Monday, April 17, 2017

एकमत- रविवार -दि. १६-४-२०१७ -मध्ये प्रकाशित माझा पुस्तक -परिचय लेख .

एकमत - रविवार -दि.१६-एप्रिल -२०१७ -
सप्तरंग "- पुरवणीत - प्रकाशित माझा पुस्तक परिचय लेख.
-----------------------------------------------------------------------------------------
"घनश्यामल रेखा " मनगंध -ऋतुगंध एकची जाहले ....!
-------------------------------------------------------------
वाचक मित्र हो ,
आपल्या मनाला आनंद देऊ शकणारे पुस्तक आपल्या पर्यंत यावे या सारखा छान असा दुसरा योग नाही.कवयित्री तनुजा ढेरे यांच्या घनश्यामल रेखा " या कविता-संग्रहाने हा योग माझ्या वाट्याला आला .निखळ अशा भाव-कवितेने तरल अशी भावानुभुती दिली.,त्यांचे अभिनंदन.
भावूक आणि हळवी भाववृत्ती " हे या कवितेचे वैशिष्ट्यै आहे. कविता लेखना साठी आवश्यक असलेला "छंद ,काव्य,ध्यास आणि व्यासंग " या सगळ्या गोष्टींची जोपासना या कवयित्रीने अभ्यासूपणाने केली आहे हे या कविता लेखनातून जाणवते आणि ही कविता आपले हे रूप ठसठशीतपने रसिकांच्या मनावर बिंबवते.
लेखन सहज -सुंदर असले की ते भावणारे असते ..कवितेचे विषय आणि आशय कवयित्री ज्या मनोवेधेक शैलीतून मांडते आहे..ते वाचून वाचक सुखावतो.
पहिलावहिला संग्रह "या शब्दाने लेखक-कवींच्या लेखन-आविष्काराच्या पद्धतीबद्दल वाचक साशंक अवस्थेत लेखनाचे आस्वादन करीत असतो. तनुजा ढेरे यांच्या पहिल्या कविता-संग्रहाचे -कवितांचे वाचन करून झाल्यावर वाचक या कवितांची व कवयित्रीच्या कवितांची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
आजकाल कविता बव्हंशी -मुक्तछंद स्वरूपात भेटणारी आहे.अशा कवितांच्या अवकाशात .सुंदर प्रतिमा ,लोभस निसर्ग रूप शब्दरूपात मांडणारी तनुजा ढेरे यांची कविता खूप वेगळी ,लालित्य शब्दकळा असलेली आणि मनास स्पर्श करून जाणारी भावकविता वाटते.
निसर्ग आणि माणसाची भाववृत्ती ..विविध भावना त्या भावनांचे विविध भावरंग..यांचा अतिशय सुरेल आणि सुरेख असा शब्द-मेळ साधण्याचा कवयित्रीचा प्रयत्न उत्तम साधला आहे.घनश्यामल रेखा संग्रहात एकूण ७६ कविता ..५ विविध शीर्षक विभगात समाविष केल्या आहेत .. १.रुणझुण ", १३ कविता , २- मनगंध - १६ कविता , ३- ऋतूगंध -१९ कविता, ४- "मनझुला"- १७ कविता आणि ५- "हिंदोळा "- ११ कविता .अशी ही विभागणी आहे.
मनातील भावना व्यक्त होण्यासाठी केलेला निसर्ग प्रतिमांचा वापर हा या कवितांचा मनोरम असा अविष्कार आहे.
आपल्या कवितेबद्दल कवयित्रीची भावना कशी व्यक्त होते ती पहा-
"माझ्या अंतरंगाचा आरसा
नाहीत नुसती जोडलेली अक्षरे
तर माझ्या अंतरंगात
प्रतिबिंबित प्रतिमा कविता माझी ...(उतरंड ..पृ..१३५ ),
हुरहुरत्या सांजवेळी .कशी असते मनाची - अवस्था ..
" रंग नभांचे गडद जांभूळी
क्षितीजलाली ही फुललेली
रे सांग मला तू सांजवेळी
आठवण का पानी दाटलेली ....( सांजपावली ...१२९ ),
मनातले प्रीतीचे गुपित असे गोड हे....
"तू सांग मला रे सांग मला
गुपित हळव्या मनातले
चांदण डोळ्यात बिल्लोरे
माझ्याचसाठी का फुललेले ...(चांदणं बिल्लोरे ..(पृ...१११) ,
