमी आहोत अशी त्याची धारणा होते . पराभूत मनोवृत्तीचा आशिष शरयूवर दगड भिरकावतो ,
त्यात ही गंमत म्हणजे तो दगड .शारायुला न लागता ..तिच्या गालाला स्पर्शून खाली पडतो ",
शरयुचा स्पर्श झालेल्या दगडाला आशिष म्हणतो ..सात वर्षात मला जे जमले नाही ,ते तुला क्षणात जमले ..मी दगड का झालो नाही ?
भाबड्या मनोवृत्तीच्या आशिषची असफल प्रेम कहाणी लक्षात राहते ती .आशिष या व्यक्तिरेखेमुळेच.
भावनिक लेखन करणे लेखिका नेहा खांदवे यांना छान जमते ..हे या कथेवरून जाणवते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रसिक -वाचक मित्र हो , कुबेर प्रकाशनच्या- या नवीन कथा संग्रहाचा परिचय वाचून इतर कथा वाचण्यासाठी आपण
संवादिनी "हा कथा संग्रह जरूर घ्यावा
संग्रहातील कथांच्या बद्दल काही निरीक्षणपर मत नोंदवतो आहे -
या कथा शब्द संख्या -मर्यादेने फार मोठ्या नाहीत .
कथेच्या शिर्षकानुसार कथा साकारल्या आहेत .त्यामुळे कथा भरकटलेली नाही ",हे महत्वाचे आहे.
कथा लेखनाचे तंत्र आणि मंत्र " काटेकोरपणे सांभाळून कथा लेखन करणे हे सोपे नसते , ,संवादिनी "मधील कथा , कथा -लेखन -तंत्राची
फार तोडमोड करणाऱ्या नाहीयेत ",
या सर्व कथा आटोपशीर आणि वाचनीय झाल्या आहेत हे नक्की.
संवादिनी "मधील कथेतील व्यक्तिरेखा ठळकपणे आपल्या समोर येतात ..या व्यक्ती ..आपल्याला परक्या न वाटता .आपल्यातीलच वाटतात .
कथा-लेखकांच्या लेखनातील सहजता ",व सफाईदारपणा यामुळे या सर्व कथा वाचक सलगपणे वाचू शकतो ",हे या लेखनाचे यश आहे.
रसिक -वाचक मित्र हो , कुबेर प्रकाशनच्या- या नवीन कथा संग्रहाचा परिचय वाचून इतर कथा वाचण्यासाठी आपण
संवादिनी "हा कथा संग्रह जरूर घ्यावा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी -
कथा -संग्रह
पृ.१९६ , मूल्य- रु.२५०/-
प्रकाशक -
कुबेर प्रकाशन
संतोष जगन्नाथ लहामगे,
संगमनेर
संपर्क - ९९२२१११६६६
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग- ३ - लवकरच ....

