पुस्तक-परिचय लेख -
अरुण वि.देशपांडे -पुणे
------------------------------ ------------------
पुस्तक-परिचय लेख -
मातीच्या ओलाव्यात भिजलेल्या कविता -"
मातीत हरवल्या कविता -
(कविता संग्रह )
------------------------------ ------------------------------ --
वाचकांच्या मनात घर करणाऱ्या कवितांचे लेखन करणारा एक भावूक -संवदनशील कवी - अशी ठळकपणे ओळख देणारा
मातीत हरवल्या कविता " कविता संग्रह संतोष आळंजकर या कवीचा आहे. विशेष म्हणजे हा या कवीचा "पहिला कविता संग्रह आहे .
मातीशी भावनिक दृष्ट्या एकरूप असलेल्या या कवीने
आपल्या गावातील चित्रण करतांना इतके अस्सल केले आहे की ..या कविता आणि त्यातील भाव हे प्रत्येकाच्या नजरे समोर असलेल्या
गावाचे आणि शेताचे चित्र उभे करते . आपण या सर्वांचा एक अभिन्न असा भाग आहोत ही भावना दृढ होऊ लागते .
कवीने व्यक्त केलेली खंत , त्याच्या मनातील वेदना , त्याला होणारे अपेक्षाभंदुख, मनावर साठलेली आगतिक -निराशा " हतबलता ,या कवितेतून येते
आणि ती या कवीची एकट्याची न रहाता आपल्या सर्वांची , वर्तमानावर व्यक्त होणारी आपली सर्वांची कविता वाटू लागते .
सहजता "हा या कवितेचा भावणारा असा कविता-गुण आहे . या सहजतेला एक वेग आहे , यातील भावनाचा जो आवेग आहे , कवीने तो अतिशय संयतपणे
आपल्या शब्दातून व्यक्त केला आहे.
९६ पृष्ठांच्या या कविता संग्रहात एकूण ८१ कविता आहेत ..या सर्व कविता "गावाकडच्या वातावरणातील आहेत . ज्याचं "बालपण "आता आठवणीत आहे ,
आणि वर्तमानातील रेट्यामुळे आता ज्यांचे "गावपण " हरवले आहे , अशा आपल्यासाठी कवी - संतोष आळंजकर यांच्या "मातीत हरवलेल्या कविता "
भावनिक अनुभूती बरोबरच ,वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या आहेत.
या कविता संवाद करतात ,र कधी निसर्ग -रूप दाखवतात , अनेक कवितेतून भाव-विश्वातील आपल्या माणसाची शब्द-चित्र कवी रेखाटतो ,त्यात
या सर्वांच्या मनातील "मातीशी असलेली , रुजलेली ओढ ,गावाशी असलेली नाळ " जाणवते , या कविता खूपच छान आहेत.
लयबद्ध , गेयतापूर्ण अशा या रचना विविध कविता -आकृतीबंधात लिहून कवी संतोष आळंजकर यांनी आपल्या कविता लेखनाचे विविध -गुण दर्शनच घडवले आहे.
या कवितेतून गावाकडील दिनक्रम , जगण्याचे आणि शेतकरी जीवन जगण्यातील असफल- प्रयोजन , निसर्गक्रम , शेती आणि शेतकरी यांचे अतूट असे भावबंध ,
बदलत्या जीवन शैलीमुळे गावाकडील माणसांच्या जगण्यावर काय नि कसे विपरीत परिणाम झाले आहे हे आपल्या समोर मांडले आहे ..
कवी संतोष आळंजकर एक कवी आणि एक माणूस म्हणून आज ही या वातावरणात , या शेतात , जमिनीशी आणि या माणसाच्या सहवासात आहेत , त्यांच्या या प्रत्यक्ष
जीवन-अनुभवाचे शब्द-रूप आणि कविता एक "नैसर्गिक वाटणारे अस्सल रूप "वाटते .
