पुस्तक परिचय लेख-
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------ ------------------
होरपळलेल्या जीवांच्या चटका लावणाऱ्या कथा -
"वैशाख वणवा ( कथा संग्रह )- छाया बेले .
------------------------------ ------------------------------ ----------
मराठवाड्यातील साहित्यिका छाया बेले यांचे कविता आणि कथा लेखन पुस्तकरूपाने वाचकांच्या पर्यंत आलेले आहे ते असे -
१.पहिला कविता संग्रह - लढाई अस्तित्वाची , २०१२ साली प्रकाशित झाला
आणि त्यांचा दुसरा कविता संग्रह -
"घर याचे हृदयी माझ्या " २०१५ मध्ये प्रकाशित झालाय.
या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत - छाया बेले यांच्या कविते विषयीचा हा अभिप्राय वाचकांसाठी आवर्जून दिला पाहिजे -
"नव्या वाण्ग्मयीन जाणीवा आणि नव्या वाण्ग्मयीन प्रवृत्ती " याची प्रचीती देणाऱ्या कविता " अशी पावती
त्यांच्या लेखनास दिली आहे ती आदरणीय डॉ.गंगाधर पानतावणे सरांनी ."
हा अभिप्राय वाचून आपणास साहित्यिका छाया बेले यांच्या लेखना विषयी कल्पना येण्यास मदत होईल.
छाया बेले कविता लेखन ज्या जाणीवेने करीत आहेत ,त्याच जाणीवेने त्या कथा लेखन करीत आहेत . या लेखन सातत्यामुळे
त्यांच्या कथा संग्रहरुपात आलेल्या आहेत.
त्यांचा पहिला कथा संग्रह "चकवा " २०१५ साली प्रकाशित झाला .
पहिल्या तीन पुस्तका नंतर त्यांचे प्रकाशित झालेले चौथे पुस्तक - "वैशाख वणवा " असून हा एक कथा संग्रह आहे.
या संग्रहातील मनोगतात लेखिका म्हणते आहे -
"जीवन जगत असतांना आपण आजूबाजूला अनेक गोष्टी बघत असतो त्यातील काही गोष्टी मनात कायम घर करून राहतात .
काही चूक नसतांना एखाद्याचं जगणं नाकारलं जातं ही दुसर्याची वेदनाही मनात सलत राहते अशाच गोष्टी मी शब्दात मांडण्याचा
प्रयत्न करते ".
आपल्या या मनोभूमिकेशी समरस होऊन लेखिका कथा लेखन करते याची प्रचीती "वैशाख वणवा " संग्रहातील कथा वाचून येते .
संग्रहाचे शीर्षक - वैशाख वणवा "हे या कथातील आशयाची पूर्वकल्पना देणारे आहे असेच म्हणू या. या कथा म्हणजे -ज्यांच्या जगण्यात
सगळ्याच सुखांची , आनंदाची कायमच " वाणवा " आहे अशा जीवांच्या वेदना मांडणार्या कथा वाचकांच्या जीवाला चटका
लावतील हे नक्की.
छाया बेले यांच्या "वैशाख वणवा " संग्रहातील कथा आणि त्यातील विशेष गुण - माझ्या दृष्टीने खालील आहेत ..
१. व्यक्तिचित्रणे असो वा व्यक्तिरेखा असो ..त्यांचे अचूक शब्दचित्र उभे करणे हे लेखिकेचे कौशल्य आहे .सगळ्याच कथा वाचनीय आहेत
त्याचे श्रेय या कथातील व्यक्तिरेखांचे आहे . एक माणूस ,एक व्यक्ती म्हणून या कथेतील व्यक्तिरेखा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.
२. कविता असो किंवा कथा वा इतर लेखन असो ..यातला आशय -केंद्र माणूस आणि त्याच्या भावना असतात , ते लेखन वाचकांच्या
मनाला नक्कीच भिडणारे असते . छाया बेले यांच्या कथेत हे सर्व नेमकेपणाने आलेले आहे .
३. ओघवती कथन शैली वाचकांना खिळवून ठेवणारी आहे ..कथा लेखन प्रभावी होण्यासाठी लागणारे लेखन -घटक कोणते आहेत ", याची
उत्तम जाण लेखिका - छाया बेले यांना आहे ..
प्रभावी निवेदन शैली , कथेतील वातवरण -परिसर निर्मिती या कथा-आशयाला अधिक वास्तव रूप देणारी आहे , या सर्वाचे शब्द-रूप
वाचकांच्या समोर त्याचे अचूक चित्ररूप सादर करते ..त्यामुळे .कथेतील वातावरणात त्या त्या व्यक्तिरेखे सोबत वाचक फिरू लागतो "
हे विशेष आहे.
दिन-प्रहर असो,परिसर वर्णन असो किंवा व्यक्तीचे मानसिक चित्रण असो प्रत्येक कथेत ते खूप सूक्ष्मपणे येऊन जाते ..याचे श्रेय लेखिकेच्या
लेखन-दृष्टीला आहे जे दिसणारे ,जाणवणारे असे खूप काही अचूकपणे शब्दात टिपते .