#संवादिनीकथासंग्रह - भाग-१ ला

पुस्तकपरिचय - भाग - १
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
--------------------------------------
#संवादिनीकथासंग्रह - परिचय भाग- १ला
------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो -
आज दि.१६-०२-२०२० - रविवार - लुम्बिनी गार्डन -येरवडा येथे आपल्या कुबेर समूहाचा - कुबेर -साहित्यिक कट्टा -पुणे.
हा उपक्रम संपन्न होतो आहे
आजच्या या कार्यक्रमात माझा सहभाग मी "पुस्तक-परिचय " लेख स्वरूपात सदर करीत आहे
कुबेर समूहाच्या -कुबेर प्रकाशन विभागाच्या वतीने प्रकाशक श्री..संतोष जगन्नाथ लहामगे यांनी प्रकाशित
केलेल्या कुबेर समूहाच्या .संवादिनी - या दुसऱ्या कथासंग्रहाचा - परिचय करून देतांना
त्यातील काही निवडक कथांवर माझे अभिप्राय-मनोगत व्यक्त करणार आहे.
मित्र हो - या निमित्ताने कुबेर -समूह आणि त्यातील उपक्रमाबद्दल थोडेसे सांगणे योग्य होईल -
आभासी म्हणवल्या जाणाऱ्या फेसबुक जगतातच नव्हे तर प्रत्यक्ष्य सार्वजनिक जीवनात आपल्या अनेक सामाजिक उपक्रमामुळे सर्वांना परिचित
असलेल्या कुबेर -समूह , आणि कुबेर फौंडेशन " या नावांना आता नामांकित वलय नक्कीच प्राप्त झालेले आहे.
समूह संस्थापाक श्री.संतोष
जगन्नाथ लहामगे यांच्या संकल्पना नुसार कुबेर समूहाच्या माध्यमातून ,कुबेरकर सभासदांचे
सामाजिक कार्य सर्वोतोदूर सातत्याने चालू असते.
कुबेर समुहात फक्त सामाजिक कार्य-उपक्रमच चालू असतात असे मात्र नाही .या अशा उपक्रमा बरोबरच
"कुबेर -समुहात साहित्य-कला -संकृती - संगीत -आध्यात्मिक - योगसाधना - पारिवारिक - अशा विविध विषयावर कुबेरकर
व्यक्त होत असतात .
तर अशा कुबेर -समूहातील लेखक-कवी सभासदांसाठी कुबेर विविध साहित्य-विषयक लेखन उपक्रमांचे आयोजन केले जाते.
समूहाच्या साहित्यिक- कट्टा "या उपक्रमातून कुबेरकर साहित्यिक आपल्या साहित्याचे सादरीकरण करीत असतात .
कुबेर समुहाने ..कुबेर दिवाळी अंक २०१७ साली सुरु केला ,२०१८ आणि २०१९ ,अशी सलग तीन वर्षे
कुबेर दिवाळी अंकास उत्कृष्ट दिवाळी अंक " पुरस्कार प्राप्त झाले आहेत./ होत आहेत .
दिवाळी अंका पाठोपाठ ..कुबेर प्रकाशन सुरु झाले ..आरंभ " या कथासंग्रहापासून या उपक्रमाचा आरंभ झाला .
या यशानंतर कुबेर प्रकाशनाने
कुबेर समुहातील कथा-लेखकांच्या निवडक कथांचा संग्रह - संवादिनी " नुकताच प्रकाशित केला आहे.
समुहातील कथालेखकांचा एक विशेष ", इथे सांगणे महत्वाचे ठरेल ते म्हणजे ..
हे सगळे लेखक साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक असलेले आहेत.त्यांचे स्वतःचे स्वतन्त्र असे विपुल साहित्य पुस्तकरूपाने अगोदरच प्रसिध्द झाले आहे
एका अर्थाने संवादिनी "हा प्रथितयश कुबेरकर कथा-लेखकांचा "प्रातिनिधिक कथा -संग्रह आहे ".
कुबेर समूहाच्या -संगमनेर येथे झालेल्या वार्षिक -स्नेह संमेलनात -दि.०५ जानेवारी -२०२० रोजी "संवादिनी "या कथा संग्रहाचे प्रकाशन झाले .
प्रस्तुतच्या संवादिनी कथासंग्रहातील चाळीस कथांचा एक समान -धागा असल्याचे मला जाणवले .. संग्रहातील बहुसंख्य कथा या पारिवारिक चित्रण असलेल्या आहेत.
यातील व्यक्तिरेखा ,त्यांच्यातील नातेबंध , परस्पर - भावना आणि त्यातील जाणीवा , यांचे चित्रण या कथातून लेखक -लेखिकांनी केले आहे .
सामाजिक आणि आर्थिक जीवनस्तर, त्यातील विषमता आणि संघर्ष "या कथातून प्रभावीपणे चित्रित झालेला आहे.
संग्रहातील एकूण ४० कथा पैकी लेखिकांनी लिहिलेल्या २४ कथा आणि १६ कथा- या लेखकांनी लिहिल्या आहेत.
संग्रहातील कथांच्या बद्दल काही निरीक्षणपर मत नोंदवतो आहे -
------------------------------------------------------------------------
या कथा शब्द संख्या -मर्यादेने फार मोठ्या नाहीत .
कथेच्या शिर्षकानुसार कथा साकारल्या आहेत .त्यामुळे कथा भरकटलेली नाही ",हे महत्वाचे आहे.
कथा लेखनाचे तंत्र आणि मंत्र " काटेकोरपणे सांभाळून कथा लेखन करणे हे सोपे नसते , ,संवादिनी "मधील कथा , कथा -लेखन -तंत्राची
फार तोडमोड करणाऱ्या नाहीयेत ",
या सर्व कथा आटोपशीर आणि वाचनीय झाल्या आहेत हे नक्की.
कथा लेखकांनी .कथेतील आशयाची नेटकी मांडणी करीत ,कथेतील व्यक्तिरेखांच्या भावना वाचकांच्या मनापर्यंत पोचविल्या आहेत ,
वरील विवेचनावरून हे कथालेखन छान जमून आलेले आहे "असे म्हणता येईल."
संवादिनी "मधील कथेतील व्यक्तिरेखा ठळकपणे आपल्या समोर येतात ..या व्यक्ती ..आपल्याला परक्या न वाटता .आपल्यातीलच वाटतात .
कथा-लेखकांच्या लेखनातील सहजता ",व सफाईदारपणा यामुळे या सर्व कथा वाचक सलगपणे वाचू शकतो ",हे या लेखनाचे यश आहे.
आज मी या संग्रहातील सहा कथा- लेखकांच्या कथा बद्दल सांगतो आहे
.. हे सहा लेखक आपल्या सोबत आजच्या साहित्यिक कट्टा "उपक्रमात सहभागी झालेले आहेत..
आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो.
१. संग्रहाच्या अनुक्रमणिकेत क्रमांक -३ वर असलेली कथा -शीर्षक - "वटपौर्णिमा (पृ.२० )-ले- लक्ष्मीकांत रांजणे ..
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या कथेतील "पांडू आणि बायडी ", या जोडप्याच्या संसारिक अवस्थेचे चित्रण लेखकाने अतिशय सुरेखपणे केले आहे. वरकरणी त्रयस्थपणाने पाहणार्यांना
नवरा-बायकोची ही जोडी ",त्यांच्यातील नाते विसंवादी आहे असेच वाटते . अगदी परस्पर -विरोधी मानसिकता असलेले हे जोडपे आहे., सामन्य परिस्थितीचे
आयुष्य आणि त्यातील जगणे या नवरा-बायकोच्या वाट्याला आलेले आहे..
पांडू आणि बायडी " या दोन विसंगत व्यक्तींना लग्नाच्या बंधनाने एकत्र आणले आहे . लग्न, विवाह ,आणि वैवाहिक जीवन " या संस्काराबद्दल लेखक -
लक्ष्मीकांत रांजणे ' यांनी मौलिक असे चिंतनपर विचार व्यक्त केले आहेत ..ते म्हणतात ..
" नवरा-बायकोच्या भांडणाच्या मुळाशी "खोलवर एक प्रेमाचा धागा गुंतलेला असतो ", आणि हाच धागा दोघांना घट्ट बांधून ठेवतो.
कथानायिका - बायडीच्या मनात ..वटपौर्णिमा "या सणाच्या दिवशी आपला नवरा -पांडू " एक दारुडा आहे ", ही भावना अजिबात येत नाही ,
त्याचे कारण - नवरा-बायकोच्या नात्यात असलेला .हा प्रेमाचा घट्ट धागा ", त्यामुळे आपल्या दारुड्या नवऱ्याशी -पांडुशी त्याची बायको-बायडी "हिचे वागणे
तडजोड वाटत नाही .
बायडीच्या अशा वागण्याचे समर्थन लेखकाने मनाला भिडणाऱ्या शब्दात केले आहे,
ते असे ....
"तडजोड हा विजय नाही - की - तो पराभवपण नसतो ", तो असतो माणसातील सोशिकतेचा विजय".
वटपौर्णिमा "या कथेची नायिका बायडी ", ही व्यक्तिरेखा या छोट्याशा कथेला एका वेगळ्या उंचीचे परिमाण देणारी आहे.
२.कथा -शीर्षक - भिन्न ..की अभिन्न ? (पृ.५८ )- ले- वैशाली फाटक -काटकर
------------------------------------------------------------------------------------------------------------
या कथेत दोन व्यक्तिरेखा - निकिता आणि रंजना यांची ही कथा आहे. सुखसंपन्न आयुष्य जगणाऱ्या निकिता मैडम,आणि अभावग्रस्त आयुष्य
जगावे लागणारी रंजना .
वरकरणी या दोन व्यक्तिरेखा जशा दिसतात , आतून मात्र त्या तशा नाहीत . दोघीही निराशा आणि वैफल्याने ग्रस्त झालेले
मन सोबत घेऊन जगत आहेत . पण दोघींच्या सारख्या भावना ..त्याची कारणे वेगळी आहेत ..ही कारणे म्हणजे या कथेचा विषय आहे.
विपरीत परिस्थितीवर मात करून आपली जगण्याची लढाई रंजना आनंदाने लढते आहे ", आणि निकिता मैडमला रंजनाच्या अशाच स्वभावाचा हेवा
वाटायला लागतो . कारण मैडमच्या वैभवसंपन्न आयुष्याला -त्यातील जगण्याला "एक कमीपणाची झालर आहे ", ही खंत खूप वेदनादायक आहे ,
या भावनेमुळे मैडमना रंजनाच्या संसाराबद्दल असूया वाटू लागते , तिच्या मनाबद्दल आपल्या मनात हेवा-मत्सर "या भावना जागृत होतात ",याची जाणीव
निकितामैडमना अधिकच व्यथित करून टाकते .
स्वतःच्या सुरक्षित दिसणार्या जीवनातील "असुरक्षिता त्यांच्या मनाला अधिकच एकाकी बनवणारी आहे ",आणि ही जाणीव निकिताच्या मनाला खूपच
बोचरी आणि दुखदायी वाटणारी आहे.
हे कथा -दोन स्त्रियांची आहे यातील निकिता -यांच्याकडे सगळं असूनही ,हातात मात्र काहीच नाहीये ,आणि..
खूप काही नाही हे जाणवून देखील ..आहे त्यात आनंद मानीत ,मोठ्या हिम्मतीने जगणारी , न मोडणारी - न वाकणारी रंजना ",
ही रंजना "या कथेची लक्षवेधी नायिका ठरावी.
अशा या दोन व्यक्तिरेखा ठळकपणे वाचकांच्या मनात नक्कीच साकारून येतात .
लेखिका -वैशाली फाटक -काटकर यांची लेखनशैली कथेला रोचक बनवणारी आहे.
३.
कथा - शीर्षक - "सुटका "..(पृ..१२० ).ले- प्रल्हाद दुधाळ
---------------------------------------------------------------------------------------------------------
उत्तम लेखक म्हणून प्रसिध्द असलेली प्रल्हाद दुधाळ यांचे ललित लेखन संग्रहरूपाने प्रसिध्द आहेच. या लेखकाचे कथालेखन ही
प्रवाही आणि ओघवत्या शैलीतले आहे.
संग्रहातील त्यांची कथा सुटका - कथानायिका लता ", तिच्या आयुष्यात झालेल्या लग्नरूपी फसवणुकीमुळे तिला सोसाव्या लागलेल्या वेदनांची
करूण- कहाणी आहे.
आजकाल विवाह जुळणे , लग्न-जमणे या गोष्टी online -विवाह जमवून देणाऱ्या संस्थामुळे ,वेबसाईट मुळे सोपे झाले आहे .
या माध्यमातून
कशी फसवणूक होऊ शकते याची ही कथा आहे.
एका अर्थाने " एका महत्वाच्या सामाजिक गरजेच्या समस्येवर ही कथा भाष्य करते आहे ..ही समस्या येत्या काळात उग्र स्वरूपातील भीषण असे
संकट ठरू शकते ",असे सूचक कथानक "सुटका " या कथेतून लेखक प्रल्हाद दुधाळ यांनी मांडलेले आहे.
कौटुंबिक जीवनात भावनिक वातावरण , परस्परतील विस्वास , संकटकाळी असणारे आधाराची माणसे "या सर्व गोष्टी किती मोलाचे असतात ",
या कथेतून लेखकाने फार सुरेखपणे चित्रित केले आहे .
लतावरील संकाटात ..तिच्या सोबत असणाऱ्या इतर व्यक्तिरेखा म्हणूनच कथा -
नायिके इतक्याच महत्वाच्या ठरतात.
लताच्या मानेवरचे ओझे उतरवणे , या जोखडातून तिची मुक्तता होणे " हीच तिची "सुटका " आहे हे या कथेतून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे.
रसिक -वाचक मित्र हो , कुबेर प्रकाशनच्या- या नवीन कथा संग्रहाचा परिचय वाचून इतर कथा वाचण्यासाठी आपण
संवादिनी "हा कथा संग्रह जरूर घ्यावा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी -
कथा -संग्रह
पृ.१९६ , मूल्य- रु.२५०/-
प्रकाशक -
कुबेर प्रकाशन
संतोष जगन्नाथ लहामगे,
संगमनेर
संपर्क - ९९२२१११६६६
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग-२ रा लवकरच ....