मातीत हरवल्या कविता "- असे या कवीला किती ही वाटो, पण या कविता वाचून माझ्या सारखा वाचक म्हणेल- या तर कधी पासूनच्या मनाच्या मातीत खूप खोलवर रुजलेल्या
कविता आहेत ..म्हणूनच तर गावाकडील माणसांचे कष्ट , त्यांचे श्रम , त्यांची मातीशी असलेली एकरूप ओढ " हे सगळ काही कविता-कोंब -रुपात आपल्या समोर
आलेलं आहे .
रसिक हो -मला आवडलेल्या काही कवितांचे अंश आपल्या अभिप्रायार्थ देतो -
" कुणब्याची लगबग
होता वापसा मातीला
बीज तिफणता पडे
हिर्व सपान सखीला "....(वळीव स्पर्श ..पृ..२० ),
पावसाची वाट पहाणे , डोळे सारखे आभाळाकडे लागलेले , त्या साठी दात्या कडे "दान "मागावे लागते ..
"काय झालं मायबापा
केलं काळीज निबार
थोडं होऊन उदार
माझं भिजू दे शिवार ...( दान ..पृ.२१ ).,
शेतावर राबणारा जीव .आसुसलेला असतो तो "सुगीच्या दिवसासाठी ..
"असे सुगीचे दिवस
नित येऊ दे रे देवा
तुझ्या देणाऱ्या हाताचा
कोणा वाटू नये हेवा ...( सुगी ..पृ..२४ )
कृतज्ञता ही एक खूप मोठी भावना त्यांचे हे मनस्पर्शी उदाहरण ..
आपल्या शेतात राबणाऱ्या बैलावर पुत्रवत प्रेम करणारा -उतराई "होण्यासाठी इच्छा व्यक्त करतोय..
" तुझी होण्या उतराई
राजा सांग काय करू
जर झालास तू गाय
तुझे होईन वासरू .....(उतराई ..पृ.२८),
कुणबी आणि या कुणबीपणामुले सोसावी लागणारी दु:खः यावर संग्रहात अनेक कविता आहेत...
रोजचाच दैवभोग
हाता -तोंडाचा मिलाप
बांधा -बांधाहून उठे
फासा-फासाचा विलाप
नको खचू रे कुणब्या
नको असा धीर सोडू
तोड बाभळीचा फास
खोड एकेकाची मोडू ...(नको खचू रे कुणब्या ..प्र..३१ ),
शेतकरी हा पंढरीचा वारकरी , विठुरायाचा अनन्य असा भक्त .अशा या शेतकरी -बापात "कवीला विठूराया दिसतो ..
"रोज जमती शेतात
दोन पंखी वारकरी
बाप माझा विठूराया
शेत त्याचे पंढरी ... (बाप माझा विठूराया ..पृ..३३ ),
संतोष आळंजकर हे कवी तर आहेतच ..एका शिक्षकाच्या रुपात ते आपली सामाजिक कार्य जबाबदारीने पार पाडतात ..
स्व-जाणीव निर्माण करणे , सजग नागरिक घडवणे ..हे कार्य एक शिक्षकच करीत असतो , शिक्षक हा कवी असल्यामुळे
कवितेतून तो हे संस्कार -कार्य अधिक प्रभावीपणे करतो याची प्रचीती देणार्य कविता या संग्रहात आहेत.
"बिनभिंतीच्या शाळेमध्ये चला जाऊ या मैदानावर
पराभवाने खचू नये ही शिकवण मिळते मैदानावर ...(मैदानावर ..पृ..८९ ),
माणूस वयाने कितीही मोठा होवो , किंवा लौकिक दृष्ट्या खूप मोठेपणा त्याच्या वाट्याला येवो ..त्याला मनात वाटत असते
की "आपले बालपण "पुन्हा एकदा अनुभवता यायला पाहिजे ..म्हणून तो म्हणतो..