४.या कथा आहेत त्या सामन्य जीवन स्तरातील माणसांच्या , ज्या ग्रामीण परिसरात रहाणार्या आहेत ,त्यांचा जीवन-अवकाश , मनातली स्वप्ने ,
पूर्ण व्हाव्यात असे वाटणाऱ्या इच्छा -आंकाक्षा " या फार अशक्य आहेत असे ही नाही ..पण त्यांच्या वास्तवात , त्यांच्या भावनिक विश्वात
सगळ्या गोष्टींची वानवा " आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होणे ,आपल्या मनाप्रमाणे होणे "या गोष्टी केवळ एक अपूर्ण इच्छा होऊन रहाते .
अशाच घटना असे ,प्रसंग ..आणि खूप काही .या कथेतील व्यक्तिरेखांच्या वाट्याला आलेले "वैशाख -वणवा " सारखे आयुष्य आहे.
अशा आशय-द्रव्यावर लेखिका छाया बेले कथा लेखनातून व्यक्त होतात .
या संग्रहातील कथा प्राधान्याने "भावनिक कथा आहेत ", वैचारिक बोजडपणा , सामाजिक -वैचारिक अभिसरण " असे काही या लेखनाचे
प्रयोजन आहे असे जाणवत नसले तरी माणसांच्या ..भावना सुद्धा खूप महत्वाचा सामाजिक आशयाचा संदेश देणाऱ्या असतात ",
हे या कथा सांगतात ", हे ही विशेष सांगावे असे आहे.
या कथा संग्रहातील पहिलीच कथा ..वंदू .. ही तिची आणि मुकुदाची प्रेम-कथा आहे ,असफल प्रेमाची कथा छान जमून आली आहे .
लेखिका आपल्या कथेतून लेखन ओघात -खूप छान असे भाष्य करते ..
या कथेतील "प्रेमाच्या संदर्भातील हे विचार ..
"मात्र एक गोष्ट अनादी कालापासून आपलं अस्तित्व टिकवून आहे ..वेगवेगळ्या रुपात .
ती म्हणजे प्रेम !!
जगण्याची तीच तर मूळ प्रेरणा असते .प्रत्येकाच्या जीवनात तिचं रूप वेगळं असतं एवढच .कुणाचं धर्मावर जातीवर देशावर आईवडील
नात्यागोत्यावर , मुलांवर , मित्रांवर , स्वतहा:वर " प्रेम असते . "प्रेम ही अशी भावना आहे जी माणसाला कोणत्याही परिस्थितीवर मात करायला
शिकवते , जगायला शिकवते .."
वरील भाव-भावनांची सुरेख प्रचीती देणारी कथा - वणवा "(पृ..४६ )-
कथेतील वसुधा- तिची जीवन कहाणी आणि मनातील नाजूक भावना या दोन्ही वाचतांना तिच्याविषयी एक आपलेपणा वाचकांच्या मनात
नक्कीच निर्माण होईल ,या कथेचा शेवट वाचकांना सुखावणारा आहे
या संग्रहातील कथा नायिका -प्रधान आहेत..त्यामुळे "स्त्री " स्त्रीत्व ",स्त्री-सुलभ भावना " स्त्री -सबला ,स्त्री -शक्ती " हे सर्व कथेत
वाचावयास मिळते .
उदा - कथा "सरवा (पृ.१५ ) मधील दुर्गी ..,कथा -चिमा (पृ.२७ ) मधली चिमाची दुर्दैवी कहाणी , कथा -परतीची वाट-(पृ -३५ )- सुमन आणि
तिच्या वडिलांच्या नात्यातील भावनिक बंध , कथा - संगु -(पृ.७९ ) संगुच्या वाट्याला आलेले भीषण जगणे , कथा -जोगतीन -(पृ.९५ )-
अंबा आणि चंपा ..थोपवलेले आयुष्य नाकारण्याचे थेट धीटपण दाखवू पाहतात ,.त्याची थरारक कथा .
हे असे आयुष्य जगणार्या स्त्रियांचे जीवन दर्शन सुद्धा वाचकांना विशेषतः नागरी वाचकांना नवा अनुभव देणारे ठरावे .
संग्रह्तील या पेरणी -मधील महादू , अंतर -कथेतील -धोंडीबा , बाप-कथेतील "बाबा " या व्यक्तिरेखा खूप प्रभावी आहेत .
छान ,आशयपूर्ण कथा लेखना बद्दल लेखिका -छाया बेले यांचे अभिनंदन. व पुढील लेखनास शुभेच्छा.
चित्रकार - मित्र - प्रमोद दिवेकर यांचे समर्पक मुखपृष्ठ संग्रहास लाभले आहे."याचाही उल्लेख केला पाहिजे
प्रकाशक व मित्र श्री.जयप्रकाश सुरनर यांनी संगत प्रकाशन -नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या "वैशाख वणवा " या संग्रहाचे सर्वत्र स्वागत होईल
व वाचक प्रतिसाद लाभेल याची खात्री आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --
पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क -९८५०१७७३४२
------------------------------ -----------------------------
कथा संग्रह - वैशाख वणवा
छाया बेले
प्रकाशक -
संगत प्रकाशन , नांदेड .
पृ.१०८ , मूल्य- रु.१६० /-
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------
No comments:
Post a Comment