Saturday, January 4, 2020

पुस्तक-परिचय लेख- ललित लेख संग्रह - कवडसे सोनेरी ...अंतरीचे !

पुस्तक-परिचय लेख- 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------
भावविश्व संपन्न करणारे लेखन - " 
ललित लेख संग्रह - 
कवडसे सोनेरी ..अंतरीचे  ! -
------------------------------------------------------------------------------------------
प्रसन्नचित्त करून टाकणारे लेखन -वाचनास मिळणे " वाचकांसाठी हा नक्कीच  एक खूप वाचन-आनंद योग असतो .ललित लेखनात हे सामर्थ्य 
असते ", याची अनुभूती एक वाचक म्हणून मी नुकतीच अनुभवली ..
या  ललित लेखसंग्रहाचे नाव आहे  "कवडसे सोनेरी ..अंतरीचे  ! याचे लेखक आहेत   लेखक-कवी -विस्वास देशपांडे . त्यांचे हे पहिलेच पुस्तक .
.
लेखकाविषयी  अधिक सांगावेसे  वाटते की -
चाळीसगाव येथील - आ.बं. हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते .कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी इंग्रीजीचे अध्यापन केले .
 "आदर्श शिक्षक " पुरस्काराने  सन्मानित  विस्वास विष्णू देशपांडे - म्हणजे  एक विद्यार्थीप्रिय शिक्षक " ही त्यांची खरी ओळख आहे .
इंटरनेटवर म्हणजेच .. फेसबुक आणि त्यावरील  विविध साहित्यिक समूह या सोशल माध्यमावर सुद्धा देशपांडेसर सात्याने विपुल लेखन  करीत असतात .
"प्रभातपुष्प ," "विचारप्रभात " ,संवादिनी " या त्यांच्या काही लोकप्रिय लेखमाला आहेत.

वाचन, लेखन, प्रवास आणि संगीत हे विश्वास देशपांडेसरांचे आवडते छंद आहेत . त्यांच्या या छंदास आणि आवडीस .त्यांच्यातील .अभ्यासपूर्ण ,चिंतनशील 
आणि सहजतेने काही  चांगले  सांगावे  अशी आंतरिक तळमळ असणार्या  हितचिंतक -शिक्षकाची साथ लाभली आहे .
नेमक्या या विशेष गुणांमुळे ..या लेखनातून एक व्यासंगी जेष्ठ मार्गदर्शक संवाद साधतो आहे असे जाणवत राहते .

काही वेळा आपण असे म्हणतो की ..लेखक आणि त्याचे लेखन ..खूप नशीबवान असते .ज्या पुस्तकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले असते ,ते पुस्तक ,
त्यातील लेखन अल्पावधीतच वाचकप्रिय ठरते ", देशपांडेसरांच्या या संग्रहाबद्दल अगदी असेच म्हणावेसे वाटते . सगळीच भट्टी मस्तपैकी 
जमून आलेली आहे . १६७ पृष्ठांच्या या ललित लेख संग्रहात ..५४ लेख आहेत ..एका पेक्षा एक असे सरस लेख आहेत.

या संग्रहास प्रस्तावना दिली आहे  ..प्रा.प्रवीण दवणे यांनी .  जे स्वतःच एक उत्तम ललित लेखनकार आहेत,  लेखक विश्वास देशपांडे यांच्या 
ललित लेखनाबद्दल लिहितांना त्यांनी  जे विचार व्यक्त केले आहेत ..त्यातून ललित लेखन "या लेखन-प्रकाराबाद्ल आपल्याला माहिती होते आणि 
लेखक विश्वास देशपांडे यांच्या या  लेखनाचे  व्यापक असे साहित्यिक स्वरूप आणि त्यातील सौंदर्य उलगडले आहे.
प्रा.दवणे सर म्हणतात..
"अंतरीचे हे सोनकवडसे ..एकाएकी प्रगट झालेले नाहीत . त्यामागे तीन तपांचे जीवनचिंतन आहे. अध्यापनाच्या व्यवसायाने दिलेले मनन आणि त्या आधी 
निरीक्षणाची शिदोरी आहे. जगण्या बद्दलचा  सकारात्मक दृष्टीकोन व विश्वास हाहि विश्वास देशपांडे यांच्या प्रस्तुत लेखनाचा  विशेष आहे. मनाला उभारी देणाऱ्या 
प्रकाशात्म्क  लेखांमुळे या ग्रंथाला समुपदेशात्मक लेखनाचं वेगळ मूल्य प्राप्त झालं आहे . हे सोनेरी कवडसे जीवनातील शाश्वत मुल्यांकडे घेऊन जातात ,
हे मला महत्वाचे वाटते. "

या लेखनाचा एक वाचक म्हणून मला काय वाटले - तर ,
मी माझ्या शाळेत असतानंचे दिवसच मला पुन्हा या पुस्तकाच्या निमित्ताने आठवले ..कारण ..एखाद्या दिवशी वर्गावर एखाद्या तासाला नियमित शिक्षक येऊ शकले नाही 
की तो तास साक्षात हेड-सर घेत असत .आणि त्या तासात जे काही कानावर पडायचे ",ते कायमचे मनात साठवले जायचे ", .
अग्दी तसेच मी हे लेख वाचत असतांना अनुभवले ..कारण लेखक - विश्वास देशपांडे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते ",  मुख्य म्हणजे हेड-सर होते "
या पुस्तकातील एकेक लेख म्हणजेच या हेड - सरांनी घेतलेला तास आहे ", आणि  वाचक सहजपणे या सरांचा विदार्थी होऊन जातो.

असे विलक्षण आणि वेगळे असे काय आहे या लेखनात ?
सहजता आहे, आत्मिक -जवळीक साधणारे हितगुज आहे, मोठ्या व्याक्तीमात्वाब्द्द्ल व्यक्त होतांना आदरभाव कसा असावा याचे उदाहरण आहे. सामन्य व्यक्ती असो 
वा असामन्य व्यक्तिमत्व असो ..दोन्हीबद्दल अंत:करणपूर्वक जपलेली कृतज्ञता आहे, जी व्यक्त करतांना या लेखनातून आदर्श -व्यक्तिमत्व साकारले गेले  आहेत..


लेखक विश्वास देशपांडे ..स्वतःच्या लेखनाबद्दल म्हणतात -
आशावादी आणि सकारात्मक विचात ठेवून जीवनाला आनंदाने सामोरे जायचे असते . माझ्या या सगळ्या लेखांमध्ये असाच प्रकारची सकारात्मकता ,आशावाद आपल्याला 
आढळेल . निरासेचा ,दु:खाचा स्वर आढळणार नाही ".
सरांच्या या मनोगतातून एक स्पष्ट झाले आहे की.. जीवनात शोधायचा तो आनंद , यश, कार्यपूर्तीचा आनंद , स्वप्नपूर्तीचा आनंद, कठोर परिश्रमांना मिळालेले रसाळ फल ,
हे सगळ वाट्याला केव्हा येतं ? , त्याच्याच यशोगाथा म्हणता येतील असे अनेक लेख या संग्रहात आहेत.

हे सर्व लेख अगदी नेटके आणि सुबक आकाराचे आहेत. त्यातील विषयाला अन्रुरूप असे शीर्षक ,आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी सांगतांना जी आस्था असते , त्या आस्थेतुंच 
लेखक पूरक माहिती देतो , आणि त्या माहितीचा आपल्या मनावर सकरात्मक परिणाम होईल .असे चिंतनपर भाष्य करून लेखाचा शेवट करतो..
खरेच ..हे सर्व परिणामकारक असे लेखन आहे.
साहित्य , संस्कृती , लोककला , संगीत , समाजिक पर्यावरण , व्यक्ती-विशेष ..यात सर्व क्षेत्रातील अलौकिक ,असामन्य , थोर ,कीर्तिवंत आणि लोकप्रिय व्यक्तींबद्दल "
असे लेख आहेत .. ही अशी विविधता म्हणजे लेखकाच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवणारे आहे.

लेखन मजकूर -  उदाहरणे देणे म्हणजे.. पुस्तकाचे वाचन अगोदरच केल्या सारखे होईल ,कारण तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचावे असे आहे .म्हणून या ठिकाणी मी 
काही लेखांची शीर्षके - आपल्याला सांगतो..
स्वप्न साकारले " (पृ..१६ ), "सोशल मिडीया : एक दुधारी शस्त्र  (पृ.२५ ), 
एक अवलिया गायक - किशोर कुमार (पृ..४१ ) , " लाईफ इज ब्युटीफुल  (पृ..४६ ), "विंदा : कवीमनाचा माणूस  (पृ,५२ ), , "एक दुजे के लिये - (पृ.६४ ),
"बापमाणूस - (पृ,७६ ), " रहस्य गीतारहस्यच  - (पृ,८२ ), "मन प्रसन्न करणारी गाणी ..(पृ.९० ), " आपल्या मुलांचे पालक व्हा ..मालक नको  (पृ. १०२ ),
गदिमा आणि गीतरामायण  ", (पृ..१०६ ), तरुणांनी ज्ञानेश्वरी का वाचावी ? (पृ.१३४ ),  गानसरस्वती  "(पृ..१४८ ), गानसम्राज्ञी  (पृ..१५८ ).