कवयित्रीची निसर्गाप्रती असलेली मानसिक ओढ "ऋतुगंध "मालिकेतील कवितेतून अतिशय सुंदर व्यक्त झाली आहे.
शब्द - शब्दातून निसर्ग आपल्याला दिसतो..
शीर्षके - शिशिर , वसंत, बाभूळ , जास्वंद , गोकर्ण , गुलमोहर ,गुलबक्षी ,मोहर ,चंद्र केशरी ,पहाटगाणी ..इ.,
याच विभाग्तली ..ही एक गंध -नाद ल्यालेली एक कविता ..
कवयित्रीची निसर्गाप्रती असलेली मानसिक ओढ "ऋतुगंध "मधील कवितेतून अतिशय सुंदर व्यक्त झाली आहे.
"पहा कशी ही चैत्रात फुले फुलली
झुबे कानात सोनपिवळे घालूनी
अंगा खांद्यावर झाडे डोलू लागली
वारा खेळू लागला पानोपानी... (बहावा ....पृ..८३ )
मन आणि निसर्ग -यांच्यातील नाते .."मन गंध "मध्ये व्यक्त करणाऱ्या कविता आहेत..
"प्रेम ", "गुलाब ", कोरी पत्रे , "आयुष्य ", प्राजक्त ", रिमझिम ", संगमरवरी ", घननिळ" ई...
" खूप सोपं असतं
तुझं सुख तेच माझं सुख म्हणनं
तुला सुखात पाहतांना मला खूप आनंद होतो ..
म्हणनं ....( पृ..५३ )
निसर्गाच्या प्रतिमा मधून प्रेमभाव व्यक्त करणे ,ही कवयित्री तनुजा ढेरे यांच्या शब्दांची खासियत आहे.
याची प्रचीती "घनश्यामल रेखा "संग्रहातील कविता नक्कीच देते.
रुणझुण "..यातील.."पाउस रुणझुण ", हिरवा नारंग ", श्रावण ", या शीर्षकांच्या कविता हे सांगून जातात.
"थेंब दवाचं रेश्मी सजलं
मनात कोवळ उन भरुन
मोती टपोर अलगद उमललं
पातं गवताच हिरवं शहारलं....(दव ..पृ...३४..),
घनश्यामल रेखा "संग्रहातील कवितेतून पानोपानी असा निसर्ग खुललेला ,फुललेला ,बहरलेला आहे..आणि याचा भावनिक संबंध प्रीतीने भरलेल्या मनाशी आहे, रोजच्या जगण्याशी आहे..हे जाणवते आणि कवयित्री तनुजा ढेरे याची कविता आपल्या मनात एक जागा निर्माण करणारी एक वेगळी कविता ठरते.
प्रसिद्ध कवी- प्रा.अशोक बागवे यांनी तनुजा ढेरे या- कवयित्रीच्या कवितांचे सार्थ असे वर्णन करतांना म्हटले आहे की
निसर्ग आणि प्रीती यांचा मनोवेधक मेळ, अम्लान प्रतिमा आणि प्रीतीचा अंतस्थ वेग यांची अनोखी गुंफण करून हा कवितांचा शेला त्यांनी रसिकांच्या चरणी अर्पण केला आहे."
यापुढे ही कवयित्री तनुजा ढेरे यांची कविता अशीच आणखी नव्या लोभस रुपात भेटावी अशी अपेक्षा करून,त्यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा देतो.
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
-------------------------------------------------------
घनश्यामल रेखा
(कविता संग्रह )
-तनुजा ढेरे .
पृ.१३६ , मूल्य-रु.१३०/-
-------------------------------------------------------------
प्रकाशक -
शारदा प्रकाशन
प्रा.संतोष राणे
नौपाडा ठाणे ,
संपर्क -९८२०१७६९३४
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजच्या दैं.एकमत मराठवाठयातील लातूर , सोलापूर, औंरगाबाद , उस्मानाबाद ,हिंगोली, नांदेड जिल्हयातून एकाच वेळी प्रकाशित होणाऱ्या या आवृत्तीतील " सप्तरंग "पुरवणीत 'घनश्यामल रेखा' या काव्यसंग्रहाचं पुस्तक परिचय सदराखाली अरूण देशपांडे सरांनी लिहलेलं परिक्षण...
धन्यवाद सर _/\_
सौ. तनुजा ढेरे

No comments:

Post a Comment