"आता वाटे आणिक मजला कासाश आपण मोठे झालो
बालपणीच्या स्वर्गसुखाला उगीच आपण परके झालो
आयुष्याची घड्याळ देवा पुन्हा एकदा उलट फिरावी
बालपणीच्या त्या दिवसांची पुन्हा एकदा लूट करावी ... ( मोठेपणीची कविता ..पृ..८३ ),
आपल्या जगण्याची एकूणच कशी दैना झालीय यावर लिहितांना कवी म्हणतोय..
"आता येऊन बसत नाहीत चिमण्या
काळवंडलेल्या आढयाच्या हलकडीवर
की जाऊन बसत नाहीत
मंदिरात टांगून ठेवलेल्या कणसावर
सुपातलं धान्य पाखडतांना
पसाभर दाणे अंगणात टाकणारे हात गेले
तेंव्हापासून सोडून दिलयं त्यांनी अंगणात येणं ....( चिमण्या ..पृ..५९ ),
दारिद्र्याशी लढाई लढण्यात जन्म गेलेल्या माणसाची करुण कहाणी असलेल्या अनेक कविता या संग्रहात आहेत..
" का कुणास ठाऊक पण
शेवटपर्यंत सांभाळून ठेवलं तिनं
पांढरी कवडी असलेलं सुई -दोऱ्याचं डब
शेवटपर्यंत घालत राहिली टाके
आमच्या डोक्यावरच्या फाटक्या आभाळाला
आणि तिच्या टाके उसवलेल्या कपाळाला ....(पांढरी कवडी ..पृ.५३ ),
नशीब आणि नशीब उजळेल या आशेवर पाहिलेली स्वप्न कधी खरी न होणे .. शेतकरी बापाच्या जीवनाची अशी शोकांतिका ..
"अशीच कैक सालं राबता राबता
आई बाचं जीव सरलं
अन एक इटाच्या घराचं सपान
खोपटातच राहून गेलं ....! (सपान ..पृ..४८ ),
आपल्या गावावर जीवापाड प्रेम असणारी , गावात जीव गुंतलेली माणसे ..गाव बदलून गेली हे त्याचं दु:ख..
"लहानसं होतं गावं झाडाझुडपात दडलेलं ,
शहरापासून दूर आणि माणूसकीन भरलेलं ...
खरचं रे बाळा असं होतं माझं गावं
आता सारच बदललाय .! राहिलंय फक्त नाव..! ( गावाची कविता ..पृ..४७ ),
निसर्गाशी असलेले नाते , मातीशी असलेले ऋणानुबंध यातूनच कवी त्याची कृतज्ञता शेवटच्या कवितेतून व्यक्त करतो.
"सृजनाचे हे बीज टाकतो कोण झोळीत माझ्या
पेरून उरते कसे चांदणे अरे खोळीत माझ्या
या मातीशी असेल माझे युगायुगांचे नाते
तरीच काही हिरवी पाने अरे ओळीत माझ्या ||
कवी संतोष आळंजकर या कवीच्या आशयपूर्ण कवितांचा आणि संग्रहाचा हा परिचय वाचून तुम्ही हा संग्रह नक्कीच वाचाल .
पुढील लेखन -प्रवासास कविमित्रास अनेक शुभेच्छा .
चित्रकार -अरविंद शेलार यांनी अन्रूप असे मुखपृष्ठ रेखाटले आहे , त्यांचा आवर्जून उल्लेख करतो
कवी-मित्र -आणि जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------
मातीत हरवल्या कविता -(कविता संग्रह )
- संतोष आळंजकर
पृ.९६ , मूल्य- रु.१००/-
संपर्क-९४२३७२४४५०
------------------------------ --------------------------
प्रकाशक -
जनशक्ती वाचक चळवळ
समर्थ नगर -औरंगाबाद ,
संपर्क-०२४०/ २३४१००४
------------------------------ ------------------------------ -----------------
No comments:
Post a Comment