विश्वास देशपांडेसर, तुमच्या या लेखनाने खूप आनंद दिलाय , तुमच्या आगामी पुस्तकाची प्रतीक्षा आहे, त्यासाठी शुभेच्छा .

कवडसे सोनेरी ..अंतरीचे  !, संग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ करणाऱ्या कलावंत  चैताली नाचणेकर यांच्या कामगिरीचे खूप खूप कौतुक केले पाहिजे .

पुण्याच्या विश्वकर्मा पब्लिकेशन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  पुस्तक-परिचय लेख- 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------

ललित लेख संग्रह - 
कवडसे सोनेरी ..अंतरीचे  ! -
पृ -१६७ , मूल्य-रु.२२५ /-
ले- विश्वास देशपांडे 
संपर्क -९३७३७११७१८ 
------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे.
संपर्क - ९१६८६८२२०० 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक -परिचय - कविता-संग्रह - "दिती "

पुस्तक-परिचय लेख - 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------
निसर्ग आणि माणूस यांच्यातील भावबंधांचे इंद्रधनुष्य...!
कविता -संग्रह -
 दिती - 
-जयश्री दाणी
----------------------------------------------------------------

कवयित्री म्हणून जयश्री दाणी इंटरनेटवर आणि प्रिंट मिडिया मधून सातत्याने साहित्य - लेखन करीत असतात .
त्यांच्या काव्यलेखनाचा अविष्कार वाचक-मित्र गेल्या अनेक वर्षा पासून पाहत आहेत , त्यांच्या लेखनास आणि  कवितांना खूप  प्रतिसाद मिळत असतो, हे 
कवयित्री -साठी खूप प्रेरक असेच आहे.

नागपूरस्थित लेखिका -कवयित्री जयश्री दाणी हे नाव सर्वपरिचित आहे .आपल्या लेखनाने त्यांनी स्वताचा असा एक वाचक परिवार 
 निर्माण केला आहे . या परिवारातील मी देखील एक वाचक-सदस्य आहे.
 "पहिला कविता -संग्रह " असा विशेष उल्लेख करून ..त्यांच्या "दिती " या कविता संग्रह बद्दल अभिप्राय देणे "एक,
आनंददायी असे आस्वादक -कार्य आहे .
 .दिती " कविता -संग्रहात  एकूण नव्वद (९०) कविता आहेत.. अभंग- ओवी , हायकू , मुक्तछंद "या प्रकारातील  या रचना आहेत.
यातील बहुसंख्य रचना छोट्या-मोठ्या अशा ही आहेत . प्रकार कितीही आणि कोणते ही असो..
या कवितेतला  " माणूस,आणि  निसर्ग , यांच्यातील  भावबंध थेट मनाला भिडणारे आहेत.

 या बद्दलची ही अगदी समर्पक ओळ- म्हणजे या 
कवयित्रीचे मनोगतच आहे -
"जितकी जखम खोल 
तितकी कवितेत ओल "

मग ,या जखमा कशाच्या आहेत ? जखमा कुणी दिल्या, कुणी केल्या या जखमा .. याचे उत्तर संग्रहातील कवितेतून मिळते, जे मनाला चटका 
लावणारे असेच आहे. कवी-मनाचे जे विशेष आपल्याला जाणवत असतात ..ते  जयश्री दाणी यांच्या कवी-मनात आहेत. निसर्ग , प्रेम, स्त्री -जीवन,
समाज आणि आपण , त्याने व्यापलेला आपला अवकाश , त्यातील भले-बुरे असे खूप काही ,या बद्दल कवयित्री अतिशय भावूक,होऊन लिहिते, व्यथित 
मनाने लिहिते ..हे जाणवते , सामाजिक भान ,खोलवर रुजलेली एक सर्व-समावेशक जाणीव ..यातून  व्यक्त होतांना दिसते.
यात भर घालून मला एक जरूर सांगावेसे  वाटते ..की -

माणूस वरवर कसा असतो ,
हे महत्वाचे नाही ,
जर - तो कवी असेल तर, 
आतून खूप खोल खोल असतो ",

कवयित्री -जयश्री दाणी यांच्यासाठी या ओळी अगदी समर्पक आहेत..

आपले जगणे .आपण शब्दातून व्यक्त करतो ,याचे माध्यम कविता असेल तर.. हे सगळे सांगणे .ज्या शब्दातून येते ..ते खूपच अर्थ-वाही "
असावे लागतात ",आणि शब्दांचे हे प्रव्हीपण ", जयश्री दाणी यांच्या कवितांचे एक ठळक विशेष  आहे.

मौन असलेल्या मनात ही एक संवाद सुरु असतो .हा शोध असतो .आपल्या सभोवतालचा .कवीची .अशीच अवस्था आहे..

" मौनाच्या सुरावटीवर हळूच 
कोण सोडून जाई थेंब हळवा
दुखर्या भागातही सर सरे 
उमलतांना थांबलेला फुलवा ... ( कविता ..पृ..८९ ),

कवयित्री जयश्री दाणी.सतत माणसाच्या सुख-दुखा बद्दल विचार करतात , माणूस आणि निसर्ग हा या कवितांचा "चिंतन-विषय आहे ",
त्या सतत ..कानोसा " घेत असतात ..तो असा ..
"कशाच्या मोहाने 
काय  ठेवलेय 
पहा , यातनांना
पंख फुटलेय...... ( कानोसा ..पृ.२० )..,

कळाहीन आयुष्य वाट्याला आल्याची खंत , या कवितेतून येते ..
"शब्दहीन काळा आली 
त्या फुलाच्या झुडुपाला 
साव्लीचेच वावडे 
न सरणार्या उन्हाला  ... ( उन्हाला..पृ..२४ ),

अबोध असे रम्य-बालपण ,शैशव ही अवस्था आपण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आठवतो, प्रत्येकाला आपल्यातले "एक मूल "
खुणावत असते .. काय होतं अशा वेळी,, त्याची ही कविता ..

" प्रत्येकजण झोपतांना 
लहान तान्हं मूल होतं 
आठवणीच्या पारावर 
काळ पांढरं ss  धावतं .... ( तान्हं मूल..पृ...३२ ), 

अशी अवस्था ,जी पुन्हा  न परतणारी आहे  ,काय करावे अशा वेळी ? तर.. मनाची अवस्था "एकल मग्न " व्हावी ..

"या एकल मग्न दिशेत 
लाज कापरा सुवास 
माळून गेली कधीचीच 
गोंडस गुलाबी आस ...... ( एकालमग्न ...पृ..३६ ),,

माणसाच्या चेहेर्यावर जे दिसत नाही , ते डोळ्यात दिसते ..या बद्दलची ही कविता खूप छान आहे.

"डोळे बोले काहीबाही 
जैसा पाउस निर्मोही 

डोळ्यात करुण श्लोक 
दुखा;त आनंदलोक  .. (डोळ्यात ..पृ..८६ ), 

उडते पक्षी " या कवितेतील .पक्षी..म्हणजे आजचा आपल्यातील बदलून गेलेला माणूस नाही ना ?
या बद्दल कवित्रीला प्रश्न पडतो .तो खूप अंतर्मुख करून जातो..

एकही पान नसलेल्या 
वाळक्या उंच काळ्या कथ्या
झाडावर 
संयान्काली जेव्हा असंख्य 
काळे पक्षी जमत असतील 
तेव्हा काय नेमके बोलत असतील ? (..उडते पक्षी ..पृ..७२ ),,

कवयित्रीच्या कविता लेखनाचे विषय .निसर्ग आणि माणूस हा आहे, यातील एकरूपता किती विलक्षण आहे, हे सांगणाऱ्या कविता
बोलक्या आहेत.. निसर्ग-चक्र , ऋतू-चक्र , दिन- चक्र ..,पाउस, ऊन, पहात, दुपार , संध्याकाळ , रात्र , उजेड, प्रकाश , अंधार ,
चांदणे .. या भवती आपल्या आयुष्याचे  रहाटगाडगे " कसे फिरत असते ..याची अनुभूती देणाऱ्या कविता संग्रहाच्या मौलीक्तेत भर घालतात.
काही शीर्षके -
ऋतू "(पृ.२५ ",)  "वसंतखुणा  (पृ.२८ ) , "आभाळ "(पृ.४४ ), सांजफुल (पृ.४५ ), आकाशरंग (पृ.५१ ), " पिवळ्या फुलांची गल्ली (पृ.५३ ),
संध्यामग्न  (पृ.५७ ), , "झाड,' (पृ, ६४ ), मुलींचा गुच्छ " (पृ,६६ ), बर्फाळलेली  दुपार (६९ ),  "दिवे लागण ( पृ.७३ ),, नभी चांदणे वाजले "(पृ.८८),

काही संवादी कवितेतून  आणि काही अतिशय मोजक्या ओळीतून ,..या कविता आपल्याशी भावूक ,हळवे मनोगत व्यक्त करतात ,
कवयित्री- जयश्री दाणी यांच्या सहज लेखन - शैलीचे कौतुक केले पाहिजे . भावनिक गुंता किती कठीण आणि किचकट असतो , याची कल्पना 
आपल्या सगळ्यांना आहे, अशा विषयावर असे सहजपणे लिहिणे , ते योग्य शब्दात मांडणे सोपे मुळीच नसते , असे असल्यामुळे ,
कवयित्री- जयश्री दाणी यांच्या सहज लेखन - शैलीचे कौतुक केले पाहिजे   .
"दिती " कविता संग्रह त्यांचा पहिला कविता संग्रह आहे, या पुढे त्यांच्या भाव-कवितांचे असेच सुरेख संग्रह येत राहोत या शुभेच्छा देतो.

या संग्रहात - कविते सोबत रेखाटने आहेत त्याचे चित्रकार आहेत.अमरावतीचे कलावंत - उद्धव शहाणे .
नागपूरच्या व्ही.कांचन .यांनी संग्रहाचे अनुरूप असे मुखपृष्ठ केले आहे 
या दोन्ही कलाकारांचे अभिनंदन.

अमरावती येथील - शब्दजा प्रकाशनाने  "दिती " कविता संग्रह प्रकाशित केला आहे.त्यांचे आभार मानू या.

 कवयित्री जयश्री दाणी यांचा  "दिती "  हा पहिला कविता संग्रह आहे, या पुढेही  त्यांच्या भाव-कवितांचे असेच सुरेख संग्रह येत राहोत या शुभेच्छा देतो.  
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  पुस्तक-परिचय लेख - 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------
कविता -संग्रह -
 दिती - -जयश्री दाणी
पृ.९० , मूल्य- रु.१५० /-
----------------------------------------------------------------
प्रकाशक -
राजेश  बहाळे
शब्दजा प्रकाशन 
संपर्क - ९२२५२२३८०० 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, January 2, 2020


पुस्तक परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------
बाल-कविता संग्रह- थेंब फुले - "
सुंदर काव्य-पुष्पांची बाग  !
-----------------------------------------------------------
मराठवाड्यातील बालसाहित्य लेखन क्षेत्रात .अनेक लेखक-कवी मंडळी मोठ्या जाणीवेने लेखन करतांना दिसून येत आहेत ,ही बाब
मोठी समाधानाची आहे. नव्या पिढीतले हे साहित्यिक ..शिक्षण -क्षेत्रातले  असल्यामुळे .."एक शिक्षक-एक गुरु
आणि एक माणूस म्हणून " ते सतत मुलांच्या सानिध्यात आणि सहवासात असतात . याचा खूप मोठा लाभ त्यांना आपल्या लेखनासाठी
नक्कीच होत असतो.  
नांदेड  जिल्ह्यातल्या  सावरगाव या लहानशा गावात असलेले  श्री.एकनाथ डूमणे असेच एक शिक्षक .जे कवी पण आहेत - ,
त्यांचा बालकविता संग्रह - थेंब फुले प्रकाशित झाला आहे ,त्याबद्दल लिहितांना खूप आनंद होतोय ...
बालसाहित्य त्यात ही कविता  म्हटले की त्यात कोणते विषय असणार,? तेच ते नेहमीचे ठराविक आणि .ओळखीचे विषय असणार ...
हो अगदी बरोबर आहे हे ..
पण ,एक गोष्ट अशी पण असते की ,सर्वांच्या नजरेला ज्या गोष्टी पडत असतात , त्याकडे पाहण्याची प्रय्तेकाची दृष्टी वेगळी असते, दृष्टीकोन वेगळा असतो
.हे लक्षात घेत आपण वाचन करीत गेलो तर .   कवी- एकनाथ डूमणे यांच्या  .थेंब फुले "या संग्रहामधील कवितांचा आनंद घेता येतो.
थेंब फुले - " या बाल-कविता संग्रहाला   " कवीचे मनोगत ,नाही ",  आणि कुणा मान्यवरांची प्रस्तावना नाहीये .." या दोन्हींचे नसणे ",जाणवत नसले तरी,
वाचक-सवयीने आपल्याला  जाणवते की अरेच्या ..हे दोन पाने यात नाहीत ,पण ,  हा बदल छानच वाटला .
प्रसिध्द साहित्यिक श्री. दा.मा.बेंडे - यांनी मलपृष्ठावरील आपल्या शुभेच्छा- अभिप्रायात या संग्रहाविषयी उचित असे गौरवोद्गार व्यक्त केले आहेत.
ते म्हणतात -
एकनाथ डूमणे शिक्षक आहेत . या कवितेत बाल-विश्वाची बोली त्यांनी बरोबर पकडली आहे.. ग्रामीण जीवन बाल कवितेतून चितारण्याचा आणि
बालमनाचा कानोसा घेण्याचा , त्यांच्या कवितेने यशस्वी प्रयत्न केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही..
कवितेसाठी निवडलेले आशय आणि  विषय , आणि रचना बालवाचकांना पसंतीस पडणाऱ्या आहेत.
वरील मजकुरा वरून  प्रस्तुत कविता संग्रहातील कवितांच्या स्वरूपा बद्दल कल्पना येण्यास नक्कीच मदत झाली आहे. पाहू या काही कविता उदाहरणे -
थेंब फुले " या कविता संग्रहात एकूण छत्तीस  कविता आहेत.
पाऊस" म्हणजे बालमनाचा एक आवडता सोबती .. पाऊस आला आला म्हणता म्हणता तो येतो आणि जातो ,
त्याची ही शीर्षक कविता - थेंब फुले -(पृ.८ ),
थेंब पडती
टप टप टप
गारा वर्षती
रप रप रप 
थेंब फुले
होती जमा केली
दिसेनाशी झाली
सांगा कुठे गेली ?
*****
आजच्या नव्या पिढीला आणि बाल-मनाला ,आपल्या पारिवारिक नात्यांची पूर्णपणे माहिती नसते, कारण छोटी कुटुंबे .!
अशा वेळी कवी -एकनाथ डूमणे
मुलांना  "नाते " (पृ ..१४ ) ,या कवितेतून आपल्या सभोवताली असणार्या अनेक नाते-रूपांची फार छान ओळख करून देतात. ही कविता पूर्ण वाचण्यात खूप मजा आहे.
आमच्याकडचे एका नाते
खरे तुम्हा सांगून जाते
बाबांचे बाबा पितामह
आईचे बाबा मातामह ...
**********
आजच्या ग्रामीण जीवनात आपले अनेक सोबती कमी झाले आहेत , वेगवान यंत्र आणि वाहने आपण वापरतो , पण ही येण्या अगोदर कोण आपले
"सोबती " ( ..२१ ) असायचे .त्याची ही सुंदर कविता  आहे..
"शेत कामाला
राबताय कोण ?
आमच्या घरची
बैल  दोन   !
काळीचे लेक
सच्चे कोण ?
बैलंच आमचे
दुसरे कोण ?
*******
आपल्या सर्वांच्या भाव-विश्वातली महत्वाची व्यक्ती  "आई" असते , तिच्या विषयीची ही कविता
"पहाटेच सुरु
आईचे राबणे
माहितच नाही
जराही थांबणे
दुखनं खुपणे
इतरांचं पाही
तिचं सोसण का ?
समजत नाही  .... ( आई ..पृ..३४ ),
आपल्या सभोवताली निसर्गाने दिलेल्या अनेक सुंदर गोष्टी आहेत, कवीने ते बरोबर टिपले आहे..
"झाडाच्या शेंड्याला
लागले बगळे
कौतुकाने किती
बघती सगळे
हिरव्या रंगाची
पानं असतात
बगळ्यांची फुलं
पांढरी दिसतात ......(बगळ्यांची फुलं .पृ..३६ ), "
या आणि इतर कवितातून परिसर दर्शन होते, अनेक मित्रांच्या भेटी होतात , मोठी माणसे काही तरी सांगून जातात ,
या अशा कवितेतून ..काही घेत राहावे ..ज्याने आपल्या मनाला काय वाईट आणि काय चांगले याची ओळख  होण्यास मदत होते.
एक शिक्षक आणि एक कवी ..अशा दोन्ही रुपात एकनाथ डूमणे यांनी केलेले प्रबोधन उत्तम आहे.
मनी माऊ, " "उंदीर ", घोडा ", मुंगी ", "कोंबडा ", मेंढी "  "सभापती   " मावशी ""या कविता .गंमतीदार कविता आहेत ..
आजी, डॉक्टर मामा , परी , आई  " या कविता मधून आपल्या आवडत्या व्यक्ती भेटतात.
"इशारा , थेंब फुले , ढग , पाउस , झाड " या कविता वाचतांना निसर्ग रूप दिसते ...
कवी - एकनाथ डूमणे यांनी लिहिलेल्या साध्या आणि सोप्या शब्दरचनेच्या या कविता वाचकांना नक्कीच आवडतील.
त्यांच्या लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा .
प्रसिध्द चित्रकार प्रा.प्रमोद दिवेकर यांनी  या  कविता संग्रहाचे  "आकर्षक ,सुंदर मुखपृष्ठ आणि आतील अनुरूप रेखाचित्रे  केली आहेत ,
त्यांच्या या कामगिरीने  "थेंब फुले " खूप सुरेख झाले आहे. त्यांचे अभिनंदन.
प्रकाशक -दादासाहेब काका जगदाळे यांच्या तेजश्री प्रकाशन -. यांनी हा बालकविता संग्रह प्रकाशित केला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  पुस्तक परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------
बाल-कविता संग्रह-
थेंब फुले - "
एकनाथ डूमणे
संपर्क - ९०९६७१३४१७
पृ..३६, मूल्य- रु.५०/-
------------------------------------------------------------------------------------------------------
तेजश्री प्रकाशन -
संपर्क - ८२७५६३८३९६
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------

Monday, December 9, 2019

पुस्तक-परिचय लेख- कविता-संग्रह - ज्ञान गीता .


पुस्तक-परिचय लेख -
- -अरुण वि. देशपांडे
------------------------------------------------
ज्ञानगीता म्हणजे मनगाभारा उजळून टाकणाऱ्या रचना असलेला कविता संग्रह
रसिक-वाचक मित्र हो,
वर्तमानातले आपले जगणे..अतिशय विपरीत परीस्थितीतले झालेले आहे, हा प्रवास अनुकूल नाही हे आपण अनुभवतो आहोत, हताश ,हतबल, निराश..अशा नकारात्मक भावनांनी वेढून गेलेल्या मनाची अवस्था "अर्जुनासारखी " झालेली आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास साह्य करिते झाले ,त्यांनी अर्जुनाला गीतेतून-जीवन दर्श घडवले, ज्ञानाचा प्रकश दाखवला, तसेच काव्यारुपातुन सकल जनाच्या कल्याणार्थ..कवयित्री विजया पाटील, कराड यांचा कविता संग्रह- ज्ञानगीता,आपल्या सर्वासंसाठी संस्कार- दीप घेऊन आला आहे, हे मोठेच सुचिन्ह आहे.स्वतः कवयित्री या लेखनाचे प्रयोजन मोठ्या आंतरिक तळमळीने सांगित आहेत..
काजळल्या आत्मज्योती
मनी व्याधी, व्यथा, चिंता |
उजळाया काळजाला
साकारली ज्ञानगीता ||
-या सर्व काव्यरचना ..संस्कारक्षम तर आहेतच, याचा हेतूच समाज प्रबोधनाचा आहे हे जाणवते आणि जीवनानुभव गाठीशी असलेल्या परिपक्व आणि संवेदनशील कविव्यक्तिमत्वचा हा शब्द -अविष्कार आहे, हे यातील आशयावरून जाणवते. आपल्या मनोगतातून व्यक्त होतांना कवयित्री म्हणतात- स्वतःत रममाण झालेल्या माणसाला जागं करणं, वास्तवाचं भान करून देणं, कर्तव्याची जाणीव करून देणं आणि आपल्याला करण्यासारखं काहीच नाही असं समजून टी.व्ही, मोबाईल, यासारख्या गोष्टींच्या आधिन गेलेल्या युवा पिढीला कर्तव्यनिष्ठ बनविणे हे माझं आद्य कर्तव्य आहे, असे मी समजते आणि त्यातूनच ही "ज्ञानगीता" साकारली आहे. या मनोगताची सार्थ प्रचीती "ज्ञानगीता" मधील रचना आहेत. नव्या पिढीला, तरुणाईला इतक्या आपलेपणाने,तळमळीने कुणी वडीलधारे असे सांगणारे आहे " याचे खूप समाधान या रचना वाचून नक्कीच वाटेल, त्यासाठी कवयित्री विजया पाटील यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत.
या संग्रहाच्या ब्लर्ब वरील अभिप्रायात व्यक्त होतांना जेष्ठ कवी-साहित्यिक -श्री.लक्ष्मीकांत रांजणे, वाई, यांनी जणू या लेखनाचे सार वाचकांना सांगितले आहे, ज्यामुळे या लेखनाचा उद्देश नेमकेपणाने मनाला भिडतो. ते म्हणतात -आजच्या विफल तरुण अर्जुनाला सडेतोड सवाल करणारी ही कवयित्री परिवर्तनशील असून हे नवे संस्करण समाजाच्या पुनरूथानासाठी मला खूप मोलाचे वाटते. सरळ सपष्ट आणि अतिशय आस्वादक अशी ही भावविभोर श्लोक रचना सर्वांसाठीच प्रेरक आणि ऊर्जादायी आहे. ज्ञानगीता नावाचं हे नवं चैतन्य घराघरात उजळाव, त्याची आभा सर्वदूर पसरावी अशी मी आशा करतो. कवी-साहित्यिक श्री.लक्ष्मीकांत रांजणे - यांच्या या उपयुक्त विवेचक अभिप्रायाने या लेखनाच्या मौलीकतेत भर पडली आहे, असे मला वाटते. या संग्राहातील रचना दोन विभागात आहेत. पहिल्या विभागातल्या रचना या श्लोक-स्वरूपातल्या आहेत.ज्यांना चारोळी "असेही म्हणता येते. यांची संख्या - १२५ आहे., आणि दुसऱ्या विभागात अभंग आहेत.त्यांची संख्या - २२५ आहे म्हणजे एकूण..३५०..रचना आहेत.यातून कवयित्री विजया पाटील यांनी समाजाचे, माणसांचे आणि युवा आणि नवीन पिढीचे प्रबोधन केले आहे. हे सांगणे सगळ्यांच्या भाल्यासाठीचे, प्रवासातील वाटचालीसाठी सोबत करणारी ज्ञान -शिदोरी आहे, भवताली गडद काळोख असतांना त्यातून मार्ग काढण्यासाठी मदत करणारा हा ज्ञान-दीप आहे. एक कवी म्हणून विजया पाटील यांनी केलेले हे लेखन-कार्य अतिशय मौल्यवान आहे.
तसे तर चारोळ्या हा लेखन प्रकार..सर्वांना भावणारा आहे. चटकन आणि पटकन मनाला भावणारा आशय लक्ष वेधून घेत असतो, आणि प्रस्तुत ज्ञानगीता मधील चारोळ्या -या मोठ्या अर्थपूर्ण अशा श्लोक रचना आहेत. त्यातील भावार्थ मनाला स्पर्श करणारा तर आहेच, तो विचार करायलाही भाग पाडतो,कारण त्यात..मानवाला, मानव-समूहाला..हा संदेश आहे .. व्यक्ती संपन्न होण्यासाठीचे जीवन-सूत्र..आचरणात आणून..सार्थक व्हावे. ही अपेक्षा आहे.अगोदर म्हटल्या प्रमाणे कवयित्री युवा पिढीला काय सांगते, कसे सांगते हे अतिशय महत्वाचे आहे.आपण सुद्धा हे भवताली सांगू शकलोत तर या ज्ञान-गीतेचा प्रसार केल्याचे कार्य आपल्या हातून नक्कीच होईल..काही रचना उदाहरण म्हणून उल्लेख करतो..
चांगले ते ऐकावया
मन जनांचे धजेना
म्हणुनिया छेडिते रे
जनजागृतीची वीणा..||१२३||..(पृ.३४)
२. कोणतेही कार्य करण्यासाठी हाताशी साधने असली तर कार्य वेगाने करता येते त्यासाठी..
स्थापा संवाद मंदिरे
मार्गदर्शी कार्यशाळा
कसे जगावे सुखाने
देई जगण्याची कला..||६७||..(पृ.२३)
कवयित्रीने हे महत्वाचे सांगितले आहे.
३.गोंधळून गेलेली युवा पिढी,तिला कार्य-प्रवण करायचे तर आरंभापासून आधार हवा असतो, मग सांगावे लागते की--
आधी करावी योजना
मग योजावा प्रकल्प
जिद्द-चिकाटी-ध्येयाने
पूर्ण करावा संकल्प.. ||६२|| ..(पृ.२२)
४. आपले व्यक्तिमत्व कसे असावे,ते अनुकरणीय,वंदनीय असावे..त्यासाठी काय करावे ?
वैज्ञानिक, साहित्यिक
तत्वचिंतक ही व्हावे
दया, शांती, प्रेम रूपे
आधी माणूसची व्हावे..||२९||..(पृ.१५)
वरील रचना वाचल्या की, या काव्य-संग्रहाच्या प्रस्तावनेतील ओळी आठवतील.. संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते श्री.इंद्रजीत देशमुख यांची प्रस्तावना या लेखनास लाभली आहे.या काव्याचे वैशिष्ट्य सांगतांना ते म्हणतात-ही कविता संस्कारक्षम माणूस कसा व्हावा ?, त्याच्या जीवनाची ध्येयं कोणती असावीत आणि त्यानं स्वत: जगून इतरांना आनंदी कसं करावं ? याचा बोध या कवितातून कवयित्रीने दिलेला आहे.डोळ्यात स्वप्नं, मनात जिद्द ,आणि मनगटात ध्येयं पूर्ण करण्याची धमक असणारी तरुणाई आज आपल्या देशाला हवी आहे, ही धडपड त्याच्यासाठीच !
या भावनेला अनुसरून काही रचना..काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या विभागात आहेत त्यातील काही अभंग..छोटे छोटे..जे संख्येने २२५ आहेत. याची काही उदाहरणे देतो आहे ..म्हणजे ज्ञान गीता..नेमके काय देते..बघा..
१.
जगण्याचे ज्ञान
जगण्याचे भान
सांगे तत्वज्ञान
ज्ञान गीता..||२२५||..(पृ.७९)
२. माणूस समजून घेणे हीच एक खरी सुरुवात आहे. नव्या बदलाची ..त्या साठी ..
माणूस आतला
समजून घ्यावा
जागे जाणते व्हा
माणसांनो..|| २२३ ||..(पृ.७९)
३. तरुणाई बद्दल असा विचार करून,त्यांना सुनावणारी ही कवयित्री मला तरी एकमेव आहे असे वाटते.
'थ्रील' हवे वाटे
जिंदगीत ज्यांना
लढवा तयांना
सैन्यामध्ये..||२१४||..(पृ.७७)
४.युवकांना चैतन्यदायी संदेश देणाऱ्या या दोन रचना मला दिसल्या..
विश्व सावराया
लागे जे कराया
सज्ज व्हा श्रमाया
युवकांनो..|| १७८||
आणि..
ध्येय, जिद्द, स्वप्ने
उरी बाळगावी
श्रमाने लिहावी
यशोगाथा..||१८०||..(पृ.७० )
५.माणसांच्या मनावर संस्कार करण्यासाठी आपल्याला किती थोर ग्रंथ आणि गुरु लाभलेत ते पहा ..
वाचा ज्ञानेश्वरी
तुकोबांची गाथा
रामायण, गीता
देती ज्ञान..|| १० ||..( पृ.३६)
शेवटी आयुष्याची सार्थकता झालीच पाहिजे ना..
धेयाविना नसे
अर्थ आयुष्याला
व्यर्थ मानवाला
जीवन हे..||५०||..(पृ.४४)
थोडक्यात सांगायचे झाले तर, "ज्ञानगीता म्हणजे मनगाभारा उजळून टाकणाऱ्या रचना असलेला कविता संग्रह आहे". ज्ञानगीता या काव्य-रचनांनी खूप मोठे आत्मिक समाधान मिळाले. इतके सोपे,साधे रसाळ ,मन-स्पर्शी लेखन जणू सात्विक भाव दर्शन आहे. हा काव्य संग्रह कवी-मित्र -लक्ष्मीकांत रांजणे यांच्यामुळे माझ्या हाती आला त्यांचे आभार. कवयित्री विजया पाटील या प्रथितयश साहित्यकार आहेत. "ज्ञानगीता " हा काव्यसंग्रह त्यांच्या लेखन-प्रवासातील मैलाचा दगड ठरेल असा विस्वास आहे. त्यांच्या पुढील लेखन - प्रवासासाठी शुभेच्छा ! अनुजा शिंगटे यांनी केलेले संग्राचे मुखपृष्ठ अगदी साजेसे असेच झालेले आहे.परीसस्पर्श प्रकाशन प्रस्तुत "ज्ञानगीता " संग्रहाचे प्रकाशक आहेत.
-----------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख -
अरुण वि. देशपांडे - पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------
ज्ञानगीता- काव्यसंग्रह
कवयित्री- विजया पाटील
पृ. ८०, मूल्य- रु. १५०/-
प्रकाशक- परीसस्पर्श पब्लिकेशन
टाळगाव, ता.कराड, जि.सातारा
मो.नं -९५ ५१ ७०१ ८०१

Wednesday, May 29, 2019

पुस्तक परिचय लेख- सरत्या वसंताच्या गोष्टी,


पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------

अनुवादित कथा संग्रह -सरत्या वसंताच्या गोष्टी 
भावव्याकूळ करणाऱ्या लघुकथा 
-----------------------------------------------------------------------------
ओडीसी भाषेतील प्रथितयश व आघाडीच्या लेखिका -कमला सत्पथी लिखित  १७ लघुकथांचा समवेश असलेला 
मराठी भाषेतील अनुवादित कथा संग्रह - सरत्या वसंताच्या गोष्टी ", नुकताच वाचून झाला .

अहमदनगर येथील साहित्यिका - रचना  यांनी ओडिसी भाषेतील कथांचा  मराठीअनुवाद करण्याचे फार महत्वाचे 
आणि मौलिक असे साहित्यिक कार्य केले आहे ,त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करु या .

 या कथाबद्ल असे म्हणता येईल की  - सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आणि दैनदिन जीवन-क्रमात नेहमीच काही ना काही 
प्रसंग ,घटना ,घडून जातात ,अशा परिचित प्रसंगातून  मनाचे विविध भावनिक -व्यवहार वेगवेगळ्या रुपात दिसून येतात ,
अशा प्रसंगातून व्यक्ती व्यक्त होते ,हे व्यक्त होणे सर्वांसाठी पूर्णतः अनपेक्षित असते,, अशा वागण्याचे परिणाम फार 
दूरगामी परिणाम करणारे असतात  , हा अकल्पित असा फार मोठा धक्का पुढे मग आयुष्यभरासाठी सहन करावा लागतो.कारण 
बहुतेक वेळा तो मनातील स्वप्नाची, इच्छांची ,राखरांगोळी करणारा असतो. 

ऐन बहाराच्या . आयुष्यातील वसंताच्या दिवसातच  हे आघात  हे दु:खः सहन करावे लागलेल्या , उन्मळून गेलेल्या  मनांच्या 
आणि  माणसांच्या या कथा आहेत , त्या दृष्टीने या कथा संग्रहाचे शीर्षक 
सरत्या वसंताच्या गोष्टी ", अगदी अनुरूप असे आहे ,हे या सर्व कथा वाचून झाल्यावर प्रभावीपणे जाणवते. .
 या कथातेतील स्त्रिया म्हणजे  नायिका असोत ,व एक दोन कथेतील पुरुष असोत त्यांच्या मनातील दु:ख , वेदना 
 भावनांचा कोंडमारा हे सर्व ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत ..म्हणजेच आयुष्यातील सरत्या वसंतातही "ते  भोगत आहेत , 

या कथा तशा पाहिल्या तर ओडीसा या प्रांतातील जन-जीवनावर आधारित आहेत , तिथले सांस्कृतिक संदर्भ, यातून कथा घडत जाते .
असे असले तरी या कथा ज्यांच्या बद्दलच्या आहेत त्या यातील नायिका ,आणि इतर प्रमुख सह-व्यक्तिरेखा ..ही तर आयुष्य जगणारी 
हाडामासाची ,आणि मन असलेली माणसेच आहेत ", "माणसांच्या वर्तनावर "अचूक आणि मर्मभेदक भाष्य करणार्या 
संवेदनशील अशा या कथा वाचकांच्या मनाची भावावस्था मोठी व्याकूळ करून टाकतात . 
जीवनाची वाटचाल सुखद नाही , पण ती किती चमत्कारिक  आहे ,याचे  प्रतिबिंब म्हणजे या कथा आहेत.

मराठी अनुवाद वाचताना या कथा -लेखनाशी  वाचक भावनिकदृष्ट्या इतका समरस होऊन जातो की .."ओडिसी पाश्वर्भूमी असलेल्या या मराठी कथा आहेत ",
असा अभिप्राय दिल्यावाचून मला तरी राहवत नाहीये.याचे श्रेय अनुवादिका -रचना  यांनी केलेल्या मराठी अनुवादाला द्यावे लागेल  .
प्रत्येक  कथेचा आरंभ ललित निंबंध वाटावा अशा हळुवारपणाने होतो ,आणि कथा पुढे सरकत जाते ,हे ओघवतेपण या अनुवादाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य ठरेल.
.त्यातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या मनोव्यापारातील वाचक म्हणून एक सदस्य होऊन जातो , "

या संग्रहाची अर्पण पत्रिका "मोठी अर्थपूर्ण आहे .. "आत्मभानाच्या वाटेवर चालणार्या ...सर्व स्त्रियांना ", कारण या संग्रहातील कथा या स्त्री-प्रधान आहेत ,
या कथा-नायिकांची दु:ख ,वेदना , खंत , अपूर्ण राहिलेली स्वप्न ,आकांक्षा , हे समजून घेत असतांना "आत्मभान : जागेल असे खूप काही या कथेतून 
वाचकांच्या समोर येते ,जे मनाला नक्कीच एक जाणीव देईल असे आहे.

अनुवादिका रचना -यांचे मनोगत या दृष्टीने खूप महत्वाचे आहे- त्या म्हणतात -
"साधी शब्दकळा असून सुद्धा जगण्याचे विदारक वास्तव मांडण्याचे कसब  "कमला सत्पथी "या लेखिकेने साधले आहे . मनाचा तळ ढवळून काढत 
विचारप्रवृत्त करणाऱ्या या कथा आहेत. या कथा प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रश्नावर आणि बाईपणाच्या भोगवटा चित्रित करणाऱ्या आहेत..
या संग्रहातील कथांचे हे अगदी यथार्थ असे विशेष आहे.

शीर्षकात "गोष्टी "हा शब्द आहे ..या अर्थाने कथानायिका वाचकांना आपल्या आयुष्याची गोष्ट सांगतात - त्यांचे . उमेदीनचे पर्व सारून गेलेले आहे , समोर 
आलेल्या आयुष्याला स्वीकारून तडजोडीचे -नवे जगणे सुरु केलेल्या या नायिका ..आहेत..पण मनात ते जुने सगळे अगदी सांभाळून ठेवलेले आहे..
हे दु:ख मनस्वी आहे . असहायता , हतबलता , निराशा , आधार नसल्याची खंत , आणि मनाला समजून न घेणारी माणसे ".. ही या सर्व नायिकांच्या 
वाट्याला आलेले विदारक असे वास्तव- जगणे आहे.....  स्त्री-पुरुष , नवरा -बायको , मित्र-मैत्रिणी , पारिवारिक नाते-संबंध " याच्यातील 
विस्मयकारक असे विसंगतीपूर्ण चित्र  एकेका कथेतून येते ,ते आपल्या मनात निश्चितच एक अपराधीपणाची भावना निर्माण करेल.

बहुतेक कथेतून कथा -नायिका हीच  निवेदिका असल्यामुळे ..तिच्या  गोष्टीतील प्रत्येक भावनेला , दु:खाला एक सच्चेपणाचा स्वर लाभला आहे असे सतत जाणवते .

कथा - असहाय आयुष्य -(पृ..२३)- मधील - "मी "- बनूचाचाचे गोष्ट सांगते .या कथेत जुन्याकालातील मोठ्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले पिढी-पिढी 
मधले संघर्ष सांगताना , कळत नकळत म्हणा किंवा जाणूनबुजून म्हणा आपल्या माणसावर आपलीच माणसे कसा अन्याय करतात " हे खूप प्रभावीपणे आलेले 
आहे.

विवश मातृत्व -(पृ..३२) - जन्मदात्या आईच्या भेटीसाठी आंतरिक तळमळीने निघालेली एक मुलगी ..श्रीमंत बापाच्या सोबत जगात असलेल्या या मुलीला 
आपल्या जन्मदात्या आई बद्दल कळते , ती गरीब आहे, निर्धन आहे , दूर कुठे वस्तीवर राहणाऱ्या या आईला स्वतःच्या मुलीबद्दल काहीच माहिती नाहीये.
अशा माय-लेकीची ही कथा खूपच भावस्पर्शी आहे.

एक्स्चेंज ऑफर - (पृ,४३ )- कथानायक महापात्तबाबू " यांच्या मनातील सर्वच गोंधळ म्हणजे पुरुष-मनोवृत्तीचे चित्रण आहे , हलकी-फुलकी वाटणारी ही कथा 
गांभीर्याने एक महत्वाचे जीवन-सत्य सांगते ..जे वाचण्यातच मजा आहे.

अबलेचा बळी -(पृ..५१ ) - डॉक्टर आणि पेशंट हे नाते म्हटले तर उपचारापुरते असलेले नाते, गरज सरो ..आणि ..हे आपण अनुभवतो . पण दरवेळी असेच होते 
असे नाही .या कथेतील डॉक्टर .सवयीने सगळे उपचार -कार्य पार पडतो , पण समोरचा पेशंट .त्याची मृतप्राय अवस्था , आणि हे सर्व जिला भोगायचे आहे ती "सीता",
केवळ मोठ्या माणसांच्या अविचारी वागण्याने , निर्णयाने तिच्यावर कोसळलेल्या आपत्तीने मनातून हलून गेलाय, गलबलून गेलाय . काहीच चूक नसतांना 
जबर किमत चुकवावी लागणाऱ्या "सीताची "गोष्ट  डॉक्टर खूप दु:खाद मनाने सांगतात .

आपले घर , आपली वास्तू " एक जिव्हाळा " याची कथा - घरबेचान -(पृ.५९ ).. व्यवहार आणि भावना या लढाईत .कधी कधी भावनेचा विजय होऊ शकतो "अशी ही 
सुखद कथा आहे.

दाटलेलं आभाळ - (पृ..७५ )- सुकामिनीच्या आयुष्यात जे घडत ,त्याचीच पुनरावृत्ती तिच्या मुलीच्या आयुष्यात घडू पाहते आहे . सुकामिनी बंड नाही करू शकली ,
त्याची कारण पुन्हा आठवून उपयोग नाहीये ..पण म्हणून , आता आपल्याच मुलीच्या वाट्याला ते येऊ नये ..हा विचार  अधिक दृढ होणे ..हे सुद्धा तिच्यातील 
स्त्रीला एक नवे आत्मभान देणारे आहे.

अन्य  काही कथा व त्यांची शीर्षके - १.सरत्या वसंताच्या गोष्टी..(पृ.७), २.सहजीवन ..(पृ.८८ ), ३. कलाकाराचा मृत्यू ..(पृ.९८ ), ४. न परतणारा नदीचा प्रवाह .(पृ.१२५),
नाही म्हणू नकोस ..(पृ.१४३ ), 

ही थोडीशी झलक काही कथांची द्यावीशी वाटली . संपूर्ण संग्रहात अशाच सरस कथा आहेत. वाचनीय आणि चिंतनीय असे हे अनुवादित कथा लेखन आहे.
अनुवादिका -रचना यांना या लेखन -उपक्रमासाठी खूप खूप धन्यवाद.

प्रसिध्द साहित्यिक श्री.संजय बोरुडे यांनी स्थापन केलेल्या "हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र -अहमदनगर " या संस्थेच्या माध्यमातून अनुवादिका -रचना ,यांनी 
हे अनुवाद कार्य केले आहे.

या संग्रहाचे मुखपृष्ठ चित्रकार आहेत- श्री.तौफिक बागवान , छान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन.

प्रकाशिका -कोमल धनंजय खेडेकर यांच्या निशिराज प्रकाशन -पुणे ,यांनी या संग्रहाचे प्रकाशन केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------
अनुवादित कथा संग्रह -
सरत्या वसंताच्या गोष्टी -
मूळ लेखिका - कमला सत्पथी 
अनुवादिका - रचना 
पृ.१६० /- मूल्य- रु..२७० /-

प्रकाशक -
कोमल धनंजय खेडेकर 
निशिराज प्रकाशन -पुणे.
संपर्क -८८०४५६५०२३ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------